पक्षाच्या साक्षीदार सेलतर्फे आयोजित कार्यकर्ता प्रबोधन वर्गात आपले स्वागत आहे. जगातील सर्वात मोठा अशी ओळख असलेल्या आपल्या पक्षातर्फे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या या सेलमधील निष्ठावान कार्यकत्र्यांनी नुकतीच एका जहाजावर लक्षणीय कामगिरीची नोंद केली. त्याबद्दल मी सर्वसंबंधितांचे व सेलप्रमुखाचे अभिनंदन करतो. राष्ट्र व देशहितासाठी भविष्यात अशीच कामे सर्वांकडून व्हायला हवी, पण त्याआधी प्रत्येकाने घ्यायची काळजी व खबरदारी यावर आज मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. या सेलच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा छुपा अजेंडा राबवला जात आहे असे आरोप सातत्याने होत असले तरी सेलमधील प्रत्येकाने त्यावरून विचलित होऊ नये, तसेच पक्षाच्या भूमिकेला विरोध म्हणजे राष्ट्राला विरोध हे सूत्र कायम लक्षात ठेवावे. अमली पदार्थ, करचोरी, भ्रष्टाचाराची प्रकरणे हाताळताना व त्यासाठी तपास यंत्रणांना ‘सक्रिय’ सहकार्य करताना ‘सावज’ जर सेलिब्रिटी असेल तर सेल कार्यकर्त्यांने त्याची ओळख उघड केली तरी हरकत नाही. कारण अशा प्रकरणात अवाजवी मिळणारी प्रसिद्धी पक्षासाठी फायद्याचीच असते, तसेच सेलिब्रिटींच्या वर्तुळात धाक निर्माण करण्यासाठी पुरेशी असते. राजकीय विरोधकांना ‘लक्ष्य’ करताना मात्र कार्यकत्र्यांनी ओळख गुप्त ठेवावी. अशा प्रकरणात साक्षीदार होणेसुद्धा टाळावे. सेलच्या माध्यमातून प्रशिक्षित करण्यात आलेल्या सर्वांची नावे विविध तपास यंत्रणांना आधीच कळवण्यात आलेली आहेत. त्यामुळे कारवाई कुणावर हे विचारूनच त्यातला आपला सहभाग किती हे निश्चित करावे. गैरव्यवहार व कृत्यांची माहिती गोळा करण्याचे काम गुप्तहेरासारखेच. त्यामुळे अनेकदा वेशांतर करणे वगैरे ओघाने आलेच. त्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था लवकरच पक्षातर्फे केली जाणार आहे. यात ‘राष्ट्रभक्त’ कलावंत तुम्हाला मार्गदर्शन करतील. अशी गुप्त माहिती गोळा करताना कोणत्याही कार्यकर्त्यांला पैशाचा मोह होणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. असे प्रकरण उघडकीस आलेच तर पक्ष हात झटकेल व संबंधितांचा ‘योग्य’ बंदोबस्त केला जाईल. अमली पदार्थाची प्रकरणे हाताळताना त्याच्या आहारी जाणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. आपल्या देशात साक्षीदार होणे हा अनेकांचा धंदा होता. काहींसाठी उपजीविकेचे साधन होते. हे चित्र बदलून टाकण्याचे पक्षाने ठरवले, म्हणूनच हा सेल तयार झाला. तेव्हा ‘देशहितासाठी साक्षीदारी’ हे सूत्र प्रत्येकाने लक्षात ठेवावे. या सेलच्या माध्यमातून समाजसेवेचे एक वेगळे दालन पक्षाने उघडून दिले आहे हे कायम ध्यानात ठेवत कामगिरी पार पाडताना उच्च दर्जाच्या नैतिकतेला प्राधान्य द्यावे. अनेकदा गैरकृत्ये मिळवण्यासाठी ‘खोदकाम’ करताना अचानक स्फोटक माहिती हाती मिळते. अशा वेळी तात्काळ सेलप्रमुखाशी संपर्क साधावा व त्यांच्या सूचनेनंतरच पुढे जावे. गैरकृत्ये कशी मिळवायची यावर आपल्याच पक्षाच्या एका लेखापालाकडून वेळोवेळी होत असलेले मार्गदर्शन कायम लक्षात ठेवावे. तपास यंत्रणेसोबत काम करताना त्यातला कुणी ‘फुटीर’ तर झाला नाही ना यावर बारकाईने लक्ष ठेवावे व तसे आढळल्यास तात्काळ वरिष्ठांना ‘एसओएस’ करावा. गैरकृत्ये उघडकीस आणणे हे जोखमीचे काम; त्यात बरेचदा गुप्तपणे वावरावे लागते. त्यामुळे यात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना नंतर पक्षात मोठी जबाबदारी दिली जाईल अशी हमी मी या ठिकाणी सर्वांना देतो. गैरकृत्य उघड करणे ते साक्षीदार होत प्रकरण तडीस नेणे हा प्रवास देशभक्तीचा नवा मार्ग आहे. या मार्गावरची आपली वाटचाल वेगवान व समर्थपणे होईल व या सेलचे नाव जगभर आदराने घेतले जाईल अशी आशा मी व्यक्त करतो व माझ्या विचारांना विराम देतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा