कुठलीही औपचारिक पदवी नसतानाही ज्यांनी नाव मिळवले ते खगोलवैज्ञानिक व विज्ञान संवादक पॅट्रिक मूर यांच्या रूपाने विज्ञानाचा चालताबोलता इतिहासच काळाच्या पडद्याआड गेला आहे. लौकिकार्थाने कुठलीही पदवी नसल्याने काही वैज्ञानिकांनी त्यांची कुचेष्टा केली असली तर इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना नाइट हा किताब दिला होता. वयाची ८९ वर्षे ते समरसून जगले. त्यांना एकटेपण जाणवत होते, पण तरीही त्यांच्या अविवाहित राहण्याची कहाणीही चटका लावणारी होती. हवाई दलात काम करीत असताना त्यांनी ज्या युवतीवर जिवापाड प्रेम केले होते ती युद्धात मारली गेली. त्यानंतर त्यांचे मन कुणावरच जडले नाही, पण याचा अर्थ त्यांना एकटेपणा आवडत होता असे नाही. ते नेहमीच मित्रमंडळीत रमत असत. मूर यांचा जन्म ४ मार्च १९२३ रोजी झाला. आजारपणामुळे त्यांनी सगळे शिक्षण घरीच घेतले होते. वयाच्या सहाव्या वर्षी गाइड टू द सोलर सिस्टम हे पुस्तक त्यांच्या हाती लागले, ते इतके सोप्या भाषेत होते त्यामुळे त्यांना ते समजलेही. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांना द ब्रिटिश अॅस्ट्रॉनॉमिकल असोसिएशनचे सदस्यत्व मिळाले. चंद्रावरील विवरांबाबतचा शोधनिबंध स्वीकारला गेला तेव्हा त्यांनी त्या संस्थेला कळवले की, अहो मी अवघा अकरा वर्षांचा आहे मला हा शोधनिबंध सादर करण्यास बोलावू नका, पण त्या संस्थेने ते सगळे सोडा तुम्ही येऊन बोला, अशी गळ घातली. १९५७ मध्ये त्यांनी द स्काय अॅट नाइट हा कार्यक्रम बीबीसीवर सुरू केला, सर्वाधिक काळ तो त्यांनी सादर केला. आकाशात पहिल्यांदा उडणारा माणूस ऑरव्हिले राइट, पहिली अंतराळसफर करणारा युरी गागारिन व पहिला चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांना भेटण्याचे भाग्य आपल्याला लाभले असे मूर हे अभिमानाने सांगायचे. एवढेच काय ते आइन्स्टाइनला ओळखत होते व त्यांनी त्याला स्वान या सांगीतिक रचनेसाठी व्हायोलिनवर साथही केली होती. अवकाश विज्ञानाचे त्यांचे ज्ञान खरोखर प्रचंड होते, पण ते लोकांपर्यंत आकर्षक व सोप्या पद्धतीने पोहोचवण्याची त्यांची हातोटी तर लाजवाब होती. ते म्हणायचे एक हौशी खगोलनिरीक्षक, जो क्रिकेटवेडा होता अन् ज्याने झायलोफोनवादनावरही तितकेच प्रेम केले, हीच आपली ओळख राहावी. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र होते हेच स्पष्ट होते.
पॅट्रिक मूर
कुठलीही औपचारिक पदवी नसतानाही ज्यांनी नाव मिळवले ते खगोलवैज्ञानिक व विज्ञान संवादक पॅट्रिक मूर यांच्या रूपाने विज्ञानाचा चालताबोलता इतिहासच काळाच्या पडद्याआड गेला आहे. लौकिकार्थाने कुठलीही पदवी नसल्याने काही वैज्ञानिकांनी त्यांची कुचेष्टा केली असली तर इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना नाइट हा किताब दिला होता.
आणखी वाचा
First published on: 11-12-2012 at 05:53 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaktivedh