मीरा शंकर, हरदीप सिंग हे ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी असोत वा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, यांनाही अमेरिकेने अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी आपला राष्ट्रवाद कधी इतका उफाळून आल्याचे दिसले नाही. खोब्रागडेबाईंनी केलेले काम कोणते ‘आदर्श’ की, आपण त्यांच्या अटकेचा एवढा गहजब करावा?
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी हे लोकशाहीतील नवे संस्थानिक आहेत आणि देवयानी खोब्रागडे यांचे वर्तन यास अपवाद करावा असे नाही. त्यांना अमेरिकेत मिळालेल्या वागणुकीमुळे आपला राष्ट्राभिमान वगैरे दुखावला असला तरी खोब्रागडे यांची कृती नियमास धरून होती असे अजिबात म्हणता येणार नाही. खोब्रागडे यांना अमेरिकेस नियुक्तीवर जाताना आपणास किती वेतन मिळणार आहे याचा अंदाज होता. त्या वेतनात घरगडी वा मोलकरीण परवडेल किंवा नाही याची किमान माहिती इतक्या सज्ञान अधिकाऱ्यास असणार नाही, असेही नाही. समजा, ती नव्हती असे मान्य केले तरी मोलकरणीस तेथे किती वेतन द्यावे लागते हे अमेरिकेत प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करताना खोब्रागडेबाईंना पूर्ण ठाऊक होते. किंबहुना अमेरिकी कायद्यानुसार द्यावे लागते तितके वेतन आपण देऊ अशी कबुली त्यांनी दिल्यावरच मोलकरणीस त्यांच्यासमवेत अमेरिकेत जाण्याची अनुमती देण्यात आली. परंतु अमेरिकेत गेल्यावर खोब्रागडे उलटल्या आणि कबूल केलेल्या वेतनाच्या निम्म्या रकमेतच त्या या महिलेची बोळवण करू लागल्या. यावर त्या महिलेने अमेरिकी व्यवस्थेकडे त्याबाबत तक्रार केली तर गैर ते काय? आपण काहीही करावे आणि तरीही समोरच्याने त्या विरोधात ब्रही काढू नये असा माज दाखवण्याजोगी ‘आदर्श’ परिस्थिती भारतात आहे. या मंडळींच्या दुर्दैवाने विकसित देशांत नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन सर्वोच्च पदावरील व्यक्तीलाही करावे लागते. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जॉर्ज डब्ल्यू. बुश असताना त्यांच्या कन्येस गैरव्यवहारावरून पोलिसांनी अटक केली होती आणि त्या वेळी बुश यांनी पोलिसांना दरडावून काय रे.. तू ओळखत नाहीस का मला.. अशी भाषा वापरली नव्हती. इतकेच काय अध्यक्षांच्या पत्नीस अयोग्य ठिकाणी गाडी उभी केल्याबद्दल दंड भरावे लागण्याचे प्रकार अशा देशांत घडलेले आहेत. त्यात खोब्रागडेबाईंवर कारवाई करणारा प्रीत भरारा हा अधिकारी बडय़ा बडय़ांना सरळ करण्यासाठी विख्यात आहे. मॅकेन्झी, गोल्डमॅन सॅक आदींशी संबंधित रजत गुप्ता यांना वा भांडवली बाजारात घोटाळ्यासाठी राजरत्नम यांना तुरुंगात पाठवले ते याच भरारा यांनी. शंभर टक्के गोळीबंद तपास झाल्याखेरीज कारवाई करायची नाही आणि तसा तो झाला की दोषी आढळणारा कितीही उच्चपदस्थ असला तरी त्यास सोडावयाचे नाही, असा भरारा यांचा लौकिक आहे. नियमांचा आदर करणारे उच्चपदस्थ ही जमात आपल्याकडे नामशेष झाल्यात जमा असल्याने भरारा यांच्या कारवाईचा आपल्याला धक्का बसला. परंतु अध्यक्ष जॉर्ज बुश यांचा उजवा हात असणारे प्रचंड सामथ्र्यशाली उद्योगपती केनेथ ले यांनादेखील आर्थिक गैरव्यवहारात दोषी ठरल्यावर कॅमेऱ्यांच्या साक्षीने बेडय़ा ठोकूनच नेण्यात आले होते. तेव्हा बेडय़ा ठोकल्या म्हणून खोब्रागडेबाईंनी वा त्यामुळे राष्ट्राभिमान दुखावला गेलेल्यांनी कांगावा करण्याची गरज नाही. राष्ट्राभिमानाची इतकीच चिंता होती तर ती नियम तोडण्याच्या आड का आली नाही? कबूल केल्यापेक्षा कमी पैशात आपण मोलकरणीस राबवून घेत आहोत, याबद्दल खोब्रागडेबाईंना खंत का नाही वाटली? त्यांची मोलकरीणही भारतीयच. तेव्हा तिच्या राष्ट्राभिमानाचे काय? देवयानी खोब्रागडे यांचे तीर्थरूप हे नियमांच्या पालनपोषणाबाबत भलतेच उत्तम. प्रस्थापितांच्या शोषणाविरोधात ते नेहमीच आवाज उठवत आले आहेत. अशा या कर्तव्यतत्पर उत्तमरावांना आपल्या पोटच्या पोरीच्या घरी होणारे मोलकरणीचे शोषण कसे टोचले नाही? आपल्या कन्येकडून नियमभंग होत आहे, याची जाणीव या जागरूक तीर्थरूपांना होऊ नये? अर्थात नियमांबाबत ते किती जागरूक आहेत त्याचा पुरावा आदर्श इमारतीत आहेच. आपल्याकडे नियमांची अंमलबजावणी ही जनसामान्यांनी करावयाची असते आणि सत्ताधारी हे त्या नियमांना अपवाद असतात असे मानले जाते. तेव्हा खोब्रागडे यांनी नियम मोडलाच नाही, असे त्यांचे तीर्थरूप वा त्यांच्या समर्थनास धावलेले अन्य यांना म्हणावयाचे आहे काय? आणि दुसरे असे की स्वस्तात घरगडी राबवून घेण्याची कारवाई झालेल्या खोब्रागडेबाई काही पहिल्याच नाहीत. परदेशी दूतावासात काम करणारे अनेक अधिकारी अशी कंजूषगिरी करताना सापडले आहेत. यातील काही निवृत्तांनी निर्लज्जपणे खोब्रागडेबाईंची बाजू घेताना अशीच पद्धत आहे, त्यात गैर ते काय, असा सवाल केला आहे. यातून दिसते नियम आणि कायदेकानू आपल्याला लागू नाहीत, ही या मंडळींची मिजास. म्हणजे इतके दिवस आम्ही गैरवर्तन  केले, ते यापुढेही करू द्या असाच त्याचा अर्थ. व्यक्तीपेक्षा व्यवस्था मोठी असते असे मानणाऱ्या समाजात हे असले युक्तिवाद चालत नाहीत याचेही भान आपल्याला नाही. तेव्हा या संदर्भात आपल्याकडे जी काही राष्ट्रप्रेमाची लाट आल्याचे सरकारी पातळीवर दाखवले जात आहे तो शुद्ध कांगावा आहे. परदेशात नियमभंगाच्या कारवाया फक्त काही आपल्या अधिकाऱ्यांवरच झालेल्या नाहीत. एकटय़ा अमेरिकेतच स्वित्र्झलड, फ्रान्स आणि ऑस्ट्रिया अशा मित्रदेशांच्या अधिकाऱ्यांनाही अशाच प्रकारच्या कारवाईस तोंड द्यावे लागले आहे. परंतु त्या त्या देशांच्या सरकारांनी चुका मान्य केल्या आणि फुकाचा राष्ट्रवाद त्यात आणला नाही.
