नागरीसेवा परीक्षांना बसणाऱ्या भारतातील अडीच ते तीन लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी आणखी दोन संधी देण्याच्या निर्णयाने अनेकांना आनंद झाला असेल. मात्र, वयाच्या पस्तिसाव्या वर्षांपर्यंत सतत परीक्षांना सामोरे जाण्याएवढी शारीरिक आणि मानसिक क्षमता टिकवून ठेवण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. सरकारी सेवेतील वरिष्ठ पदांवर थेट नियुक्ती होण्याचे जे स्वप्न भारतातील अनेक विद्यार्थी पाहत असतात, त्यापैकी फारच थोडय़ा जणांना ते पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. अगदी आकडेवारीतच बोलायचे, तर अडीच-तीन लाख परीक्षार्थीपैकी केवळ ८०० ते १००० विद्यार्थी उत्तीर्ण होतात. काळानुसार नागरीसेवा परीक्षांचा अभ्यासक्रम बदलणे क्रमप्राप्त असते. विशिष्ट वयापर्यंतच ही परीक्षा देण्याच्या अटीमुळे नव्या अभ्यासक्रमाची पहिली आणि वयामुळे येणारी शेवटची परीक्षा अनेकांच्या वाटय़ाला येते. नव्या अभ्यासक्रमाचा कसून अभ्यास केल्यानंतरही अपयश पदरी पडले, तर पुन्हा संधीच मिळत नाही. ती मिळावी यासाठी आयोगाने आणखी दोन संधी देण्याचा निर्णय घेतला. मागील वेळी जेव्हा अभ्यासक्रम बदलण्यात आला, तेव्हाही अशी संधी देण्यात आली होती. नागरी सेवा परीक्षांचा अभ्यासक्रम इतका सर्वसमावेशक असतो, की आकाशाखालील सगळे आणि अवकाशातीलही शक्य तेवढे मेंदूत भरणे क्रमप्राप्त असते. एवढे करून ऐन परीक्षेच्या वेळी मेंदूने दगा दिला, तर अनुत्तीर्ण होण्याची हमीच. नागरीसेवा परीक्षांचा हा दर्जा टिकवून ठेवण्यात आयोगाला जे यश आले, त्याचे कारण तेथे राजकारण्यांची लुडबुड खपवून घेतली जात नाही हे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात असे जे घोटाळे काही वर्षांपूर्वी झाले होते, त्याला वेळीच पायबंद बसला म्हणून भावी संकट टळले. नागरी सेवा परीक्षांची काठिण्यपातळी राखली गेल्याने विद्यार्थ्यांला प्रशासनात किमान गुणवत्तेसह प्रवेश करता येतो. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एक वर्षांचे प्रशिक्षण असते आणि त्यानंतर प्रत्यक्ष नेमणूक करण्यात येते. अगदी शेवटच्या संधीमध्ये वयाच्या पस्तिसाव्या वर्षी एखादा विद्यार्थी उत्तीर्ण झाला, तर प्रशासनात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास आणखी एक वर्षांचा कालावधी लागणार. त्यानंतर निवृत्तीपर्यंत त्याची पदोन्नती होऊन ‘महत्त्वाच्या’ पदापर्यंत तो पोहोचू शकेल की नाही, अशी शंका येते. ‘उत्तम संधी’ म्हणून जे जे अभ्यासक्रम भारतात लोकप्रिय आहेत, त्यासाठी भरमसाट देणग्या देऊन प्रवेश घ्यावा लागतो. त्याशिवाय क्लास आणि गाइड्स यांचा खर्च असतो तो वेगळाच. त्या मानाने नागरीसेवा परीक्षांसाठी अशी कोणतीही देणगी द्यावी लागत नाही. मात्र क्लासचा भरमसाट खर्च करावा लागतो. कदाचित यामुळे आणि सरकारी अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिष्ठेमुळे किंवा जनतेचे भले करण्याच्या संधीमुळे अनेक तरुण या परीक्षेकडे वळतात. अपयशाने खचून न जाता अनेकदा धीराने सामोरे जात आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे खरे तर त्यासाठीच अभिनंदन करायला हवे. ज्या वयात संसार थाटून मार्गाला लागण्याचे स्वप्न असते, त्या वयात परीक्षांचा मार्ग बंद झाल्यावर आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचे आव्हान समोर येते. म्हणूनच आणखी दोन संधी मिळाल्याने त्यांच्यातील या उत्साहालाही खतपाणी मिळाले आहे. नागरी सेवा परीक्षांच्या बरोबरीने केंद्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या परीक्षांना मात्र नेहमीच कमी प्रतिसाद मिळतो. सरकारी प्रशासनात दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकांच्या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा तुलनेने कमी कठीण असतात. पदे जास्त आणि तुलनेने परीक्षा देणारे विद्यार्थी कमी अशी आजची स्थिती आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी याही केंद्रीय परीक्षांची वाट चोखाळायला हरकत नाही.

Story img Loader