बॅडमिंटनसारख्या खेळात तरुण, तडफदार खेळाडूंचा जेतेपदांसंदर्भात संभाव्य उमेदवार म्हणून प्राधान्याने विचार होतो. बॅडमिंटनचे दमवणारे स्वरूप पाहता हे साहजिकच आहे. जर्मनीत नुकत्याच झालेल्या जर्मन ग्रांप्रि  स्पर्धेत भारतीय चमूत अरविंद भटचा समावेश होता. जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानी असलेल्या आणि मानांकनही न लाभलेल्या ३४ वर्षांच्या अरविंदचा संभाव्य विजेता म्हणून कोणीही विचार केला नव्हता. मात्र चारच दिवसांत जेतेपदाचा झळाळता चषक पटकावणाऱ्या अरविंदने साऱ्या जगाला आपली दखल घ्यायला लावली. या जेतेपदाने बॅडमिंटन चाहत्यांच्या मनातही गतस्मृतीत गेलेले अरविंद भट हे पर्व पुन्हा जागवले.
 आई-वडील दोघेही बॅडमिंटनपटू असलेल्या अरविंदने ११ वर्षांचा असताना प्रथम रॅकेटची चुणूक दाखविली. प्रकाश पदुकोण आणि विमल कुमार या ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अरविंदने बॅडमिंटनची धुळाक्षरे गिरवली. चांगली उंची, काटक शरीर आणि सर्व फटक्यांवरचे प्रभुत्व या घटकांच्या जोरावर तालुका, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आगेकूच केली. मात्र महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक क्षणी होणाऱ्या चुका आणि दुखापती यामुळे अरविंद अडखळत राहिला. २००२मध्ये अरविंदने पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २००४, २००६ मध्ये  त्याने अंतिम फेरी गाठूनही जेतेपद त्याला हुलकावणी देत होते. दरम्यान पायाच्या घोटय़ाच्या गंभीर दुखापतीवर त्याने कसोशीने मात केली. अखेर २००८ मध्ये त्याने जेतेपद पटकावले. मानसिक कणखरता भिनवण्यासाठी त्याने योगसाधना आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रकल्पाची मदत घेतली. इतक्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रत्यक्षात साकारलेल्या जेतेपदानंतरही अरविंदने आक्रस्ताळ्या पद्धतीने विजय साजरा केला नाही. हाच संयतपणा अरविंदच्या खेळाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख बनली. असंख्य युवा खेळाडूंना टक्कर देत अरविंदने २०११मध्ये राष्ट्रीय जेतेपद नावावर केले. मात्र वयाची तिशी गाठलेल्या अरविंदसाठी तोपर्यंत भारतीय संघाची दारे बंद झाली होती. स्पर्धात्मक जगासाठी युवा खेळाडूंना प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे अरविंद भट मुख्य प्रवाहापासून बाजूला पडला. मात्र या धोरणावर अरविंदने कधीही टीका केली नाही. अविरत संघर्ष करत राहण्याच्या त्याच्या चिकाटीमुळेच जर्मनीतील स्पर्धेच्या जेतेपदावर त्याने कब्जा केला. बॅडमिंटनमध्ये आगेकूच करत असताना अरविंदने मेकॅनिकल इंजिनीअरिंगसारखा अवघड अभ्यासक्रमही पूर्ण केला. खेळाच्या बरोबरीने शिक्षणही महत्त्वाचे असल्याचा धडा अरविंदने युवा बॅडमिंटनपटूंना दिला आहे. प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद यांच्यानंतर भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावे तसे यश मिळालेले नाही. अरविंदच्या यशाने ही पोकळी भरून निघेल अशी आशा आहे.

Story img Loader