अविश्वासाचा ठराव हे लोकशाहीतील एक महत्त्वाचे अस्त्र आहे आणि कोणतेही अस्त्र हाताळणाऱ्याकडे केवळ बळच नव्हे तर जबाबदारीची जाणीवही असावी लागते. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्याकडे दोन्हीही नाही. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर अविश्वास दाखवणारा ठराव  लोकसभेत मांडण्याइतके  तृणमूल काँग्रेसने मांडल्यास पाठिंबा देणार कोण, हा प्रश्न संसदेचे हिवाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होत असताना, बुधवार संध्याकाळपर्यंत कायम होता. म्हणजे संख्याबळ तूर्तास तरी ममता यांच्याकडे नाही, हे नक्की. जबाबदारी आणि ममता बॅनर्जी या दोहोंचा एकत्रित विचार करावा, असे सध्याच्या लोकसभेतील एकाही पक्षाला वाटत नसावे. त्या-त्या वेळच्या कलानुसार आणि वेळप्रसंग पाहून ममता बॅनर्जीनी आजवर सर्वच पक्षांना एकेकदा साथ दिली आहे, तरीही ही परिस्थिती आहे. अशी स्थिती होणार, याची काळजी खुद्द ममता दीदींनीच वेळोवेळी घेतलेली आहे. साथ द्यायची आणि भुणभुण सुरू करायची, स्वप्नाळू कार्यक्रम पुढे करायचे आणि राजकीय-प्रशासकीय निर्णय घेणे अशक्यच करून टाकायचे आणि ताणून ताणून तुटले की मग त्याच पक्षाच्या विरोधकांना साथ द्यायची, हे  या दीदींनी गेल्या दशकभरात अनेकदा केले आहे. परंतु गेल्या दोनचार दिवसांत तर त्यांचे हे सर्वच गुण एकवटल्यासारख्या त्या वागू लागल्या आणि पश्चिम बंगालात ज्यांच्याशी वैर आणि दुष्मनीच जपण्याची शिकवण- नव्हे ताकीद, तृणमूल कार्यकर्त्यांना ममतांनी दिली होती, त्या कम्युनिस्टांना आता ममताच म्हणू लागल्या की डाव्या पक्षांनी लोकसभेत अविश्वास ठराव मांडल्यास आमचा तृणमूल त्याला पाठिंबा देईल! ‘माकपच्या कार्यकर्त्यांशी बोलू नका. त्यांच्याशी लग्नसंबंध तर येऊच देऊ नका’ असे फतवे ममतांनी काढल्याच्या अवघ्या दहा-बारा महिन्यांपूर्वी आलेल्या बातम्या जणू बंगाली बाऊलगीतांच्या लकेरींप्रमाणे हवेतच विरून गेल्या असाव्यात, असा ममतांचा हा ताजा सूर. तो डाव्यांनी अर्थातच झिडकारल्याने  शांत बसण्याचे सोडून ममता यांनी राज्यात आणखी एक उद्योग अगदी बुधवारीच केला. यूपीएशी सोयरीक तोडल्यानंतर काँग्रेसच्या ज्या सहा मंत्र्यांना पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला होता, त्यांची जागा भरण्याचा मुहूर्त त्यांनी बुधवारचा निवडला आणि ‘स्वच्छ प्रशासनासाठी फेरबदल’ असा गवगवा करीत तृणमूलच्या सहाजणांना तर मंत्रिपदे दिलीच; वर काँग्रेसमधून मोजून दोन दिवसांपूर्वी तृणमूलवासी झालेल्या दोघांना मंत्रिपदाची बक्षिसी दिली. दीदींच्या शब्दावर विश्वास ठेवणे इच्छा असूनही कठीण जाते, ते अशा धक्क्यांमुळे. हे धक्के आधी भाजपने, मग काँग्रेसने आणि या दोन पक्षांच्या सर्वच सहकारी पक्षांनी कमीअधिक प्रमाणात खाल्लेले आहेत. गोरगरिबांच्या कल्याणासाठी आपण कुणालाही न जुमानता कार्यरत राहणार, ही ममतांची मिजास मुख्यमंत्रीपदाच्या १८ महिन्यांच्या कारकीर्दीतील अपयशाने पोकळ ठरली, हेही या पक्षांनी जाणलेले आहे. तेव्हा सध्या तरी, ममतांवरच संसद सदस्यांचा अविश्वास असल्याचे दिसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा