मंदिरात महिलांना प्रवेशबंदी ही जशी परंपरागत अंधश्रद्धा, तशीच, मंदिरप्रवेशाची परंपरागत बंदी मोडल्यास देवाचा कोप होतो हीदेखील अंधश्रद्धाच! अशा अंधश्रद्धा संपवायच्या असतील तर त्यांना ‘मूठमाती’ देणे हादेखील अंधश्रद्धेचाच एक प्रकार असतो. मध्यंतरी, महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्यास अंधश्रद्धा निर्मूलनाचा साक्षात्कार झाला आणि त्याने आपल्या बोटांतील ग्रहाचे खडे असलेल्या अंगठय़ांचे समुद्रात ‘विसर्जन’ केले. त्याने या अंगठय़ा ‘फेकून’ दिल्या नाहीत, तर त्यांचे ‘विसर्जन’ केले हे जेव्हा लोकांच्या लक्षात आले, तेव्हा ‘विसर्जन’ विधीच्या अंधश्रद्धेवरील अनेकांची श्रद्धा दृढ झाली होती असे म्हणतात. शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशबंदीची परंपरागत अंधश्रद्धा उधळून लावण्यासाठी झालेल्या आंदोलनास झालेला स्थानिकांचा प्रखर विरोध, त्यातून भडकलेली आंदोलने आणि ती मोडून काढण्यासाठी बळाचा वापर झाल्याने राज्यात निर्माण झालेली अशांतता हा तर त्या देवाच्या कोपाचाच प्रकार आहे, अशी एक समजूत नंतर अंधभाविकांमध्ये पसरली. ही समजूत पुसून टाकण्यासाठी कठोर प्रयत्न करण्याऐवजी अशा समजुतींना खतपाणी मिळेल अशाच प्रसंगांची मालिका का सुरू व्हावी, हे एक गूढच आहे. देवाचा कोप झाल्यामुळेच ही अशांतता माजली, अशी कुजबुज शबरीमला परिसरात आणि अंधभाविकांमध्ये सुरूदेखील झाली. त्यात आता आणखी एका समजुतीची भर पडली आहे. परंपरेच्या विरोधात जाऊन पोलीस संरक्षणात मंदिरप्रवेश करणाऱ्या कांचनदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांवरही अय्यप्पा स्वामीचा कोप झाला असावा, असा अंधविश्वासपूर्ण दावा अंधभाविकांमध्ये झपाटय़ाने फोफावतो आहे. मंदिरप्रवेशानंतर अज्ञातवासात वावरणारी कांचनदुर्गा घरी परतताच तिचे सासूशी झालेले कडाक्याचे भांडण आणि त्यातून सासूने केलेली मारहाण हा परंपरा मोडल्याने झालेल्या प्रकोपाचाच परिणाम असल्याचे छातीठोक दावे एव्हाना अंधभाविकांमध्ये सुरू झाले असतील. सासू आणि सून यांच्यातील ‘सौहार्दा’च्या चित्रवाणी मालिका घराघरांत लोकप्रिय होऊ लागलेल्या असतानाच कांचनदुर्गाच्या सासूने तिला केलेल्या मारहाणीच्या बातमीची सुरस फोडणी या कथांना मिळाली आहे. मंदिरप्रवेश करून परंपरा मोडल्याच्या उद्धटपणाची शिक्षा म्हणून सासूने लाकडी दंडुक्याने कांचनदुर्गास मारहाण केली, असे म्हणतात. कांचनदुर्गा आणि तिच्या सासूच्या भांडणाची आणि त्यातून झालेल्या मारहाणीची ‘बातमी’ झाली, आणि ती सर्वदूर पसरली. जखमी कांचनदुर्गा आता इस्पितळात उपचार घेत आहे. सासू-सुनेच्या भांडणाची ठिणगी नेमकी कोणत्या संघर्षांतून उडाली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पण अंधश्रद्धाळूंना देवाच्या कोपाचा एक नवा पुरावा हाती लागला आहे, हे मात्र खरे. सासूने केलेली मारहाण हे कांचनदुर्गाच्या पापाचे फळ आहे, असे कुणी म्हणत असेल, तर या अंधश्रद्धांचे विसर्जन कसे करणार? अंधश्रद्धांना ‘मूठमाती’ देण्याऐवजी किंवा त्यांचे ‘विसर्जन’ करण्याऐवजी त्या निष्ठुरपणे ‘गाडून टाकण्या’चा विचार बळावत नाही, तोवर अंधश्रद्धांवरील श्रद्धा दूर सारता येणे अवघडच आहे. असेच होत राहिले तर त्यापुढे कायदे तरी काय करणार?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा