आयुष खात्याच्या- म्हणजे पूर्वापार अल्पबुद्धीची सरकारे ज्याला आरोग्य खाते म्हणत, त्या खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा कारभार सांभाळणारे श्रीपादराव नाईक यांना वर्षभरानंतरचे त्यांचे काम आतापासून खुणावू लागले असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचे अभिनंदनच केले पाहिजे. कर्करोगाच्या उपचार पद्धतीत क्रांती झाल्याचे पुढल्या वर्षी शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध होणार असल्याची त्यांची अटकळ खरी ठरली रे ठरली, की त्यांचे काम वाढणारच आहे. म्हणजे मग मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयासह अन्य अनेक संस्थांमधील केमोथेरपी अर्थात किरणोपचार विभाग ‘आवश्यकता नसल्यामुळे’ बंद करावे लागतील. या विभागांमध्ये जे वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचारी सध्या आहेत, त्यांना बेरोजगारीपासून रोखण्यासाठीची पावले आयुष मंत्रालयालाच उचलावी लागतील. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या रविवार आवृत्तीस नाईक यांनी दिलेल्या मुलाखतीतील बोल तंतोतंत खरे ठरले, तर हे सारे करावेच लागेल. खरे तर कुणाही देशाभिमानी आणि बुद्धिमान व्यक्तीला त्या संभाव्य परिस्थितीवर एकच उपाय दिसू शकतो आणि तो म्हणजे किरणोपचार विभागातील या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आतापासूनच अनुक्रमे योगशिक्षक, सह-योगशिक्षक, योगशिक्षण परिचारक आदी नव्या पदांसाठीचे कौशल्य-प्रशिक्षण देणे. तेव्हा देशाभिमान आणि बुद्धी या दोहोंचा मान राखून जे उपाय व्हायचे आहेत ते होतंीलच, पण मूळ विषय क्रांत्योत्तर उपाययोजनांचा नसून क्रांती ज्यामुळे होणार आहे त्या इलाजाचा किंवा उपचार पद्धतीचा आहे. कर्करोगावरील ही संभाव्य शास्त्रीय उपचार पद्धती म्हणजे योग, एवढेच आयुष राज्यमंत्र्यांचे म्हणणे नसून ‘योगाला नियमित दिनचर्येचा भाग बनविल्यास केमोथेरपीची गरज भासत नाही’ असे विधान त्यांनी कागदपत्रांच्या आधारे केले आहे. ही कागदपत्रे थेट पंतप्रधानांच्या हस्तेच दिल्लीला पोहोचली आहेत, असाही अर्थ नाईक यांच्या मुलाखतीतून निघतो, कारण ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरूला आले असता त्या शहरातील ‘स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थाना’चे म्हणजेच ‘एस-व्यासा’ या अभिमत विद्यापीठाचे प्रमुख आणि मोदी यांचे वैयक्तिक योगगुरू एच. आर. नागेंद्र यांनीच त्यांना याविषयीची कागदपत्रे सुपूर्द केली’ अशी माहिती नाईक यांनी या मुलाखतीत दिली आहे. हा झाला तपशिलाचा भाग, पण आता यापुढले वर्षभर, कर्करोगावरील या योग-उपचार पद्धतीला ‘शंभर टक्के यश’ मिळेपर्यंत थांबून, त्याची शास्त्रीयता पडताळून आयुष मंत्रालय या उपचार पद्धतीला मान्यता देणार आहे आणि त्यानंतर किरणोपचाराची गरज राहणार नाही आणि हे सारे होण्यासाठी पुढले वर्ष उजाडेल, हा दिव्य संदेश नाईक यांनी या मुलाखतीतून देशवासीयांपर्यंत पोहोचवला आहे. थोडक्यात, जे पाश्चात्त्य ज्ञान आणखी अवघ्या तीनशे पासष्ट दिवसांत टाकाऊ आणि कुचकामी होणारच आहे, त्याची साथ आतापासून सोडणे बरे, असा या दिव्य संदेशाचा अर्थ साऱ्याच बिगरपाश्चात्त्यांनी काढावा, हे उत्तम.

Story img Loader