राज्यातली निम्मी जनता गारपिटीने होरपळून गेल्यानंतर त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेली मदत तातडीने करण्यासाठी उशीर करणे हा निर्लज्जपणा आहे. निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे एखादे अस्मानी संकट आले, म्हणून निवडणूक आयोगाच्या नावाखाली संकटग्रस्तांना किमान दिलासा देण्यात कुणालाच रस कसा नाही याचे आश्चर्य वाटावे, अशी स्थिती आहे. मागील निवडणुकीच्या काळात अशाच आलेल्या संकटप्रसंगी निवडणूक आयोगाच्या मान्यतेने मदत देण्यात आली होती. आताच असे काय झाले, की पंधरा दिवस उलटल्यानंतरही कुणाला शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमांवर फुंकरही घालायला सुचू नये. अचानक आलेल्या गारपिटीने १६८ तालुक्यांना जबरदस्त फटका बसला आणि तेथील शेतातील तरणीताठी पिके पार जमीनदोस्त झाली. पिकांबरोबरच त्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे जीवनही उद्ध्वस्त झाले. डोळ्यासमोर पिकांची झालेली अशी नासाडी हे त्याच्या दृष्टीने भयावह संकट होते. ते आल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यातील शासनयंत्रणा त्वरेने जागी झाली नाही. अतिवृष्टीनंतर द्यावयाच्या अशा मदतीबाबत जे काही नियम आणि परंपरा आहेत त्या पाहता तातडीने मदत देणे शासनाला शक्य नसते, असे भासवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यातून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने अशी कोणतीही मदत करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सरकारी उत्तर देण्यात येऊ लागले. तिकडे शेतकरी जगतो का मरतो असा प्रश्न असताना, इकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधली धुसफुस, मनसेने टाकलेला धोबीपछाड डाव आणि शिवसेना भाजपमधील रुसवेफुगवे अशा प्रश्नांमध्ये सगळे राजकीय पक्ष इतके गुंतून गेले होते की त्यांना आपल्याच राज्यातला निम्मा भाग मरणासन्न अवस्थेत आहे, याचे भान आले नाही. निवडणूक आयोगाने एवढेच सांगितले की अशी मदत कोणत्याही मंत्र्याने जाहीर करू नये वा तिचे वाटपही करू नये. परिणामी मानसिकदृष्टय़ा जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या वाटय़ाला वाट पाहण्याचे दुर्भाग्य आले. मदत देण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक असते, मग त्याचा लेखी अहवाल सरकारला सादर करणे क्रमप्राप्त असते, त्यावर चर्चा आणि मसलती होऊन नेमकी किती मदत द्यायची यावर चर्वितचर्वण होणे अपरिहार्य असते. असे सगळे सोपस्कार झाल्यानंतर ही मदत कोणी द्यायची, यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे बंधनकारक असते. अशी मदत देऊन कोण त्यावर मतांची पोळी भाजेल, याचा विचार करून आयोगाने निर्णय दिल्यानंतर मग हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची नुसती चिन्हे दिसू लागतात. सरकारी यंत्रणेतील हा हट्टाग्रह इतका टोकाला गेला आहे, की त्यामुळे तिने आपल्या प्रशासनाचा मानवी चेहरा विद्रूप करून टाकला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा