शहरांनजीकची अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने हे वन्यजीवांचे वसतिस्थान असते, हा समज आता आपण हळूहळू पुसून टाकायला हवा. कारण तेथे राहणारे प्राणी आता ‘वन्यजीव’ राहिलेले नाहीत. अशा अभयारण्यांचे आणि राष्ट्रीय उद्यानांचेच पूर्ण शहरीकरण झाले असल्याने कधीकाळीचे हे वन्यजीव आता ‘नागरी प्राणी’ झाले आहेत. या प्राण्यांचे नागरीकरण होऊ  लागलेले असल्याने, नागरीकरणाचे जेवढे दुष्परिणाम नागरी वस्तीतील माणसांना भोगावयास लागतात, त्या साऱ्या दुष्परिणामांचा सामना करण्याची किंवा ते पचविण्याची शक्ती या प्राण्यांनी स्वत:हून अंगी जोपासावयास हवी. भारतात दर वर्षी लाखो माणसे प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात, कित्येक वन्यजीव रेल्वेखाली सापडून किंवा वाहनांच्या धडकांमुळे मरतात आणि हजारो वन्यजीव प्लास्टिक खाऊन मरणपंथाला लागतात. प्रगतीच्या हव्यासापोटी निर्माण केलेल्या विकासातून समोर येणाऱ्या प्रदूषणासारख्या संकटांतून जिथे स्वत:ला वाचविणेच मुश्कील झाले आहे, तिथे प्राण्यांच्या जिवाची पर्वा करण्यास माणसाला वेळही नाही. हे समजून घेण्याचे शहाणपण प्राण्यांना येणार नसेल, तर शहरांनजीकच्या राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यांमध्ये राहण्याची त्यांची लायकी नाही, हेच स्पष्ट आहे. अभयारण्ये किंवा राष्ट्रीय उद्याने आणि तेथे राहणारे प्राणी ही शहरी माणसाच्या विरंगुळ्यासाठी आणि करमणुकीसाठी निर्माण केली गेलेली व्यवस्था आहे, हे या प्राण्यांना एव्हाना कळून चुकले असेल.. ही समजूत अंगवळणी पडली तरच तिथल्या जगण्यासाठी अनंत मरणे झेलून घेण्याची उमेद जिवंत राहील. तसेही, माणसाचा शेजार सुरक्षित नाही, हे अभयारण्यांमधील प्राण्यांना उमगले असले तरी आता त्यांचे तेच प्राक्तन आणि तेच भविष्य आहे. कारण त्यांच्यासाठी अरण्ये, जंगले राखून ठेवण्याएवढी जागा माणसाकडे नाही. मुळात विकासासाठी उपलब्ध असलेली जमीनही अपुरी असल्याने नैसर्गिक जंगलांनाच कधी ना कधी निरोप घ्यावा लागणार आहे. माणसांना हवी असलेली जागा व्यापून झाल्यानंतर उरेल तेवढय़ाच जागेवर आणि माणसांच्याच मेहेरबानीवर वन्यप्राण्यांनाही राहावे आणि जगावे लागणार असल्याने, अभयारण्यांमध्ये जीव मुठीत धरून राहण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मुंबईशेजारच्या पनवेलजवळील रसायनी येथे इस्रोच्या इंधननिर्मिती प्रकल्पातून झालेल्या वायुगळतीमुळे कर्नाळा अभयारण्यातील ३१ माकडे आणि १४ पक्षी गुदमरून मृत्युमुखी पडले आणि या मृत्युकांडाचा सुगावादेखील लागू नये यासाठी त्यांचे मृतदेह मातीखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. कर्नाळा अभयारण्यातील प्राण्यांचे नागरीकरण झाले आहे, हाच त्याचा अर्थ! या नागरी प्राण्यांच्या जगण्यावर आता मृत्युभयाचे सावट दाटले आहे. अभयारण्यात आता निर्भयपणे जगण्यासारखे आश्वस्त वातावरण उरलेले नाही. नागरीकरणाचे प्रदूषित वारे तेथे घुटमळत आहेत.. आणि प्रदूषणाच्या विळख्यात घुसमटलेल्या माणसाप्रमाणेच, प्राण्यांनाही नागरीकरणाच्या समस्येतून उभ्या राहणाऱ्या आव्हानांशी सामना करावा लागणार आहे. माणसाप्रमाणेच प्राण्यांचेही जगणे बेभरवशाचे झाले आहे. संकटे येतच राहतील, त्यातून जगतील ते जगतील, बाकीचे मरतील, हा धडा प्राण्यांनीही शिकून घ्यायला हवा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा