नाशिकच्या द्राक्षांवर भुरी किंवा डावण्या, पश्चिम महाराष्ट्रात हरभऱ्यावर घाटेआळी, रब्बी ज्वारीवरही बुरशीजन्य रोग, कांद्यापासून आंब्यापर्यंतच्या नगदी पिकांना फटके, अशी अवस्था यंदाच्या हिवाळ्यातील पावसाने केलेली असताना, या स्थितीचे राजकारण कसे करायचे, हा प्रश्न नेत्यांना छळणार आहे. ‘अतिवृष्टी’च्या सरकारी नियमांत न बसणारा हा पाऊस  असल्याने, लहरी हवामान आणि राजकारण यांचा दुहेरी मार यंदा थंडी देते आहे..
निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर राजकारणात अचानक कोणती परिस्थिती उद्भवेल हे सांगणे अवघड असते. परस्परविरोधी स्वभावधर्म असलेले राष्ट्रीय नेते कोणालाही खबर लागू न देता एकाएकी एकमेकांची गाठभेट घेऊ लागल्यावर इतरांची अवस्था मात्र ‘भुरी’ किंवा ‘डावण्या’ची लागण झालेल्या द्राक्षांप्रमाणे होते.. म्हणजे गोडवा निर्माण होण्यातही अडचण अन् पराकाष्ठेने जपलेल्या बाह्य रूपालाही धोका. आपत्कालीन व्यवस्थापनात तरबेज असलेले काही जण तर, भविष्यातील ‘त्सुनामी’चा अंदाज घेऊन आधीच सुरक्षित पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात करू लागले आहेत.
राजकारणाप्रमाणेच हवामानातील बदल सर्वसामान्यांना चक्रावून टाकत असून अचानक निर्माण झालेल्या बोचऱ्या थंडीमुळे बहुतांशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अंगावर काटे आले आहेत. गव्हासारख्या पिकास ही थंडी फायदेशीर असली तरी द्राक्ष, आंबा, कांदा, डाळिंब या पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असताना या परिस्थितीचा लाभ उठविण्याची खेळी आता राजकीय मंडळींकडून खेळली जाऊ लागली आहे.
आपणच शेतकऱ्यांचे खरे कैवारी असल्याचे दाखविण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जणू चढाओढ लागते. तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत थंडी आणि ढगाळ हवामानामुळे पिकांचे नुकसान होत आहे. हा विषयही आता राजकारणाच्या पटलावर येऊ शकेल. नाशिक जिल्ह्य़ात तर द्राक्ष उत्पादकांचा कैवार घेऊन अशा प्रकारच्या राजकारणास सुरुवातही झाली असली तरी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळे राजकारण्यांसाठी द्राक्षे आंबटच ठरणार आहेत. बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला. नाशिक जिल्ह्य़ाच्या पश्चिम पट्टय़ातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थचक्र द्राक्षांभोवतीच फिरत असते. मागील महिन्यातही गारांच्या पावसाने या भागातील द्राक्षबागांची कोटय़वधी रुपयांची हानी केली होती. त्या तडाख्यातून वाचलेल्या बागांचे दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळे नुकसान झाले. पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा भुरी व डावण्या या बुरशीजन्य रोगांना बळी पडू शकतात. तसेच द्राक्षमण्यांना भेगा पडण्याची शक्यता असते. मागील नुकसानीच्या भरपाईची शेतकऱ्यांना अपेक्षा असताना आता पुन्हा त्यांच्यावर भरपाई मागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्य़ात गहू, हरभरा व कांदा पिकांवरही या पावसाचा परिणाम होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. एक वेळ महागडी औषधे वापरून तसेच शेकोटय़ा पेटवून थंडीपासून द्राक्षबागांचा बचाव करता येईल. परंतु पावसापासून होणारे नुकसान टाळता येणे अशक्य आहे. पावसामुळे, काढणीवर आलेल्या द्राक्षांप्रमाणेच उशिरा ज्यांची काढणी सुरू होणार आहे त्या बागांवरही परिणाम होणार आहे. पावसाचे पाणी घडांमध्ये साठून मण्यांना तडे जाणे, मण्यांची गळ होणे तसेच बुरशीची लागण होणे अशा प्रकारे नुकसान होऊ शकते, या भीतीला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे.
मुळात महागडय़ा पिकांमध्ये द्राक्षाची गणना होते. बाग तयार करण्यापासून तर पीक हातात येईपर्यंत लाखो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातच सर्व काही सुरळीत होत असल्याचे वाटत असतानाच बदलत्या हवामानाचा कसा आणि केव्हा फटका बसेल हे सांगता येत नसल्याने चोवीस तास एखाद्या बाळाप्रमाणे द्राक्ष पिकांची काळजी घेणे भाग पडते. द्राक्ष काढणी झाल्यानंतर मिळणाऱ्या रकमेतूनच औषध फवारणी व खतांची कित्येक हजारांची थकबाकी चुकती केली जाते. या रकमेवरच घरातील मंगलकार्य अवलंबून असते. परंतु बेमोसमी पावसाने आणि त्यानंतरच्या थंड हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. त्यातच उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याने द्राक्षांना विशेष मागणी नसल्याने व्यापारी माल घेण्यास तयार नाहीत. एरवी डिसेंबरच्या उत्तरार्धातच द्राक्षखरेदी सुरू होते, तर यंदा थंडी पाहून व्यापारी बागांकडे फिरकेनासे झाले आहेत. काही व्यापारी ‘थॉमसन’ द्राक्षांना २५ रुपये किलो तर काळ्या द्राक्षांना ३५ ते ४० रुपये किलो असा दर देताहेत. एरवी हेच दर थॉमसनसाठी ३५ रुपये किलोच्या पुढे असतात. यावरूनच द्राक्ष उत्पादकांचे किती नुकसान होत असेल याचा अंदाज लावणे सहजशक्य व्हावे. उत्तर भारतातील थंडीचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील द्राक्षांना समाधानकारक भाव मिळणार नाही अशी स्थिती आहे. म्हणजेच द्राक्ष उत्पादकांना थंडीचा दुहेरी मार बसत आहे.
लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापण्यास सुरुवात झाली असतानाच थंडी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या संकटात शेतकरी सापडल्याने राजकारणीही पुरते भांबावले आहेत. त्यामुळेच थेट प्रचाराचा मार्ग अवलंबण्याऐवजी शेतकऱ्यांना ओंजारण्याचा व गोंजारण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांकडून विकासकामांच्या आडून प्रचाराची सूत्रे हलविली जात असली तरी आपल्यालाच मतदान करण्याचे थेट आवाहन अद्याप कोणत्याच इच्छुकाकडून केले जात नाही हे विशेष. नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा अभ्यास राजकारण्यांकडून किती बारीक पद्धतीने करण्यात आलेला आहे हेच यातून दिसून येते. थंडीमुळे केवळ द्राक्षेच नव्हे तर, कांदा, डाळिंब, हरभरा, टोमॅटो या पिकांवरही प्रतिकूल परिणाम होत आहे. शेतीमालाच्या नुकसानीनंतर प्रशासनाकडून पंचनाम्याचे काम सुरू होत असले तरी पावसामुळे नुकसान झालेल्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचे शासकीय निकष मोठे विचित्र आहेत. ज्या भागात ६५ मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असेल तेथे अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. म्हणजे १० ते ६४ मिलिमीटर पावसाने पिकांना कितीही नुकसानग्रस्त केले तरी शासनाच्या मदतीच्या टप्प्यात तो भाग येत नसल्याचे हा निकष सांगतो. थंडीमुळे पिकांचे होणारे नुकसान कोणत्या निकषांत बसू शकेल, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.
नाशिकप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्षबागांवर थंडीचा परिणाम जाणवू लागला आहे. ढगाळ हवामानामुळे सांगली जिल्ह्य़ातील द्राक्ष मण्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. योग्य प्रमाणात साखरनिर्मिती झाल्यास बेदाण्यांचे वजन प्रति चार किलो द्राक्षातून एक किलो याप्रमाणे येते. वाईट हवामानामुळे यंदा हे प्रमाण कमी होण्याची भीती द्राक्ष बागायतदारांना आहे. बेभरवशाचे हवामान आणि द्राक्षांना मिळणारा दर यातून सुटका करून घेण्यासाठी सांगली जिल्ह्य़ातील बहुतांश शेतकऱ्यांनी अलीकडील काही वर्षांत बेदाणानिर्मितीकडे लक्ष केंद्रित केले. तासगाव, कडेगाव, विटा या भागांत सध्या बेदाण्यासाठी मालाची मोठय़ा प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सततचे ढगाळ हवामान, धुके यामुळे बेदाणानिर्मितीसाठी द्राक्ष सुकविण्याकरिता नेहमीपेक्षा लागणारा कालावधी वीस दिवसांपर्यंत पोहोचला आहे. कोरडय़ा हवामानात हीच प्रक्रिया १२ ते १५ दिवसांत पूर्ण होते. याचा परिणाम बेदाण्याच्या रंगावर होऊ लागला असून दुय्यम दर्जाचा माल तयार होण्याची भीती उत्पादकांना आहे. याशिवाय हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव तर रब्बी ज्वारीवर रोग पडू लागला आहे.
एकीकडे नाशिक, सांगली जिल्ह्य़ात थंडी तसेच ढगाळ हवामानामुळे शेतकरी धास्तावले असताना मराठवाडय़ात मात्र नेहमी जानेवारीतच उद्भवणारे पाणीटंचाईचे संकट पुढे ढकलण्यास मदत झाल्याचे दिसत आहे. थंडी असली तरी ती कडाक्याची नसल्याने गहू, हरभरा या पिकांसाठी या भागात ती उपयुक्तच ठरली आहे. कापूस कधीच काढला गेल्याने थंडीमुळे पिकांच्या नुकसानीचा धोका या भागात तरी नाही. बहुतांशी अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या इतर भागांतही आहे. प्रामुख्याने द्राक्ष शेती असलेल्या भागात बदलते हवामान अधिक नुकसानकारक ठरणार असल्याने त्या त्या भागात निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा विशेषत्वाने राहील. त्यामुळेच पुढील काळात राजकारण्यांसाठी या भागात द्राक्ष आंबटच लागण्याची चिन्हे आहेत.