व्यावसायिक टेनिसमध्ये नवनवीन खेळाडू सातत्याने अनपेक्षित कामगिरी करीत असले, तरीही ग्रँड स्लॅमचे विजेतेपद मिळविणे सोपे नाही. त्याकरिता अहोरात्र कष्टप्रद तयारी व निष्ठा आवश्यक असते. रॅफेल नदाल व सेरेना विल्यम्स या बुजुर्ग खेळाडूंनी आपण अद्यापही टेनिसचे अनभिषिक्त सम्राट आहोत याचाच प्रत्यय घडविला. विजेतेपद मिळविणे सोपे असते, पण ते टिकविणे हे अवघड असते. तथापि, नदाल या स्पॅनिश खेळाडूने आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून लाल मातीचा आपण निर्विवाद बादशहा आहोत हे सिद्ध केले. विल्यम्स भगिनींची टेनिसमधील सद्दी संपली, अशी टीका करणाऱ्यांना सेरेना हिने अकरा वर्षांनी पुन्हा रोलँ गॅरोस मैदानावर विजेतेपद मिळवीत चोख उत्तर दिले. ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविणे सोपे नसते. आजकाल सर्बिया, रशिया, स्पेन, अमेरिकन, चेक प्रजासत्ताक आदी देशांमधील नवनवीन स्पर्धक अव्वल दर्जाच्या स्पर्धामध्ये आश्चर्यजनक निकाल नोंदवू लागले आहेत. तरीही टेनिसमधील जागतिक क्रमवारीकडे पाहिले असता असे लक्षात येते की, पहिल्या चार मानांकित खेळाडूंमध्ये फारसा फरक पडलेला नाही. एरवी सव्र्हिस टाका आणि गुण मिळवा असे अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धाबाबत सांगितले जाते, मात्र फ्रेंच स्पर्धा त्यास अपवाद आहे. लाल मातीच्या कोर्टवर थांबा व फटका मारा, अशी शैली महत्त्वाची मानली जाते. नदाल याची या कोर्टवरील हुकमत काही औरच आहे. या डावखुऱ्या खेळाडूकडे बेसलाइनवरून परतीचे फटके मारणे व प्रतिस्पर्धी खेळाडूच्या बेसलाइनजवळ फटके मारणे याबाबतचे कौशल्य अतिशय लाजवाब आहे. त्याचा पासिंग शॉट प्रतिस्पर्धी खेळाडूस थक्क करणारा असतो. नेटजवळून प्लेसिंग करण्याची त्याची शैली प्रभावीच आहे. केवळ क्ले कोर्ट नव्हे तर अन्य कोर्ट्सवरही त्याने अव्वल यश मिळविले आहे. ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन व अमेरिकन या तीनही ग्रँड स्लॅम स्पर्धा त्याने एकदा जिंकल्या आहेत; यावरून त्याचे अष्टपैलुत्व सिद्ध होते. ऑलिम्पिकमध्येही त्याने अजिंक्यपदाची कमाई केली आहे. अनेक वेळा त्याच्या कामगिरीची बियोन बोर्ग याच्या कामगिरीशी तुलना केली जाते. बोर्गने विम्बल्डन स्पर्धा पाच वेळा जिंकली, पण त्याचबरोबर त्याने फ्रेंच स्पर्धेतही सहा वेळा अजिंक्यपद मिळविले. नदालप्रमाणेच सेरेना हिचे विजेतेपदही कौतुकास्पद म्हटले पाहिजे. तिने या स्पर्धेत यापूर्वी २००२ मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. अतिशय जिगरबाज व लढवय्यी खेळाडू म्हणून तिची ख्याती आहे. दुखापत, आजारपण व खराब कामगिरी यामुळे अनेक वेळा तिची कारकीर्द संपुष्टात येण्याची वेळ आली होती. मात्र फिनिक्स पक्ष्याप्रमाणे तिने अनेक अडचणींवर मात करीत, टीकाकारांना तोंड देत कारकिर्दीत समर्थपणे पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियन, अमेरिकन व विम्बल्डन या स्पर्धामध्ये तिने अनेक वेळा विजेतेपदांची कमाई केली आहे. एवढेच नव्हे, तर गतवर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये विजेतेपद मिळवीत आपल्या चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडविला आहे. तिने केवळ एकेरी नव्हे तर आपली बहीण व्हीनस हिच्या साथीत दुहेरीतही अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. दुहेरीतही अमेरिकेस ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे. खेळाडू जुने झाले तरी त्यांची खेळावरील निष्ठा, प्रेम व हुकमत कमी होत नाही.
टेनिसचे अनभिषिक्त सम्राट
व्यावसायिक टेनिसमध्ये नवनवीन खेळाडू सातत्याने अनपेक्षित कामगिरी करीत असले, तरीही ग्रँड स्लॅमचे विजेतेपद मिळविणे सोपे नाही. त्याकरिता अहोरात्र कष्टप्रद तयारी व निष्ठा आवश्यक असते. रॅफेल नदाल व सेरेना विल्यम्स या बुजुर्ग खेळाडूंनी आपण अद्यापही टेनिसचे अनभिषिक्त सम्राट आहोत याचाच प्रत्यय घडविला. विजेतेपद मिळविणे सोपे असते, पण ते टिकविणे हे अवघड असते.
First published on: 11-06-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncrowned king of tennis game