राजकीय क्षेत्रात घराणेशाही नसती, तर देशाचे आणि राजकारणाचे काय झाले असते याचा विचार तरी कधी आपण करतो का? या घराणेशाहीमुळेच नेतृत्वाची एक अखंड साखळी सदैव देशाला मिळत राहिली. घराणेशाहीचा वारसा असलेला उमेदवार म्हणजे विजयाची खात्री असलेला हुकमी एक्का! तो ज्या पक्षाच्या हाती लागला, त्याला निवडणुकीच्या जुगारातही डाव जिंकण्याची हमखास हमी! अशा वारसांमुळे विजयाची परंपरा कायम राहतेच, पण राजकीय पक्षांना आपल्या तंबूचा भक्कम आधारही त्याच्या रूपाने मिळत असतो. राज्यातील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे वजनदार नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसेतर पर्यायांची चाचपणी सुरू केल्याची वार्ता पसरताच, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आपापले दरवाजे अत्यानंदाने खुले करून पायघडय़ा अंथरण्याची तयारीही एव्हाना सुरू केली असेल. एक तर, विखे पाटील या नावाला त्यांच्या जिल्ह्य़ात विजयाचे वलय आहे, त्यात नव्या पिढीचा राजकारण प्रवेशच थेट संसद प्रवेशातून होणार असेल, तर नगरजनांसाठी तो परंपरेने अभिमानाक्षण ठरणार असल्याचे मानून विखेपुत्राचे पुढचे पाऊल कोणत्या दरवाजाकडे पडते यासाठी साऱ्या राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या असतील.. विखे पाटील यांच्या राजकारणाला एक परंपरादेखील आहे. याआधी सुजयरावांचे आजोबा, पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या राजकारणास प्रखर काँग्रेसनिष्ठेचा मुलामा असतानाही, मंत्रिपदाचा मुकुट मात्र शिवसेनेने त्यांच्या मस्तकावर चढविला होता. सत्तानंदाचा तो काळ सरताच ते पुन्हा मातृपक्षाच्या तंबूत दाखल झाले आणि पुन्हा काँग्रेसनिष्ठेचा प्रखर अध्यायही त्यांनी सुरू केला. त्यांचे चिरंजीव, सुजयरावांचे पिताश्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मस्तकावरही शिवसेनेनेच आनंदाने सत्तामुकुट चढविला होता. नगर जिल्ह्य़ातील हे दिग्गज कुटुंब काही काळाकरिताच आपल्या गळाला लागले आहे आणि ते केव्हाही स्वगृही परततील, तेथे त्यांचे जुन्याच जल्लोषात स्वागत होईल, हे माहीत असूनही, त्या त्या वेळी विखे पितापुत्र ज्या ज्या पक्षासोबत राहिले, तो काळ म्हणजे, विखे कुटुंबाहूनही, त्या राजकीय पक्षांचाच आनंदकाळ ठरला. त्यांच्या त्या तात्पुरत्या पदस्पर्शातून काँग्रेसेतर पक्षांना नगर जिल्ह्य़ात हातपाय पसरण्यास मोठी मदत मिळाली. विखे कुटुंबाच्या घराणेशाहीला अशी सत्तेची उज्ज्वल परंपरा असताना, त्याच परंपरेचे वारस असलेल्या सुजय विखे यांनी स्वत:ची उमेदवारी काँग्रेसेतर पक्षांना देऊ केली, ही खरे तर त्या पक्षांसाठी मोठी दिलाशाची बाब म्हणावी लागेल. सुजय विखे यांच्या उमेदवारीच्या देकारामुळे पुन्हा नगरच्या राजकारणावर नवी पकड बसविण्याची स्वप्ने अनेक राजकीय पक्षांना एव्हाना सुरूदेखील झाली असतील. आता, खरोखरीच सुजय विखे आपल्या कुटुंबाचा पक्षबदलाचा वारसा पुढे चालवून नगरजनांच्या सेवेचा वसा घेणार, की केवळ दबावतंत्राचा वापर करून स्वपक्षाच्या उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेणार, एवढाच प्रश्न उरतो. काहीही झाले तरी वसा आणि वारसा यांत विखेंची पुढची पिढी मागे नाही, याची नगरवासीयांना हमी तरी मिळणारच आहे..

Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Ramdas Athawale, Panvel Candidate Prashant Thakur,
राहुल गांधी यांच्या अनेक पिढ्या आल्या तरी संविधान बदलू शकणार नाहीत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
Vidhan Sabha Elections, Elections Pune City,
विचार करण्याची हीच ती वेळ…