आठवडा उलटत आला तरी काहीच घडत नाही हे पाहून धृतराष्ट्र चिंतित झाला. अगोदरच सारं काही ठरलेलं असताना अजूनही काहीच कसं होत नाही, या काळजीनं त्याचा चेहरा काळवंडला होता. त्यानं संजयास हजर राहण्याचे फर्मान सोडलं आणि आसपासच्या हालचालींचा कानोसा घेत तो सिंहासनावर बसल्या जागीच चुळबुळ करू लागला. दाढीवरून हात फिरवत, नेमकं काय ठरलं असावं याचा तर्क करत असतानाच समोर हालचाली सुरू असल्याचा सुगावा लागून तो सावध झाला व सिंहासनावर सावरून बसत त्यानं संजयास हाक मारली. त्याचा तर्क बरोबर होता. समोर संजय हात बांधून ऐटीत उभा होता. ‘‘हे संजया, त्या चर्चाक्षेत्रावर जेव्हा ‘ते’ समोरासमोर आले तेव्हा काय घडलं, ते तू मजला आता सविस्तर सांग.. ठरलंय ठरलंय म्हणतात, पण अजून काहीच झालेलं नाही.’’ संजयानं घसा खाकरला. मान अधिक ताठ केली, आणि चष्म्याच्या काचेवरून उंचावर पाहात तो म्हणाला,  ‘‘महाराज, वाटाघाटींची बठक ठरली होती, पण ‘असं काहीच ठरलेलं नाही’ असं ते म्हणाल्यानं ठरलेलं रद्द केलं आपण.. ‘सुईच्या अग्रावर राहील एवढाही सिंहासनाचा वाटा देणार नाही,’ असंही ते म्हणाले’’..  अनावर राग न लपविता एका दमात संजयानं सांगून टाकलं, आणि पुन्हा त्याची नजर अंतराळात कुठे तरी स्थिरावली. जे कुणालाच दिसत नाही ते संजयास दिसतं, हे सर्वानाच माहीत असल्यानं, बोलताना तो नेमकं कुठे पाहतो याची कुणीच उत्सुकता दाखवत नसे. तसंच झाले. आता चर्चाक्षेत्रातील रित्या दालनावर संजयाची दिव्य दृष्टी पोहोचली होती. ‘‘हे असे काहीच ठरलं नव्हतं..’’ तो स्वत:शीच पुटपुटला. पुन्हा धृतराष्ट्रानं त्याच्या दिशेनं मान वळवली. ‘‘सुईच्या अग्रावर.. हे तर आपलं वाक्य आहे.. ते आपण म्हणावयाचं असं फार पूर्वीच ठरलेलं असताना, हे संजया, ते वाक्य त्यांच्या तोंडी कसं?’’ धृतराष्ट्रानं काहीशा रागातच विचारलं, आणि संजय गडबडला. आता खरं काय ते सांगूनच टाकायला हवं, हे त्यानं ओळखलं. ‘‘महाराज, आता भूमिका बदलल्या आहेत. तेव्हा आपण जे केलं ते आता त्यांनी करावयाचं आहे. तसं आधीच ठरलंय,’’ वरमल्या सुरात संजय म्हणाला. धृतराष्ट्रास भूतकाळ आठवला. आता सत्तेसाठी सुरू असलेला घोळ हादेखील ठरलेल्याचाच भाग असावा अशी शंका त्याच्या मनात चमकून गेली. पण तसं काहीच न दाखविता त्यानं विचारलं, ‘‘तसं असेल तर, हे संजया, आपलं जे काही ठरलंय त्याविषयी जनतेला आपण केव्हा सांगणार आहोत?’’ .. संजय पुन्हा लांबवर पाहू लागला. ‘‘महाराज, ते आपण नाही सांगायचंय.. तेच सांगणार आहेत. योग्य वेळी.. तसंच ठरलंय!’’  पुन्हा राग मनात गिळत संजयानं संयमानं सांगून टाकलं, आणि धृतराष्ट्रानं सुस्कारा सोडला. पुन्हा संजयाच्या दिशेनं मान वळवून त्यानं विचारलं, ‘‘असं ठरलं असेल तर, हे संजया, हा घोळ आणखी किती चालवायचा हेही ठरलंच असेल!’’ .. पुन्हा संजयानं संताप गिळला. ‘‘हो तेदेखील आमचं ठरलंय..,’’ संजय जोरात बोलला. आता धृतराष्ट्र समाधानानं दाढी कुरवाळत सिंहासनावरून उठू लागला. ते पाहून संजय हळूच पुटपुटला, ‘‘असं ते म्हणतात. आपण नव्हे!’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा