गेल्या पाच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील असा शिवाजी जाधव यांचा लौकिक आहे. महिन्याकाठी सुमारे ५० नवी प्रकरणे त्यांच्याकडे येतात. ३० ज्युनियर्स आणि साहाय्यक यांच्या मदतीने हे आव्हान ते पेलत असतात.  व्यवसाय सांभाळतानाच मागास असलेल्या आपल्या मराठवाडा विभागाचे नकारात्मक चित्र कसे बदलता येईल, याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्रातील अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात जातात. त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्यातला एक जण दिल्लीत सहज स्थायिक होऊ शकतो, असा विचार औरंगाबादमधील काही वकील मित्रांच्या चर्चेतून पुढे आला आणि मराठवाडय़ातील वसमतसारख्या मागास तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे शिवाजी जाधव सर्वोच्च न्यायालयात वकिली करायला जून १९८९ मध्ये दिल्लीत दाखल झाले. २४ वर्षांच्या या वाटचालीदरम्यान भरपूर यश आणि आर्थिक स्थैर्य गाठल्यानंतर आपण इतरांसाठीही बरेच काही करू शकतो, या विचाराने जाधवांना झपाटून टाकले आहे.
शिवाजी जाधव यांचे दिल्लीतील सुरुवातीचे वास्तव्य भरपूर हालअपेष्टा आणि संघर्षांचे ठरले. अशोक देशमुख, वामनराव महाडिक, विठ्ठलराव जाधव या खासदारांच्या आश्रयाला राहून त्यांनी दिवस काढले. अमेरिका सोडून उगाच आलो, असेही अनेकदा त्यांना वाटायचे. पण सर्व प्रतिकूलतेचा त्यांनी सोशिकपणे सामना केला. कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस केलेल्या साताऱ्याच्या लीना पाटील यांच्याशी शिवाजी जाधव यांचा फेब्रुवारी १९९१ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर दिल्लीतील महाराष्ट्र शासनाचे सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. कालांतराने या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला कोर्टात जाण्यासाठी खरेदी केलेली जुनी बजाज स्कूटर, थोडे पैसे हाती आल्यानंतर अ‍ॅड. उदय लळितांच्या वडिलांची विकत घेतलेली २५ वर्षे जुनी अ‍ॅम्बेसेडर आणि आता आलिशान बीएमडब्ल्यू कार.. मित्रांकडून साडेतीन लाख रुपये उसने घेत दिल्लीतील वास्तव्याला स्थैर्य देणाऱ्या सुप्रीम एन्क्लेव्हमधील फ्लॅटची खरेदी ते आज दिल्ली सीमेवरील नोइडामध्ये सुमारे दहा हजार चौरस फूट बांधकाम असलेला ऐसपैस बंगला.. डॉक्टर पत्नी लीना यांचे समाजकंटकांनी बजबजलेल्या त्रिलोकपुरी झोपडपट्टीत वीस वर्षांपूर्वी भाडय़ाच्या जागेत सुरू केलेले क्लिनिक ते मयूर विहारमध्ये स्वत:चे २५ बेडचे तीनमजली मॅटर्निटी अँड नर्सिग होम.. शिवाजी जाधव यांच्या यशाचा आणि भरभराटीचा हा चढता आलेख आहे. गेल्या पाच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील असा त्यांचा लौकिक आहे. महिन्याकाठी सुमारे ५० नवी प्रकरणे त्यांच्याकडे येतात. ३० ज्युनियर्स आणि साहाय्यक यांच्या मदतीने हे आव्हान ते पेलत असतात. महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका, जिल्हा, अनेक महापालिका, साखर कारखाने, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, बडय़ा राजकीय नेत्यांसह अनेक खासदार, आमदारांची निवडणूकविषयक प्रकरणे, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर, शेगावसारख्या देवस्थानांचे खटले त्यांनी हाताळले आहेत. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या खटल्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. पुण्याच्या आसपासच्या खंडकरी शेतक ऱ्यांच्या तीन पिढय़ांच्या संघर्षांअंती सुमारे ३५ हजार हेक्टर अतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत करण्याचे आदेश त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मिळवून दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिग्रहित केलेली मालेगाव, सिन्नर तालुक्यांतील गावे त्यांनी सोडवून आणली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जाधवांना या प्रकरणांतील यश सर्वाधिक समाधान देऊन गेले. विक्री कर निरीक्षक, शिक्षण सेवक, महाराष्ट्र वक्फ बोर्ड, विनय कोरेंचा साखर कारखाना अशी अनेक प्रकरणे जाधव यांनी यशस्वीपणे हाताळली आहेत. तरुण वयात शेतीत राबताना शेतकरी, मजूर आणि गोरगरिबांच्या स्थितीची जाणीव असल्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये ते शुल्कही आकारत नाहीत.
शिवाजी जाधव यांचा जन्म १४ जून १९६१ चा. नांदेडपासून ३० किमी अंतरावरील वसमत तालुक्यातील किन्होळा गावात त्यांच्या आजोबांची सात एकर शेती होती. वडील मुंजाजीराव जाधव गावातील पहिले मॅट्रिक आणि पदवीधर. वकील होण्याच्या जिद्दीने मुंजाजीरावांनी पंचायत समितीत विस्तार अधिकारी आणि शिक्षक म्हणून नोकरी केली आणि एलएलबी होताच नोकरीचा राजीनामा देऊन वसमतला वकिलीचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात भरभराट साधल्यानंतर बागायती जमीन घेतली. मुलांना शिकवले. १९८४ ते १९८९ या काळात ते वसमत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. जाधव यांचे धाकटे बंधू संजय औरंगाबादला वकील आहेत. बहीण विजया आणि त्यांचे पती बाळासाहेब कपाळे नांदेडला वकील आहेत. दुसऱ्या भगिनी सुनंदा यांचे पती रावसाहेब डवले पुण्यात शास्त्रज्ञ आहेत. आई निर्मला डोंगरगावच्या व्यवहारे कुटुंबातल्या. वडिलांना दोन भाऊ. एक शिक्षक, तर दुसरे सहकार विभागात नोकरीला होते. त्यांचे चुलत भाऊ अजूनही शेतीच करतात.
साताऱ्याच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस केलेल्या लीना जाधव यांच्याशी जाधव यांचा विवाह झाला. त्यांचे सासरे प्रा. के. व्ही. पाटील हे इंग्रजीचे प्राध्यापक आणि वकील. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आश्रमशाळेत शिकून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामाला वाहून घेतले. सासू डॉ. विमला पाटील शिवाजी महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या. पत्नीचे मामेभाऊ बार कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील प्रसिद्ध वकील आहेत. जाधव दाम्पत्याचा थोरला मुलगा आदित्य पुण्याला विधी महाविद्यालयात दुसऱ्या वर्गात शिकतो आहे, तर धाकटी अवंतिका केजीमध्ये आहे.
जाधव यांना दिल्लीत किंवा वसमतमध्ये यश सहजासहजी मिळाले नाही. बारावीनंतर  मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला जाण्यात अपयश आल्यावर त्यांना निराशेने ग्रासले होते. निदान पदवी असली तर चांगल्या मुलीशी लग्न जमेल या उद्देशाने बी.ए. करीत ते शेतावर मजुरांसोबत काम करायचे. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर वडिलांनी त्यांना पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजला शिकायला पाठवले. त्या वेळी १९८४ ते १९८९ या काळात वडील आमदार झाले होते. मुंबई विद्यापीठात एलएलएम केल्यानंतर वकिली करायचीच हे निश्चित झाले नव्हते. पण मुंबईत ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. एम. तारकुंडे यांचे सहकारी चित्तरंजन दळवींनी जाधवांना प्रेरणा दिली. अमेरिकेत व्हर्जिनिया विद्यापीठात त्यांनी उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळविला. खेडय़ातला मुलगा चालला म्हणून कमलकिशोर कदम यांनी जाण्या-येण्याचा खर्च दिला. तिथे एलएलएम करून वर्षभर मॅनहटनला नोकरी केली. पण वडिलांच्या आग्रहामुळे गावाला परतून औरंगाबाद खंडपीठात वकिली सुरू केली. वकील मित्रांच्या सल्ल्यातून कारकिर्दीसाठी दिल्लीला जाण्याचा विचार मनात पक्का झाला. आयुष्यात वेळेचे महत्त्व कळणे आवश्यक आहे. गेलेला क्षण परतणार नाही. तो सत्कारणी कसा लागतो यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. कुठलीही अपेक्षा न ठेवता सतत काम करीत राहिल्याने अपयश येणारच नाही, असे ते सांगतात. सरळ, सकारात्मक स्वभाव आणि धाडसी वृत्तीमुळे व्यक्तिगत आयुष्यात झटपट निर्णय घेतल्याने संधींचे सोने करणे शक्य झाल्याचे जाधव सांगतात.
त्यांच्यावर वडिलांचा खूपच प्रभाव आहे. स्वत:ची एवढी भरभराट झाल्यानंतर ग्रामीण भागाचा ओढा असलेल्या जाधव यांना आपल्या गावाकडे लक्ष द्यावेसे वाटते. अलीकडेच त्यांनी वसमतमध्ये वडिलांचा अमृतमहोत्सव साजरा केला. नऊ वर्षे मुख्यमंत्रिपद लाभूनही मराठवाडा खूपच मागासलेला आहे आणि नांदेडला धड एक विमानही चालू शकत नाही, याची त्यांना खंत वाटते. आपल्या भागाचा विकास कसा करता येईल, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शेतीवर अवलंबून न राहता शेतक ऱ्याला वर्षभर उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. अल्पभूधारक शेतक ऱ्यांच्या बेरोजगार मुलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वसमतला मित्रमंडळीच्या मदतीने तंत्रशिक्षणावर भर देणारी संस्था आणि आसपासच्या भागात उद्योगधंदे सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे. शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल आवश्यक करून सहाव्या वर्गापासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे. मराठवाडय़ात एक एकर शेती असलेला शेतमजूरही हुंडा घेतो. मुलीच्या लग्नासाठी हुंडा देणारे शेतकरी कर्ज फेडणे शक्य होत नसल्याने आत्महत्या करतात. जोडधंदा असेल तर अशा आत्महत्यांना बराच आळा बसू शकतो असे त्यांना वाटते.
पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी शेतक ऱ्यांना जोडधंदे व रोजगाराच्या अन्य संधी मिळवून दिल्या. अशी प्रगती मराठवाडा किंवा विदर्भात झाली नाही. या भागातील नेते समाजापेक्षा स्वत:चा विकास करण्यावर भर देतात. कारखान्यांचे उत्पादन सुरू होण्याआधीच परदेश वाऱ्या करतात. राजकारणात लोक स्वत:चा विकास करण्यासाठी, मोठे होण्यासाठी आणि पैसा कमावण्यासाठी येतात. तरुणांच्या प्रश्नांकडे कुणाचेच लक्ष नसते, अशी त्यांची व्यथा आहे. दिल्लीत वकिलीचा व्यवसाय सांभाळून अजूनही मागासच असलेल्या आपल्या भागाचे नकारात्मक चित्र कसे बदलता येईल, याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा