अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसह प्रतिनिधिगृहासाठी (काँग्रेस) झालेल्या निवडणुकीत भारतीय-अमेरिकी असलेल्या पाच दिग्गजांना पराभवाचा फटका बसल्याच्या पाश्र्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डॉ. अमी बेरा यांनी अतिशय अटीतटीच्या लढतीत मिळवलेले यश अधिक दिमाखदार आहे. त्यांची प्रतिनिधिगृहावर निवड झाली आहे. काँग्रेसवर निवडून आलेले ते तिसरे भारतीय वंशाचे अमेरिकी . यावरून प्रतिनिधिगृहावर निवडून येणे किती अवघड असते याची कल्पना यावी. कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधित्व ते करणार आहेत. या निवडणुकीत त्यांनी सध्याचे प्रतिनिधी व रिपब्लिकन उमेदवार डॅन लंग्रेन यांचा अवघ्या १८४ मतांनी पराभव केला. अमेरिकी प्रतिनिधिगृहावर निवडून येण्याचा मान आतापर्यंत फक्त दोनच जणांना मिळाला होता. त्यात, दलीप सिंग हे १९५० मध्ये अमेरिकी काँग्रेसवर निवडून गेले होते, तर अगोदर लुइझियानाचे गव्हर्नर असलेले बॉबी जिंदाल यांनी २००५ ते २००८ या काळात प्रतिनिधित्व केले होते. बेरा यांचे आईवडील हे स्थलांतरित म्हणून पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत आले. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला बिल क्लिंटन यांनी पाठिंबा देऊन, दोनदा बेरा यांच्यासाठी सभाही घेतल्या होत्या. निधी उभारणीतही बेरांना विरोधी उमेदवारापेक्षा बराच अधिक प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीच्या या धामधुमीत भारतीय वंशाच्या पाच उमेदवारांना मात्र पराभवाचा कटू अनुभव घ्यावा लागला. अमेरिकेतील लोकशाही ही काळा-गोरा, आशियायी, हिस्पॅनिक, स्थलांतरित, मूळ रहिवासी असे भेद मानत नाही. ज्याला कठोर परिश्रम करून देशाचे भवितव्य घडवायचे आहे त्यांना या देशात जरूर स्थान आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा यांनी त्यांच्या विजयोत्सवी भाषणात म्हटले आहे. डॉ.अमी बेरा यांच्या रूपाने एका स्थलांतरित दांपत्याच्या मुलाच्या विजयाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत व एका वयात आलेल्या मुलीचे बाबा आहेत; त्यामुळे असेल कदाचित, पण त्यांची भूमिका लोकांना जास्त भावली.. गर्भपात व संततिप्रतिबंधाला विरोध केला तर आर्थिक समस्यांच्या खाईत गेलेल्या अमेरिकेपुढे लोकसंख्येची समस्या उभी राहू शकते हा धोका त्यांनी दाखवून दिला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2012 रोजी प्रकाशित
व्यक्तिवेध : डॉ. अमी बेरा
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसह प्रतिनिधिगृहासाठी (काँग्रेस) झालेल्या निवडणुकीत भारतीय-अमेरिकी असलेल्या पाच दिग्गजांना पराभवाचा फटका बसल्याच्या पाश्र्वभूमीवर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डॉ. अमी बेरा यांनी अतिशय अटीतटीच्या लढतीत मिळवलेले यश अधिक दिमाखदार आहे

First published on: 09-11-2012 at 01:18 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaktivedh dr ami bera