प्रत्येक खेळाडूला आपल्या कारकिर्दीचा शेवट मैदानात व्हावा असे वाटत असते, पण काहींच्या नशिबी तो योगच नसतो. वेस्ट इंडिजचे महान फलंदाज विव्ह रिचर्ड्स यांचाही मैदानात क्रिकेटला अलविदा करण्याचा मानस होता, पण रिची रिचर्ड्सनमुळे तो सफल होऊ शकला नाही. रिचर्ड्स सारखाच आक्रमक फलंदाज असलेल्या केव्हिन पीटरसनचे भाग्य तसेच. त्याला इंग्लंडकडून आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळावेसे वाटत असले तरी निवड समितीने त्याचा विचार न केल्याने त्याच्यापुढे क्रिकेटला अलविदा करण्यावाचून पर्याय नव्हता.
दक्षिण आफ्रिकेत जन्म झाला असला तरी त्याला तिथे योग्य वागणूक मिळाली नव्हती, त्यामुळे तो इंग्लंडमध्ये आला. इंग्लंडकडून खेळताना एकदिवसीय सामन्यांमध्ये जलद १००० आणि २००० धावा त्याच्याच नावावर आहेत, त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये २५ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर त्याचाच क्रमांक लागतो. ‘स्विच हिट’सारखा फटका ही त्याने क्रिकेटला दिलेली देणगी. गोलंदाजांवर हुकमत गाजवत नेहमीच त्याने आपला दरारा दाखवला, पण मैदानाबाहेरील काही ‘काळ्या’ घटनांमुळे त्याच्याबद्दलचा आदर जास्त राहिला नाही.
इंग्लंडचे कर्णधारपद भूषवताना त्याचे प्रशिक्षक पीटर मूर्स यांच्याशी कडाक्याचे भांडण झाले आणि त्याला आपले स्थान गमवावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर त्याने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला मोबाइलवरून संदेश पाठवला आणि तो गोत्यात आला. कर्णधार अ‍ॅण्ड्रय़ू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी त्याला संघात घेऊ नये असा आग्रह धरला. त्यानंतर ३१ मे २००२ मध्ये त्याने निवृत्तीचा विचारही केला होता, पण अ‍ॅलिस्टर कुकने त्याचे मतपरिवर्तन केले. काही वर्षांपूर्वी झालेल्या भारताच्या दौऱ्यात त्याची गुणवत्ता, अनुभव, जिद्द याची प्रचीती पुन्हा एकदा आली आणि इंग्लंडच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यावर मैदानात बीअर पिऊन खेळपट्टीवर लघुशंका करणाराही पीटरसनच होता. नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील ब्रिस्बेनमध्ये तो शंभरावा सामना खेळला, पण त्यामध्ये तो लवकरच बाद झाला. या मालिकेत इंग्लंडला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. त्याची परिणती प्रशिक्षक अँडी फ्लॉवर व त्यानंतर पीटरसन यांच्या उचलबांगडीमध्ये झाली. कॉलर वर करत, बाह्य़ा सरसावत, दोन्ही पायांच्यामध्ये बॅट पकडत जेव्हा पीटरसन फलंदाजीला उभा राहायचा, तेव्हा गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळायचे. तो फार मानी होता, अहंकारी होता, पण पीटरसनला लौकिकाला साजेसा कारकिर्दीचा शेवट करता आला नाही, हेच वास्तव आहे.

Story img Loader