राजकीय आंदोलने करण्याची क्षमताच नसतानाही रामदेवबाबांना आंदोलनांच्या राजकारणात महत्त्व मिळू लागले, त्यास भाजपनेही हातभारच लावला आणि या बाबांचे सल्लागार म्हणवणाऱ्या वेद प्रताप वैदिक यांनी थेट पाकिस्तानात जाऊन हाफिझ सईदची भेट घेतल्यावर पत्रकारासारखे नव्हे, तर शांतिदूतासारखे वागणे आरंभले! याच सईदला भेटणाऱ्या यासिन मलिकवर कारवाईची मागणी काही महिन्यांपूर्वी करणाऱ्या भाजपने आता शांत राहू नये..
सत्ताकारणाच्या लघू उद्दिष्टांच्या पूर्ततेत भुरटय़ांना महत्त्व दिले गेले की जे होते ते कोणा वेद प्रताप वैदिक नामक पत्रकाराने लष्कर ए तय्यबाचा प्रमुख, मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याची भेट घेतल्याने झाले आहे. हे वेद प्रताप स्वत:स पत्रकार म्हणवतात. अलीकडे या पेशातील मंडळी आपल्या मर्यादा ओलांडून फारच बहकू लागली आहेत. कोणी राज्यसभेसाठी आपली पत्रकारिता कोणा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधताना दिसतात तर अन्य कोणी राजकीय पक्षाचे वकीलपत्र घेतल्यासारखे सुमार युक्तिवाद करण्यात धन्यता बांधतात. हे वेद प्रताप याच माळेतील मणी म्हणावयास हवेत. फरक इतकाच की अन्यांप्रमाणे या वेद प्रतापाने आपली सेवा राजकीय पक्षांसाठी उपलब्ध करून न देता ती बाबा रामदेव यांच्या चरणी अर्पण केली. भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल वगैरे महाजनांनी गत सरकारच्या विरोधात आंदोलन छेडल्यावर आणि त्यास उत्तम टीआरपी आहे याची खात्री पटल्यावर तीत बाबा रामदेव या बोगस माणसाने उडी घेतली. भगवी वस्त्रे परिधान करून जगास नैतिकतेचे सल्ले देणाऱ्या या बाबाने स्वत:च्या उद्योगाचा कर लपविल्याचा आरोप आहे. स्विस बँकेतून काळा पैसा आणण्याविषयी निर्बुद्ध बडबड करणाऱ्या या बाबास स्वत: देय असलेला कर मात्र भरावा असे वाटले नाही. त्याच वेळी त्यांच्या भगव्या वस्त्रांवर विश्वास ठेवणाऱ्या अण्णा हजारे वा केजरीवाल यांनाही या बाबाची विश्वासार्हता तपासण्याची गरज वाटली नाही किंवा वाटली असेल तरी त्यांनी ते केले नाही. याचे कारण सरकारविरोधात बोलणारा, भूमिका घेणारा तो सज्जन अशी सोपी मांडणी या मंडळींनी केली होती. म्हणूनच असे अनेक भुरटे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या आंदोलनात येऊन मोठे झाले आणि परिणामी त्या आंदोलनाचे नुकसान करून गेले. वेद प्रताप वैदिक हे यांतील बाबा रामदेव यांचे म्हणे सल्लागार. त्या अर्थाने त्यांची संभावना उपभुरटे अशी करता येईल. बाबास सल्ला देणे, त्यांच्या प्रसिद्धीची कामे पाहाणे किंबहुना इतकेच काय सरकारी कारवाईचा वरवंटा फिरू लागल्यावर पळून जाण्यासाठी बाबास महिला वस्त्रे पुरवणे आदी जबाबदाऱ्या या वेद प्रतापाने अगदी वेदिक परंपरेस जागून पाळल्याचा इतिहास आहे. तेव्हा असे हे महनीय पत्रकार कम सल्लागार कम राष्ट्रहितचिंतक पाकिस्तानात जाऊन हाफिझ सईद यांना भेटल्यामुळे सध्या मोठा गहजब उडालेला आहे. वस्तुत: पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने कोणास भेटावे अथवा भेटू नये हा काही संसदेत चर्चा वा वादविवाद करावयाचा विषय नाही. तरीही तो या प्रकरणात झाला. विरोधी पक्षीयांनी या मुद्दय़ावर सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. या पत्रकाराची पुण्याई इतकी की एरवी संसदेत पेंगणाऱ्या राहुल गांधी यांनाही यामुळे तोंडाचा चिकटा घालवण्याची संधी मिळाली. या सगळ्याचे श्रेय सर्वार्थाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे जाते.
याचे कारण बाबा रामदेव या फुटकळ गृहस्थास मोठे केले ते भाजपने. योगासने आणि योगशास्त्राची चर्पटपंजरी हे इतकेच याचे भांडवल. परंतु केवळ भगवी वस्त्रे परिधान करतो आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सोयीस्कररीत्या भूमिका घेण्यास तयार असतो म्हणून भाजपने हे भूत शिरावर घेतले. सत्ताकांक्षेने आंधळा झालेला भाजप त्या काळात सदसद्विवेकबुद्धी गमावून बसला होता. त्यामुळे काँग्रेसविरोधात जो बोलेल तो आपला म्हणत या पक्षानेही अनेक फालतू मंडळींचा गोतावळा जमा केला. त्यातील एक अग्रगण्य म्हणजे बाबा रामदेव. याबाबत भाजपचे भान इतके हरपले की या बाबाची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी करण्यापर्यंत त्या पक्षाचे वकिली अध्वर्यू अरुण जेटली यांची मजल गेली होती. बाबा रामदेव याने जी काही जनजागृती केली त्यामुळे भाजप सत्तेवर येण्यास मदत झाली याबद्दल भाजपने या बाबाचे आभार मानले होते. या भगव्या वस्त्रांकिताचे जनजागरण भाजप नेत्यांना जयप्रकाश नारायण यांच्या कार्याच्या तोडीचे वाटले. एका अर्थाने ही परतफेड होती. निवडणुकीच्या आधी बाबाने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सत्कारात आरती ओवाळली होती. नरेंद्र मोदी हेच भारताचे एकमेव तारणहार आहेत असा संदेश बाबाने या आपल्या आरतीद्वारे दिला होता. तेव्हा आता भाजपस याच आपल्या कृत्याची फळे भोगावी लागत आहेत. या बाबाचा अनुयायी वेद प्रताप पाकिस्तानात जाऊन काहीबाही बरळला असेल तर ते पाप भाजपच्या अंगास चिकटणार हे नि:संशय. इतके दिवस बाबास शिरोधार्य मानून चालल्यानंतर आता अचानक आमचा आणि बाबाचा संबंध नाही, असे भाजपस म्हणता येणार नाही. अलीकडे अनेक पत्रकार पाकिस्तानात जाऊन बिर्याणी पाहुणचार घेतात आणि आल्यानंतर भारत-पाक संबंधांचे गोडवे गाण्यास सुरुवात करतात. पाकिस्तानातही हेच होते. चार-दोन बोलघेवडे भारतात येऊन तीच पोपटपंची करतात. अशा स्वयंघोषित शांतिदूतांचे हल्ली चांगलेच पेव फुटलेले आहे. फरक इतकाच की काँग्रेसच्या राज्यात हे स्वघोषित शांतिदूत लाल रंगाचे असत. आता ते भगवे असतात. वेद प्रताप अशांपैकीच एक. ते अन्य स्वघोषित शांतिदूताच्या पुढे एक पाऊल गेले आणि थेट हाफिझ सईद यालाच भेटून आले. वास्तविक ते जर प्रामाणिक पत्रकार असते तर त्यांनी या भेटीचे वृत्तांकन केले असते, मुलाखत लिहिली असती. यातील काहीच या वेद प्रताप यांनी केले नाही. ते थेट नेतेगिरीच करू लागले आणि भारत-पाक संबंध सुधारण्याची जबाबदारी जणू आपणावरच आहे असे भासवू लागले. सरकार अडचणीत यायला सुरुवात झाली ती येथून. या वेद प्रतापांचे हे उद्योग वादग्रस्त ठरतील आणि आपल्याला अडचणीत आणतील याचा अंदाजच सरकारला आला नाही. वास्तविक परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ही बाब समजावयास हवी होती. कदाचित ती समजलीही असेल. परंतु यामुळे मोदी सरकार अडचणीत येत असेल तर येऊ दे, आपल्याला काय असा विचार त्यांनी केला नसेलच असे म्हणता येणार नाही. कारण काहीही असो. या प्रश्नावर गदारोळ व्हायच्या आतच सरकारने आपली भूमिका स्पष्टपणे करण्याची गरज होती. ते न झाल्यामुळे बाबा रामदेवास यावर भाष्य करण्याची संधी मिळाली. हाफिझ सईद याच्या हृदयपरिवर्तनासाठी आपल्या या सहकाऱ्याने प्रयत्न केले असा अजब रामदेवी खुलासा बाबाने केला. खरे तर त्यांची ही आध्यात्मिक वृत्ती लक्षात घेता सरकारनेच हृदयपरिवर्तन हे स्वतंत्र खाते तयार करून बाबास त्याचे मंत्री करावे. नाही तरी ते महात्मा गांधी यांच्याइतकेच थोर असल्याचा साक्षात्कार भाजपला झालेला होताच. तेव्हा त्या महात्म्याचे राहिलेले हृदयपरिवर्तनाचे कार्य पूर्ण करण्याची ऐतिहासिक संधी भाजपस मिळू शकेल.
खरे तर एरवी हे प्रकरण इतके वाढले नसते. परंतु याच हाफिझ सईद याची भेट जेव्हा काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने घेतली, तेव्हा मलिक याच्या अटकेची आणि त्याचे पारपात्र जप्त करण्याची मागणी भाजपने केली होती. ती करणारे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर आता केंद्रात मंत्री आहेत. त्या वेळी मलिक याचे स्थान तुरुंगात आहे असे मानणारे भाजप नेते त्याच पापासाठी आता वेद प्रताप वैदिक यास कसा काय वेगळा न्याय लावणार? तेव्हा झाली तेवढी शोभा पुरे झाली. सरकारने आता तरी या वेडपट वैदिकास आवरावे.