पश्चिम महाराष्ट्रातील सातारा हे राजकीयदृष्टय़ा जिवंत आणि मर्ढेकर, माडगूळकर, कोल्हटकर यांच्यामुळे सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत केंद्र. पण सातारा ही भारताच्या आर्थिक नकाशावरील एक मौल्यवान नाममुद्रादेखील आहे आणि तिला तसा तब्बल ११० हून अधिक वर्षांचा वारसा आहे. विमामहर्षी अण्णासाहेब चिरमुले आणि त्यांच्या ‘पंचकन्यां’नी तो मिळवून दिला आणि त्यांचेच बोट पकडून अर्थतज्ज्ञ प्रभाकर नारायण तथा पी. एन. जोशी यांनी तो पुढे नेला. बँकिंग आणि अर्थक्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द राहिलेले पी. एन. जोशी मंगळवारी सकाळी निवर्तले आणि अर्थोद्योग क्षेत्रातील आदरणीय स्थान असणाऱ्या मराठी मंडळीच्या पंगतीतील आणखी एक नाव आपल्यातून निघून गेले. खासगी क्षेत्रातील नावाजलेल्या आणि पुरती निरोगी असतानाही क्षुल्लक कारणाने आयडीबीआय बँकेत विलीन केल्या गेलेल्या युनायटेड वेस्टर्न बँकेचे अध्यक्षपद आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपद, त्याआधी रिझव्र्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागातील १५ वर्षांची कारकीर्द, सारस्वत सहकारी बँकेचे बॅंकिंग संचालक, खासगी बँक महासंघाचे अध्यक्षपद, अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि पी. एन. जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशा आणि अन्य अनेकविध जबाबदाऱ्या त्यांनी हयातभरात सांभाळल्या. इतक्या मोठय़ा पदांचे भूषण नावापुढे असताना, निरलसता आणि कायम सचोटीची कास हे जोशी यांचे अनोखेपण. अशा पदाच्या व्यक्तींमध्ये ते विरळा दिसून येते आणि हेच जोशी यांचे मोठेपणही.
१९९१-२००० या दशकात जागतिकीकरणाच्या वातावरणात रिझव्र्ह बँकेच्या नियमांत आमूलाग्र बदल झाले. नवीन धोरणाप्रमाणे १०० कोटींचे भागभांडवल, एनपीएचे निकष, पारदर्शकता यांचे काटेकोर पालन करून युनायटेड वेस्टर्न बँक खासगी क्षेत्रांतील एक अग्रगण्य बँक बनली. याच दशकभराच्या काळात जोशी यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. बँकेच्या व्यवसायात त्या १० वर्षांत तब्बल दसपटीने वाढ झाली. ३१ मार्च २००१ च्या आर्थिक स्थितीवरून, बँकेचे भागभांडवल ३० कोटी रुपये, राखीव गंगाजळी २०४ कोटी रुपये, ठेवी ५,२२१ कोटी रुपये, कर्जे २,७८८ कोटी रुपये, गुंतवणुका १,७१९ कोटी रुपये, देशभरात २२५ शाखांपर्यंत विस्तार बँकेने साधला. बँकेची ही घोडदौड पाहता, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली बँक, गणेश बँक ऑफ कुरुंदवाड आणि रत्नाकर बँक यांचे युनायटेड वेस्टर्न बँकेत विलीन करून घ्या, असा प्रस्ताव रिझव्र्ह बँकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर एस. पी. तलवार यांनी जोशी यांच्यापुढे ठेवला होता. ‘‘अशा सशक्त आणि गुणी बँकेला २००० नंतरच्या नेभळट / असक्षम नेतृत्वामुळे पुढे पाच-सहा वर्षांतच आयडीबीआय बँकेने गिळंकृत केले,’’ अशी खंत जोशी यांनी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेल्या लेखात व्यक्त केली होती. इंग्रजी वर्तमानपत्रांसह आणि मराठीत ‘लोकसत्ता’त त्यांचे सतत सरकारच्या आर्थिक आणि बँकिंग धोरणावर नियमित लिखाण सुरू असे. रिझव्र्ह बँकेची सर्व परिपत्रके, तज्ज्ञ गटांचे अहवाल, शिफारशींची व्यक्तिश: माहिती घेऊन, ज्ञान कायम अद्ययावत राखण्याच्या त्यांच्या शिरस्त्यात ना त्यांचे वय आडवे आले, ना त्यांच्यावरील नानाविध जबाबदाऱ्या अडसर ठरल्या.
आपल्या बँकिंग प्रणालीचे ’क्लास’ ते ‘मास’ संक्रमण घडून येऊन सर्वसमावेशक विकास घडावा, हा त्यांचा ध्यास. काळाच्या पुढे पाहणारा अपारंपरिक दृष्टिकोन आणि मताग्रह असूनही त्याची मांडणी करताना आवाजातील मार्दव आणि गोडवा त्यांनी गमावला नाही, असे त्यांचे समकालीन आवर्जून सांगतात. ते विश्वस्त राहिलेल्या चिरमुले ट्रस्टकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारानिमित्त अनेक ख्यातकीर्ताची पायधूळ सातारभूमीला लागू शकली. डॉ. मनमोहन सिंग, रतन टाटा, नारायण मूर्ती, अनिल काकोडकर, अरुण शौरी, एकनाथ ठाकूर अशी ही नामावली खूप मोठी आहे. जोशी यांच्या कामाची उंचीच ही नामावली दर्शविते. जीवनभर साधेपणा, सात्त्विकता जपणाऱ्या जोशी यांनी कमावलेली संपत्तीपल्याडची समृद्धीदेखील हीच. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.