अस्वस्थ अश्वत्थामे..
शरद पवार यांनी राहुल नार्वेकर हे शिवसेनेत अस्वस्थ होते, अशी माहिती माध्यमांना दिली आहे. आता नार्वेकरांना हवी ती स्वस्थता राष्ट्रवादीत लाभेलच! वास्तविक अस्वस्थतेची लागण बहुतेक सर्वच पक्षांमध्ये असते (पण एकाने दुसऱ्याच्या घरात डोकावायचे नसते!). काल-परवाच राष्ट्रवादीतील अस्वस्थ आझमभाई पानसरे यांनी पक्षत्याग केला, त्याचप्रमाणे काँग्रेसमधील हाफिझ धत्तुरे यांनीही अस्वस्थ होऊन बंडखोरी केली. पवारांचे काँग्रेस (समाजवादी)च्या काळापासूनचे अगदी जुने मित्र दत्ता मेघे आणि गोिवदराव आदिक हे राष्ट्रवादीत अस्वस्थता वाटल्याने काँग्रेसवासी झाले. पकी आदिक यांचा राष्ट्रवादी ते काँग्रेस व परत असा प्रवास दोनदा झाला; काहीसा पवारांप्रमाणेच, अथवा नेमक्या शब्दांत सांगायचे झाल्यास, रिचर्ड बर्टन व एलिझाबेथ टेलर स्टाइल! राष्ट्रवादीतील पूर्णो संगमा हे अस्वस्थ झाल्याने रा.लो.आ.मध्ये जात आहेत (कुणी म्हणतात, त्यांना पवारच पुढे पाठवीत आहेत!). स्वत: शरद पवार हे पहिल्यांदा काँग्रेसमधून अस्वस्थ होऊन बाहेर पडले, त्या वेळी त्यांनी ‘एक वेळ अंगाला राख फासून हिमालयात जाईन, पण काँग्रेसमध्ये परत जाणार नाही’ अशी घोर प्रतिज्ञा केली होती. पण बाहेर अस्वस्थ वाटू लागल्याने ते पुन्हा आत गेले आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना स्वस्थता लाभली! दुसऱ्यांदा ते ‘विदेशी’च्या मुद्दय़ाने अस्वस्थ होऊन काँग्रेसबाहेर पडले; पण लाल दिव्याची लालसा नसतानाही केवळ ‘जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या’ उद्देशाने त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली.
यंदाही १६ मे रोजी आताचे काही अस्वस्थ हे स्वस्थ होतील आणि स्वस्थ हे अस्वस्थ होतील.. नंतरच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत! मात्र अशी अस्वस्थता कुणीही फार मनावर घेऊ नये, कारण ती अस्वस्थता कोणत्याही सद्धांतिक, तात्त्विक, वैचारिक इ. मतभेदांतून आलेली नसते; तो काळ आता इतिहासजमा झाला आहे.
अविनाश वाघ, ठाणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा