‘‘इथे ‘नीट’च्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे ९० टक्के विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जातात’’, असे असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्य करून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वेदनांवर मीठ चोळण्याचेच काम केले आहे. युक्रेनमधल्या घटनांनी जगातला प्रत्येक माणूस चिंतित आणि व्यथित आहे. तिथे लहान मुलांचे, वृद्धांचे काय होत असेल ही चरचरती जाणीव वृत्तवाहिन्यांवरची दृश्ये पाहताना प्रत्येकाला होत आहे. अशात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठय़ा संख्येने भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्यामुळे आपली मुले सुरक्षित असतील ना, ती नीट परत येतील ना, ही धाकधूक सगळय़ांनाच अस्वस्थ करते आहे. अशा वेळी ‘या मुलांना नीट परत आणण्याचे काम आम्ही करू’, हा दिलासा लोकांना द्यायचा की ‘इथे नापास होणारे बाहेर शिकायला जातात’, असे बोलण्याचा उर्मटपणा करायचा? इथे ही मुले नीट परीक्षेत उत्तीर्ण झाली नसली तरी ती मुळातच वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणारी बुद्धिमान मुले आहेत. त्यांच्यासाठी इथे वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या पुरेशा आणि परवडतील अशा सुविधा उपलब्ध नाहीत म्हणून त्यांना देशाबाहेर जावे लागले आहे, त्याचे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा