इटलीतील फ्लोरेन्स शहराचे महापौर मॅत्तेओ रेन्झी यांची त्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड, तीही वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी- निश्चित झाल्यावर कुणी त्यांना अल्पकाळात प्रगती केली म्हणून ‘ओबामा’ ठरवते आहे, तर कुणी माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी समाजवादी विचारांच्या मजूर पक्षात कायापालट घडवून सत्तापद मिळवले तसेच रेन्झींनी केले, अशी दाद देते आहे. भारतीयांना रेन्झींची दोन वैशिष्टय़े सापडतील : (१) रेन्झी स्वत:ची जाहिरातबाजी चांगली करतात आणि फ्लोरेन्समधील विकासकार्याचा प्रमाणाबाहेर गवगवा त्यांनी केला अशी विरोधकांची टीका, आणि (२) ‘इटलीच्या राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची जळमटे ही झाडून टाकली पाहिजेत’ असा आग्रह धरणाऱ्या रेन्झींचा ‘द स्क्रॅपर’ म्हणजे झाडूवाला असा गमतीने होणारा उल्लेख!
महापौरपदानंतर रेन्झी यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे सरचिटणीसपद मिळाले आणि याच पक्षाचे नेते म्हणून त्यांची निवड झाल्याने, इटालियन केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून कुठलाही अनुभव नसताना त्यांना थेट पंतप्रधानपदाचे दरवाजे खुले झाले. रेन्झी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची आत्मविश्वासाने भरलेली देहबोली प्रदर्शित करीत असतात. हातात कुठलीही टिपणे न घेता ते बोलतात. त्यांचे बोलणे शांत व सहज, पण तितकेच प्रभावी आहे. या गुणांमुळेच, प्रश्न मांडण्यापेक्षा उत्तर मिळवून दाखवू असा विश्वास देण्यात ते आजवर यशस्वी ठरले आहेत. राजकारण हे ‘परिस्थिती बदलण्याचे साधन’ असे ते मानतात. त्यांनी भ्रष्टाचारापायी सत्ता गमावलेले भूतपूर्व पंतप्रधान सिल्वियो बलरुस्कोनी यांच्याशी निवडणूक सुधारणांबाबत चर्चा केली होती. काहींनी त्यांच्या या निर्णयावर टीका झाली, पण सर्वाना बरोबर घेण्याच्या भूमिकेवर रेन्झी ठाम राहिले. त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षात डावे, समाजवादी आणि भांडवलशाहीची अपरिहार्यता पटलेले असे तिन्ही विचारांचे लोक असल्याने त्यांना पक्षांतर्गत कसरत करावी लागेल. स्वत: रेन्झी कुठल्याही एका विचाराचे नसून ‘तरुण’ आहेत, ‘बुजुर्गांनी आता विश्रांती घ्यावी’ अशा सरळ शब्दांत जुन्या- डाव्यांना बाजूला सारू शकणारे आहेत. त्यामुळे कदाचित, त्यांचे परराष्ट्र धोरण अमेरिकाधार्जिणेही असेल, ते इराणऐवजी इस्रायलच्या बाजूने असेल, अशा अटकळी आहेत. फ्लोरेन्स विद्यापीठातून १९९६ साली कायद्याची पदवी आणि त्यानंतर स्थानिक राजकारणातून थेट राष्ट्रीय राजकारणात, असा आलेख असूनही देशातील राजकारणात त्यांना सर्वात जास्त श्रेयांक मिळालेले आहेत. ‘मी महत्त्वाकांक्षी आहे’ किंवा ‘लोक राजकारण्यांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, त्यांचा भ्रमनिरास झाला आहे; म्हणूनच राजकारणात आलो आहे’, ‘नवीन आहे, म्हणजेच स्वच्छही आहे’ या त्यांच्या वक्तव्यांनी इटलीची राजकीय मरगळ निघून जाते आहे, एवढे नक्की!