कबीरांची जी रमैनी आपण पाहिली तिचा शेवट नामतत्त्वाचं गहन गंभीर रूप सांगून होतो. रमैनीच्या सुरुवातीला मुक्तीचं स्वरूप पढत पंडितांना विचारलं. वेदाचं शाब्दिक ज्ञान सांगू नका, असंही बजावलं. त्याच्या पुष्टीसाठी, वेद स्थापित करणाऱ्या ब्रह्माजींनाही मुक्तीचं मर्म माहीत नाही, हे ठासून सांगितलं. शाब्दिक ज्ञानाचा आधार शब्दच असतात. ते शब्द जिथे मावळतात त्या नामतत्त्वाचा उल्लेख केला आणि त्यातच शाश्वतता आहे, हे सांगितलं. धर्माची तत्त्वं शब्दांमध्ये नोंदली गेली आणि पिढय़ान्पिढय़ा शब्दांच्याच माध्यमातून संक्रमित झाली. पण धर्म शब्दांपुरता राहून साधत नाही. जो आचरणात येऊ शकतो तोच खऱ्या अर्थानं धर्म असतो. धारयति इति धर्म:! तो धारण करता येतो, तो धारणा घडवितो. पण जिथे त्या तत्त्वांची धारणा नसते आणि धर्माचा आपापल्या मती आणि गतीप्रमाणे अर्थ लावून बाह्य़ांगाचाच अट्टहास सुरू असतो तिथे अंतरंगात अधर्मच शिरतो. कबीरांसारखे सत्यमार्गदर्शक म्हणूनच अनेक प्रसंगांतून भ्रमाचे पडदे दूर करून धर्माचं वास्तविक रूप प्रकट करतात. एक पंडित गंगाजलाची महती गात होता. गंगेचं पाणी कसं अपावित्र्य नष्ट करतं ते सांगत होता. कबीरांनी आपल्या लोटय़ातलं गंगाजल त्याला प्यायला दिलं. तो खवळला. ‘एका मुसलमान विणकराच्या लोटय़ातलं पाणी पिऊन मी भ्रष्ट होऊ?’, असं त्यानं रागानंच विचारलं. कबीर म्हणाले, जे गंगाजल हा लोटासुद्धा पवित्र करू शकत नाही ते तुमचं हृदय काय पवित्र करणार? असेच एकदा एक दरवेश जहाँ गस्त शाह हे कबीरांची किर्ती ऐकून त्यांच्या भेटीला निघाले. ते येत आहेत हे कळताच कबीरांनी दाराशी एक डुक्कर बांधलं. दरवेशसाहेब आले आणि दाराशी डुकराला पाहून त्यांना धक्काच बसला. ते तसेच परत फिरू लागले. कबीर धावतच बाहेर आले आणि म्हणाले, ‘इतक्या लांबून आलात आणि मला न भेटताच जाता?’ दरवेशसाहेब संतापानं थरथरत म्हणाले, ‘मी तुम्हाला अल्लाचा नेक बंदा समजत होतो. पण तुम्ही तर एक अपवित्र जनावर दाराबाहेर बांधलं आहे.’’ कबीर हसून म्हणाले, ‘‘दरवेशसाहेब तुमच्या दृष्टीनं अपवित्र असलेलं जनावर मी तर घराबाहेर ठेवलं आहे पण तुम्ही त्याला आपल्या हृदयात ठेवलं आहे! डुकराला पाहून तुमच्या मनात जो राग आणि द्वेष उफाळला तो त्या डुकरापेक्षा जास्त अपवित्र नाही का?’’ हे ऐकताच दरवेशसाहेब मुग्ध झाले. कबीरजी पुढे म्हणाले, ‘‘ही सारी सृष्टी त्या खुदानं निर्माण केली. त्यानंच या मुक्या जनावराचीही निर्मिती केली. मग खुदाच्याच निर्मितीत भेदाभेद का मानता? त्याच्याच एका निर्मितीचा तिरस्कार का करता?’’ शाब्दिक ज्ञान जिथे मावळतं तिथेच असं जगण्यातलं खरं तत्त्वज्ञान उमलतं. या रमैनीतून कबीरजी म्हणूनच ज्ञान आचरणात किती उतरलं, अनुभवात किती सापडलं, याचा शोध घ्यायला सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा