सुविख्यात सामाजिक जबाबदार व थोर अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकताच आजच्या तरुण पिढीला जो उपदेश केला तो तातडीने सर्वत्र व्हॉट्सअॅप आणि फेसबुकावरून पाठवला गेला पाहिजे असे आमचे मत आहे. जागतिक मराठी अकादमी या संस्थेतर्फे अलीकडे शोध मराठी मनाचा या नावाची संमेलने भरविली जातात. संस्थेच्या नावात जागतिक हा शब्द असला तरी ही संमेलने आपली महाराष्ट्रातच भरतात, म्हणून कोणी दात काढण्याचे कारण नाही. विश्व साहित्य संमेलन भारतातील अंदमानात होत असेल, तर जागतिक मराठी अकादमीचे संमेलन अमरावतीत होण्यास काहीही हरकत नाही. तर या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना गोखले यांनी आपल्या खास सामाजिक जबाबदार शैलीत भाषण केले. या शैलीचे एक वैशिष्टय़ म्हणजे बोलताना आपल्या मनात सतत विचार असावा लागतो, की आपल्याशिवाय या जगात अन्य कोणासही सामाजिक जबाबदारीचे भान नाही. राष्ट्रभक्ती म्हणजे काय ते केवळ आपणासच ठावे असते. तर त्यानुसार गोखले बोलले. ते म्हणाले, ‘आपल्या देशाला चारही बाजूंनी शत्रूंनी वेढले आहे. दहशतवाद्यांचे हल्ले वाढतच आहेत. अशा वेळी हॉट्सअॅप आणि फेसबुकवर वेळ वाया घालवू नका. आपल्या विरोधात शस्त्र उगारण्यास शत्रूला धाक वाटला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घ्या.’ गोखलेंचे हे सुविचार ऐकून अनेकांना थेट स्वा. वि. दा. सावरकर यांचीच आठवण झाली. १९३८ साली मुंबईतील साहित्य संमेलनात बोलताना सावरकरही असेच म्हणाले होते की, ‘तरुणहो, आमच्या दुर्बल पिढीच्या देखोदेखी सुनीते नि कादंबऱ्या लिहिण्याकरिता लेखण्या सरसावू नका. तर त्या जपान, इटली, जर्मनी, इंग्रज, आयरिश तरुणांच्या देखोदेखी आधी बंदुका सरसावा!’ सावरकरांचे सांगणे होते, ‘लेखण्या मोडा, बंदुका उचला.’ आज गोखले हेही तेच सांगत आहेत. सावरकर बोलले तेव्हा जगभरात दुसऱ्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. इंग्रजांकडून भारतातही लष्कर भरती सुरू झाली होती. सावरकर भरतीच्या पक्षाचे होते. आज गोखले जेव्हा ‘की-बोर्ड मोडा, शस्त्रे शिका’ असे साहित्य संमेलनातून सांगतात तेव्हा त्यांच्या देखोदेखी कोणती शस्त्रे, कोणते तरुण आणि कोणती भरती आहे हे मात्र समजण्यास मार्ग नाही. एरवी लाठय़ा बोथाटय़ा चालविण्यास शिकणारे तरुण वाढत आहेतच. परंतु दहशतवादाशी लढण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही. बरे लष्करातील, पोलिसांतील भरतीसाठी ते हवे म्हणावे तर तेथे गेल्यानंतर ते शिकवतातच. शिवाय गोखले हे तरुणांनो, लष्करात जा असे सांगत नाहीत. तेव्हा त्यांना नक्कीच अशा शस्त्रप्रशिक्षित तरुणांच्या नागरी फौजा अपेक्षित असाव्यात. जर्मनीत होत्याच की तशा. स्टॉर्मट्रपर म्हणायचे त्यांना. राष्ट्राच्या शत्रूंसंगे ते लढायचे. विरोधक हे शत्रूच असतात. त्यांना ते मारायचे. त्यातून जर्मनीमध्ये समाजजीवनास एक सुंदर शिस्त लागली. तशी शिस्त भारतात यावी हीच तर गोखले यांची सदिच्छा आहे. एरवी ते नेहमी म्हणत असतात की, आपल्याकडे कोणी तरी हंटरवाला पाहिजे. देशात हुकूमशाही पाहिजे. अशा वेळी अनेकांना एकच प्रश्न पडत असेल की, मग आणीबाणीला आपण का बरे विरोध केला. असो. सामाजिक जबाबदार गोखले जे बोलले ते खासच जबाबदारीने होते. त्यामुळे त्यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नक्कीच असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा