‘गरिबी ही मानसिक अवस्था आहे’ या विचाराचा जन्म झाला, तेव्हा त्याची पुरेपूर खिल्ली उडविली गेली. भरपूर वादही झाले. असे विचारमंथन झाले की त्यातून निघणारा निष्कर्ष हा ‘सिद्धान्त’ असतो, असे म्हणतात. जेव्हा यावर घनघोर चर्चा, वादावादी आणि विचारमंथन झाले, तेव्हाही एक निष्कर्ष काढला गेला. त्यानुसार गरिबी ही मानसिक अवस्था नसून ती एक भौतिक स्थिती आहे व माणसाच्या राहणीमानावर, जीवनशैलीवर त्याचा थेट परिणामही होत असतो. तो निष्कर्ष तसा अपेक्षितच होता. कारण तसे झाले नसते, तर गरिबीची व्याख्या करणेच अवघड झाले असते. गरीब कोणास म्हणावे याचीच निश्चिती नसेल, तर दारिद्रय़रेषा कशी ठरविणार आणि ती उंचावणार कशी, हा बिकट राजकीय प्रश्नही निर्माण झाला नसता. त्यामुळे गरिबीला भौतिक अस्तित्व देणे गरजेचे होतेच. महाराष्ट्रात दोन कोटी लोकसंख्या गरीब अवस्थेत जगते, असा निष्कर्ष जागतिक बँकेने काढला. देशातील बहुसंख्य जनता आजही दारिद्रय़ात खितपत पडलेली आहे, याचे तडाखेबंद दाखले देत प्रचारांची भाषणे केली गेली आणि गरिबीची मूर्तिमंत रूपे म्हणून महानगरांतील बकाल, कंगाल झोपडपट्टय़ांकडे बोटेही दाखविली गेली. अशा  प्रकारे, ‘गरिबी ही मानसिक स्थिती नसून ती भौतिक अवस्थाच आहे’, यावर शिक्कामोर्तब झाले. हे होत होते, तेव्हा एका चंद्रमौळी झोपडीच्या झरोक्यातून जगाकडे पाहत गरिबी नावाची एक स्थिती स्वत:शीच खदखदून हसत होती. मुंबईच्या गोवंडीतील एका झोपडपट्टीत, हीच गरिबी रात्रीच्या वेळी धनाच्या राशींवर लोळत पडलेली असायची, असे कुणी सांगितले असते, तर त्याची खिल्लीच उडविली गेली असती. दिवसभर श्रीमंतांच्या जगासमोर केविलवाण्या चेहऱ्याने हात पसरणारी ही गरिबी, संध्याकाळी आपल्या चंद्रमौळी झोपडीत परतल्यानंतर मात्र, गोणींमध्ये कैद करून ठेवलेल्या लक्ष्मीच्या राशीकडे बघून खदाखदा हसायची आणि त्यावर लोळण घेत, दुसऱ्या दिवशीच्या हात पसरण्याच्या उद्योगाचा सराव करायची.. मुंबईसारख्या महानगरात, भीक मागणे हे परिस्थितीमुळे ओढवलेले संकट नसून संघटित व्यवसाय आणि अनेक कुटुंबांच्या कमाईचा हुकमी मार्ग आहे. ही कुटुंबे या व्यवसायासाठी दररोज सकाळी घराबाहेर पडतानाच, गरिबी नावाच्या सोबतिणीस काखोटीला मारून रस्तोरस्ती हात पसरतात आणि त्या कमाईतूनच इमलेही बांधतात, हेही अनेकदा उघडकीस आले आहे. आता तर, श्रीमंतीच्या राशीवर लोळणाऱ्या गरिबीचे नवे रूपच प्रत्यक्ष समोर आले आहे. बिरडीचंद आझाद नावाचा एक वृद्ध भिकारी कित्येक वर्षे गरिबी पांघरून, श्रीमंतीच्या राशीवर लोळतच जगला. परवा एका अपघातात त्याचा अंत झाला, तेव्हा त्याच्या घरातील अनेक गोण्यांमध्ये लाखो रुपयांची नाणी आणि बँकेतील लाखोंच्या ठेवींच्या रूपाने कोंडल्या गेलेल्या श्रीमंतीने सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. गरिबी झाकायची असते आणि श्रीमंती उधळायची असते, अशी समजूत असलेल्या या जगात, हा बिरडीचंद श्रीमंती झाकून ठेवून गरिबी उधळत राहिला. यात दोघींचीही घुसमट झाली असणार यात शंका नाही. भीक मागण्याचा व्यवसाय करणाऱ्या बिरडीचंद आझादचा अंत झाल्यानंतर आता दोघींनाही आपापल्या सुटकेचा मार्ग सापडला असेल. त्याच बकाल झोपडीत राहायचे की नाही, यावर गरिबी आणि श्रीमंती यांच्यात वादही झाला असेल.. एक गोष्ट मात्र नक्की.. श्रीमंतीने आता त्या झोपडीतून गाशा गुंडाळलाच असेल! कारण ती स्वत:च ‘आझाद’ झाली आहे!

Story img Loader