 तेव्हा आपल्या सरकारला अमेरिकेविरोधात कारवाईचा जो काही झटका आला आहे तो केवळ हास्यास्पद आणि एक व्यवस्था म्हणून आपण किती शालेय आहोत, हे दाखवणारा आहे. अमेरिकी सरकारी आस्थापनांची सुरक्षा कमी करणे वा त्यांची ओळखपत्रे परत घेणे हे उपाय तर शुद्ध बालिश आहेत. त्यावर आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे असे की या सर्व सोयीसुविधा अनावश्यक आणि नियमबाह्य़ आहेत. परंतु प्रश्न असा की हा साक्षात्कार होण्यासाठी सरकारला खोब्रागडे प्रकरण होण्याची वाट का पाहावी लागली? त्या जर अनावश्यक होत्या तर त्या देण्याचा निर्णय मुदलात घेतला कोणी? आणि कधी? भारतातील अमेरिकी अधिकाऱ्यांवर सोयीसुविधांची खरात करणाऱ्यांना त्या बदल्यात काय मिळाले, हेही तपासून पाहावे. आपण आपले नियम पाळणार नाही आणि अन्य कोणी ते पाळले की त्याविरोधात गहजब उठवणार ही लबाडी झाली. जे काही झाले त्याबद्दल अमेरिकेला धडा शिकवण्याची भाषा आपल्याकडील काही राजकारण्यांनी केली आहे. परंतु तसा धडा खरोखरच कोणास शिकवायचा असेल तर त्यासाठी प्रथम आपल्याकडे नियमांचे राज्य असावे लागते आणि व्यवस्था धड असाव्या लागतात. कॅमेऱ्यासमोर राष्ट्रवादाची भाषा करायची आणि भुक्कड कारणांसाठी आपले सत्त्व आणि समाजहित विकायचे या आपल्या किडक्या व्यवस्थेची ओळख सर्वाना आहे.
 राहता राहिला मुद्दा खोब्रागडेबाईंना मिळालेल्या वागणुकीचा. किंबहुना तोच मुद्दा आहे आणि हे सर्वानाच मान्य आहे. या कथित गुन्ह्याप्रकरणी देहचाचणीची गरज होती का, एवढाच यातील तार्किक आक्षेप आहे. खोब्रागडेबाई चुकल्याच नाहीत असे सरकारही म्हणत नाही. तेव्हा त्याबाबत अमेरिकेने अतिरेक केला असे मानून घेण्याचे स्वातंत्र्य आपणास आहे. कोणत्या गुन्ह्य़ासाठी किती कठोर नियम करावयाचे हा त्या त्या देशाचा अधिकार आहे. तुमचे कायदे कठोर आहेत, हे त्या देशांना सांगण्याचा आपणास काय अधिकार? यातही आपली लबाडी अशी की आतापर्यंत मीरा शंकर, हरदीप सिंग या ज्येष्ठ अधिकारी वा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनादेखील अमेरिकेने इतकी नाही तरी अशीच अपमानास्पद वागणूक दिली होती. त्या वेळी आपला राष्ट्रवाद कधी इतका उफाळून आल्याचे दिसले नाही. या मंडळींच्या कथित अपमानानंतरही आपले अमेरिकाप्रेम नेहमीइतकेच उतू जात होते. तेव्हा आता नेमके खोब्रागडेबाईंच्या बाबतीतच असे काय आकाश कोसळले?
या उत्तम कांगाव्याचे उत्तर देण्याचा प्रामाणिकपणा मीरा कुमार, सलमान खुर्शीद, शिवशंकर मेनन, सुशीलकुमार शिंदे आदींनी दाखवावा.

Donald Trump
Donald Trump : एलॉन मस्क, विवेक रामास्वामींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश; करणार नोकरशाहीची साफसफाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
elon musk role in trump administration
‘लाभार्थी’ इलॉन मस्कची ट्रम्प प्रशासनात काय भूमिका राहील? त्याच्या कंपन्यांना किती आणि कसा फायदा होणार? 
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका