सकाळी चिंतूला जाग आली तेव्हा त्याचे डोके कमालीचे दुखत होते. पॅरिसजवळच्या त्या प्रयोगशाळेतील किलोच्या वजनाच्या दंडगोलाकृती ठोकळ्याचे काही बरेवाईट झाले, तर जगात किती हाहाकार उडेल या काळजीने रात्रभर चिंतूच्या डोळ्याला डोळा लागला नव्हता. या काळजीने गेल्या सात वर्षांपूर्वीही त्याचे डोके पोखरायला सुरुवात केली होती. तेव्हा त्याने अशीच काही तरी बातमी वाचली आणि चिंतू नेहमीप्रमाणे चिंतातुर झाला. गेल्या जवळपास १४० वर्षांपासून वजनाचे जागतिक मान्यताप्राप्त परिमाण असलेल्या किलोग्रॅम या वजनाची फेररचना करायची झाली तर? .. या परिमाणाची व्याख्याच बदलावी लागेल, त्याच्यावर अवलंबून असलेल्या असंख्य परिमाणांना नवे रूप द्यावे लागेल.. पण नवी व्याख्या देताना त्याची निसर्गाच्या शाश्वत रूपाशी काही तरी सुसंगती तर असावी लागेलच ना?.. विचारांनी चिंतूच्या मनात केलेले घर दिवसागणिक अधिकच मजबूत होऊ लागले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी कुठे तरी चिंतूने एक बातमी वाचली आणि सात वर्षांचा हा मानसिक तणाव आता संपुष्टात येणार या समाधानाने त्याने जोरदार चुटकी वाजविली. चिंतेचा एक मुद्दा निकाली निघणार म्हणून चिंतूला आनंद झाला; तरीही नव्याच चिंतेचा एक भुंगा त्याच्या डोक्यात भुणभुण करू लागला. त्यामुळेच तर त्याला रात्रभर झोप नव्हती. दुखणारं कपाळ हाताने चेपतच चिंतू अंथरुणावरून उठला आणि त्याने संगणक सुरू केला. हे चिंतूचे चिंतामोचक यंत्र!. काहीही झाले की चिंतू त्याच्या पायाशी धाव घ्यायचा आणि थोडेफार शंकासमाधान झाले की डोक्यातल्या चिंतेचा भुंगा हळूहळू शांत व्हायचा. आजही तसेच होणार हे चिंतूला ठाऊक होते. किलोग्रॅमची नवी व्याख्या तयार करण्याच्या सात वर्षांपासूनच्या प्रयत्नांना अखेर यश येणार असे एक आशादायी चित्र त्याला एका बातमीत दिसले आणि चिंतूने सुस्कारा सोडला. त्याच्या डोक्यात वळवळणारा चिंतातुर जंतू शांत झाला होता.. तसे झाले, तर मेट्रिक मापन पद्धतीच्या सर्व सात आंतरराष्ट्रीय मापन एककांच्या व्याख्या अत्याधुनिक आणि ब्रह्मांडात कुठेही गेले तरी अचूक असतील, याची चिंतूला खात्री होती. याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला असून लवकरच किलोग्रॅमची नवी व्याख्या जन्माला येणार या जाणिवेने चिंतू सुखावला. तसेही, किलोग्रॅमची नवी व्याख्या  काय असावी यावर सात वर्षांपूर्वीच, पॅरिसमधील एका आंतरराष्ट्रीय परिषदेत खल झाला होता. त्यामुळेच तर चिंतूच्या डोक्यात चिंतेची मुळे रुजू लागली होती. नव्या व्याख्येची अचूकता अधिक व्यापक, म्हणजे नऊ दशांशापर्यंत अचूक ठरविण्याचा क्रांतिकारी प्रयोग लवकरच साकारणार या बातमीने चिंतूला बरे वाटले. आता किलो, सेकंद, अँपियर, केल्विन, कँडेला आणि मोल ही एकके नव्या स्वरूपात जगासमोर येतील, असा निष्कर्ष चिंतूने काढला आणि चिंतामोचन यंत्राचे आभार मानून त्याने संगणक बंद करण्याची कळ दाबली.. आता चिंतूला हलकेहलके वाटू लागले होते.चहाचा कप हाती घेऊन तो गॅलरीत उभा राहिला. रस्त्यावरून एक भाजीवाला चालला होता. त्याच्या टोपलीत वजनाचा काटा आणि काही मापे होती. चिंतूने ते पाहिले आणि  पुन्हा त्याच्या डोक्यात चिंतेचा किडा शिरला.. व्याख्या बदलली तरी मापात पाप करण्याची  सवय बदलेल का?.. चिंतू पुन्हा चिंतातुर झाला. त्याचे डोके पुन्हा जडावले होते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा