जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी स्त्रीच्या नशिबी असलेले भोग तिला चुकत नाहीत, हेच खरे. केरळातील प्रसिद्ध लेखिका व स्त्रीवादी कार्यकर्त्यां एकदा तिरूअनंतपूरम येथील मनोरुग्ण केंद्राला भेट द्यायला गेल्या होत्या. तिथे असलेल्या स्त्रियांची ससेहोलपट त्यांना पाहवली नाही. जवळच असलेल्या पोलीस छावणीतील जवानांना शरीरसुख देण्यासाठी या स्त्रियांना पाठवले जात असे, त्यांचे केशवपन करून विद्रुपही केले जात असे. अगदी एकोणिसाव्या शतकात शोभेल अशा पद्धतीचे तिथले वातावरण बघून त्यांनी अशा स्त्रियांसाठी ‘अभयग्राम’ नावाची एक संस्था स्थापन केली. मल्याळम साहित्यात तर त्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे, पण ही संवेदनशीलता त्यांनी व्यवहारातही जपली. या मल्याळी कवयित्रीचं नाव सुगथाकुमारी. त्यांना नुकताच के. के. बिर्ला फाउंडेशनने सरस्वती सन्मान जाहीर केला आहे. मनालेधुथू म्हणजे (वाळूवरील लेखन) या काव्यसंग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला असून एकूण २२ भाषांतील साहित्यिकातून त्यांची झालेली ही निवड सार्थ अशीच आहे. त्यांचे एकूण १५ कवितासंग्रह व सहा कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. पन्नास वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी समकालीन स्थितीचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दाखवले. भावनिक एकरूपता, मानवी संवेदनशीलता व नैतिक सतर्कता ही मूल्ये त्यांनी जपली. त्यांचे निसर्गावर निस्सीम प्रेम आहे. त्यामुळेच हाडाच्या पर्यावरणवादी म्हणूनही त्यांची ओळख आहे. ‘सायलेंट व्हॅली बचाव’ आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते. केरळ राज्य महिला आयोगाच्या त्या प्रमुख आहेत. १९३४ मध्ये त्यांचा जन्म झाला. वडील बोधेश्वरन हे कवी व गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते, तर आई व्ही. के. कार्थियायिनी या संस्कृत विद्वान होत्या. मोक्षाची संकल्पना या विषयावर सुगथाकुमारी यांनी  एम.फिल केले. ‘थालिरू’ या नियतकालिकाचे संपादनही त्यांनी बराच काळ केले. त्यांचे मुथुचिप्पी, राथरीमाझा, अंबालमणी व दधायेविदे हे काव्यसंग्रह विशेष गाजले. त्यांचे वडील कवी होते त्यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली. लेखकाला सामाजिक जबाबदारीचे भान असले पाहिजे या जाणिवेतून त्यांनी केलेले लेखन हे समाजमनाचा ठाव घेणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा