सर्व भारतीय नागरिकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देण्याचा निर्धार आपल्या प्रजासत्ताकाने केल्याचा असा उल्लेख राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतच असून घटनेच्या १९व्या अनुच्छेदात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा नेमका ऊहापोह आहे. गेल्या काही वर्षांत अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी समाजमाध्यमी विचारमंचांवर वादळी मंथन  होऊन समाज अधिक प्रगल्भदेखील झालेला असल्याने, या स्वातंत्र्याच्या जाणिवा अधिक प्रखर होणे साहजिकच आहे. राज्यातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे वारे पिऊन बहुधा राज्यातील पशुपक्षीदेखील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर मिरवू लागले असले, तरी ते स्वातंत्र्य माणसांखेरीज अन्य कोणत्याही  सजीवास नाही, हे त्यांना कोणी तरी वेळीच समजावून सांगावयास हवे. माणसांच्या माणुसकीचा गैरफायदा घेऊन कोणी पशू वा पक्षी, आपल्यालाही अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे असे समजू लागला असेल, तर त्याला त्याच्या मर्यादांची योग्य जाणीव करून देण्याची हीच  योग्य वेळ आहे. यासाठी चळवळ उभारली पाहिजे, आणि ती खंबीरपणे चालविणारे नेतृत्व पुढे आले पाहिजे. सांप्रतकाळी आणि परंपरेनेदेखील अशा कामात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या पुण्यनगरीत या चळवळीची मुळे रुजू लागली आहेत, हे एव्हाना सर्वाच्या लक्षातदेखील आले असेल. माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क स्वतकडे घेऊन माणसांच्या झोपेच्या नैसर्गिक हक्कावर गदा आणणाऱ्या एका कोंबडय़ास धडा शिकविण्यासाठी पुढाकारघेऊन पुण्यातील एका अज्ञात व्यक्तीने- बहुधा महिलेने- या चळवळीचे नेतृत्व करण्यास आपण सक्षम आहोत, हे दाखवून दिले आहे. माणसे जेव्हा साखरझोपेत असतात, मधुर स्वप्नांची पखरण सुरू असते, नेमके तेव्हाच, नको त्या  वेळी ओरडून झोपमोड करणाऱ्या एका कोंबडय़ावर कारवाई करण्याची मागणी एका तक्रारीद्वारे पुणे पोलिसांच्या दप्तरी दाखल झाली असल्याने, आता ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’चे व्रत घेतलेल्या पोलिसांना आरोपीस न्यायदेवतेपुढे हजर करावेच लागेल. हा एका कोंबडय़ाच्या आरवण्याचा प्रश्न नाही, तर वेळी-अवेळी आरडाओरडा करून आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा टेंभा मिरविणाऱ्या पशू वा पक्ष्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव करून देण्याचा गंभीर मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. आजवर माणसाने केवळ माणुसकीपोटी पक्ष्यांना मुक्तविहाराची आणि मुक्त अभिव्यक्तीची मुभा दिली, ते भरपूर झाले. त्याचाच परिणाम म्हणून, पहाटेच्या वेळी ओरडून माणसांचीच झोपमोड करण्याचा बेमुर्वतपणा आता सहन केला जाणार नाही, याची जाणीव या पक्ष्यांना करून दिलीच पाहिजे. पुण्याचे पोलीस आता कोणाच्या बाजूने उभे राहतात हेदेखील यानिमित्ताने स्पष्ट होणारच आहे. केवळ चांगुलपणाच्या भावनेने मुभा देऊन, पहाटेच्या वेळी होणाऱ्या पक्ष्यांच्या आरडाओरडीस चिमण्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांची किलबिल, मनेचे मंजूळ गाणे, मोराची केका, कोकिळेचे सप्तकातील कूजन.. अशी गोंडस नावे दिली गेली. त्या सुरांच्या साथीने मनामनांमध्ये कवितेची बीजेही रुजली, आणि पक्ष्यांच्या आवाजाला निसर्गाचे गाणे मानले जाऊ लागले. पण आता ते दिवस गेले. माणसाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचे ते अतिक्रमणच आहे, हे याआधी लक्षात आले नसले म्हणून काय झाले? चुकांची दुरुस्ती होऊ शकत नाही का? पहाटपक्ष्यांचा किलबिलाट हे झोपमोड होण्याचे निमित्त आहे, हे याआधी कधीच न सुचलेले शहाणपण पुण्यातील तक्रारीमुळे आता सुचलेच आहे, तर त्याचे निमित्त करून पक्ष्यांच्या अभिव्यक्तीच्या मुस्कटदाबीची चळवळ हाती घेण्यास काय हरकत आहे?

Story img Loader