शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांच्या अटकेवरून राज्यात अस्वस्थता आहे. व्यवस्थेवर राग असणारा सुशिक्षित तरुण हिंसेच्या मार्गाने जाऊ नये यासाठी प्रबोधनाचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र आपल्याकडे त्याचीच वानवा असल्याने त्याचा फायदा उचलत नक्षलवादी शहराकडे वाटचाल करू लागले आहेत..
आमची चळवळ व्यवस्थाविरोधी आहे असे भासवत तरुणांना जाळय़ात ओढायचे, प्रत्यक्षात व्यवस्थेला विरोध करण्याऐवजी विकासालाच विरोध करायचा आणि त्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला हिंसक कारवायांचा तडाखा द्यायचा. अशा कारवायांच्या माध्यमातून चक्रव्यूहात अडकलेल्या तरुणांचे परतीचे मार्ग बंद करून टाकायचे हेच नक्षलवाद्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे. पुण्याच्या कबीर कला मंचच्या शाहीर शीतल साठे व सचिन माळी नक्षलवाद्यांच्या याच धोरणातून समोर आलेल्या सापळय़ात अडकले व आता त्यांची रवानगी तुरुंगात झाली आहे. या दोघांच्या अटकेवरून सध्या राज्यातील पुरोगाम्यांचे वर्तुळ अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता साहजिकसुद्धा आहे. विद्रोही कविता, शाहिरी किंवा पोवाडय़ाच्या माध्यमातून व्यवस्थेविरुद्ध संताप व्यक्त करणाऱ्या या तरुणांना तुरुंगात जावे लागले म्हणून अनेक जण हळहळ व्यक्त करत आहेत. मात्र हे करतानाच नक्षलवाद्यांचा शहरी भागासाठीचा नेमका अजेंडा काय आहे, ते कशा पद्धतीने अशा हुशार तरुणांना जाळय़ात अडकवतात व यातून त्यांचे नेमके कोणते उद्देश सफल होतात यावरही आता चर्चा होणे गरजेचे झाले आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नक्षलवाद्यांच्या नादाला लागणाऱ्या अशा तरुणांच्या बाबतीत कायदेशीर भूमिका घेताना पोलिसांचे नेमके कुठे चुकते यावरही यानिमित्ताने विचार होणे आवश्यक आहे.
गेल्या ३० वर्षांपासून जंगलात सक्रिय राहून या देशाची लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्या नक्षलवाद्यांना अलीकडच्या काही वर्षांत शहराचे वेध लागले आहेत, ही बाब लपून राहिलेली नाही. शहरात सक्रियता दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षलवाद्यांना आजवर जंगलात ते जे करत आले, ते शहरात त्यांना करायचे नाही. शस्त्रे हाती घेतलेले नक्षलवादी शहरात दडून आहेत व पोलिसांची त्यांच्याशी चकमक होते आहे, असे चित्र त्यांना उभे करायचे नाही. शहरी भागात शोषणाविरुद्ध लढा देणाऱ्या वेगवेगळय़ा संघटना, संस्था यात शिरकाव करायचा, त्यासाठी वेगवेगळे मुखवटे धारण करायचे आणि या शिरकावातून प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण करता येईल ते बघायचे हेच काम नक्षलवाद्यांच्या शहरी भागातील ‘कॅडर’ वर सोपवण्यात आले आहे. वेळ आलीच तर एखादी संघटना स्थापन करा, तिचे स्वरूप लोकशाहीवादी राहील याची काळजी घ्या व हीच संघटना मग मोठी संघटनात्मक शक्ती असलेल्या संघटनेशी आंदोलनापुरती जोडा आणि आंदोलनात हिंसाचार करून बाजूला व्हा अशीच नक्षलवाद्यांची शहरी भागात काम करण्यासंबंधीची रणनीती आहे. हे करताना जो मुख्य ‘कॅडर’ असेल, त्याने कुठेही आपली खरी ओळख दाखवायची नाही. अशी सक्रियता दाखवताना जे तरुण हाताशी लागतील, त्यांना हळूहळू क्रांतीचे धडे द्या व त्यातून काहींचे जरी ‘ब्रेनवॉश’ पूर्ण झाले तर त्यांना चळवळीत स्थान द्या, असेच या कामाचे स्वरूप आहे.
नक्षलवाद्यांनी ‘शहरी काम के बारे मे’ अशी एक पुस्तिकाच तयार केली असून त्यात या सर्व बाबी विस्ताराने नमूद करण्यात आल्या आहेत. साठे व माळी हे नक्षलवाद्यांच्या याच धोरणाचे बळी आहेत. हे वास्तव आता साऱ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. साठे व माळी यांना अटक होणे, त्यांच्यावरील कारवाईचा मुद्दा वृत्तपत्रातून गाजणे हे नक्षलवाद्यांना सुखावणारे आहे. हा सर्व घटनाक्रम वाचणारे किंवा ऐकणारे चळवळीकडे आणखी कुतूहलाने बघतील, त्यातून त्यांच्यात आकर्षण निर्माण होईल. त्यामुळे काहीजण चळवळीकडे ओढले जातील हेच नक्षलवाद्यांना अपेक्षित आहे. ही अपेक्षा ठेवताना नक्षलवाद्यांनी केवळ तरुणाईला गृहीत धरले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाय या दोघांवर कारवाई झाल्यामुळे समाजात आणखी तीव्र व्यवस्था व सत्ताविरोध निर्माण झाला तर तोही नक्षलवाद्यांना हवाच आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांनी आजवर काहीच तर केले नाही, असा युक्तिवाद केला जातो. प्रत्यक्षात त्यात काही तथ्य नाही. शहरी भागात त्यांच्याकडून गनिमी पद्धतीने हिंसाचाराला उत्तेजन देण्याचे अनेक प्रकार राज्यात घडले आहेत. खरलांजी हत्याकांड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. समाजाला हादरवणाऱ्या या घटनेतील पोलिसांकडे असलेली बीभत्स छायाचित्रे सोशल मीडियावर टाकण्याचे कामच नक्षल समर्थकांनी केले. त्यातून हिंसाचाराचा आगडोंब उसळेल हे नक्षलवाद्यांनी गृहीत धरले होते. या हिंसाचाराचे लोण प्रत्येक जिल्हय़ात कसे पोहचवता येईल यासाठीसुद्धा नक्षलवाद्यांचे समर्थक तेव्हा सर्व ठिकाणी सक्रिय झाले होते. त्याच काळात पुण्याजवळ एका प्रकल्पाला विरोध करण्यावरून झालेल्या हिंसाचारातसुद्धा याच समर्थकांचा हात होता. या साऱ्या बाबींच्या नोंदी गृहखात्याकडे उपलब्ध आहेत. शहरी भागात काम करणारे नक्षलवाद्यांचे समर्थक लोकशाहीवादी संघटनांमध्ये केव्हा व कशी घुसखोरी करतात याचा पत्ताही अशा संघटनांच्या नेतृत्वाला लागत नाही. हिंसाचार झाला की मग पोलीस याच संघटनांवर कारवाई करतात व हे समर्थक बाजूला होतात.
आगामी काळात अशा घटना वाढणार यात शंका नाही. कारण या समर्थकांची सक्रियता, वेगवेगळय़ा नावाने सुरू असलेल्या त्यांच्या संघटना आता राज्यातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्हय़ात कार्यरत आहेत. त्यामुळे विविध आंदोलनात सनदशीर मार्गाने सक्रिय राहणाऱ्यांनी आता हा धोका लक्षात घेणे गरजेचे झाले आहे. नक्षलवाद्यांचे हेच समर्थक शहरी भागात सक्रियता दाखवतांना जाणीवपूर्वक सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध व्यक्ती, समाजसेवक यांच्याशी जवळीक साधतात, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. पोलिसांनी या समर्थकांवर कारवाई केलीच तर हेच समाजसेवक ‘तो त्यातला नाही’ असे सांगत त्याचा विरोध करतात. प्रत्यक्षात या समर्थकाचे मूळ काम काय हे या समाजसेवकापर्यंत गेलेलेच नसते. आज राज्यात ठिकठिकाणी हेच प्रकार घडताना दिसत आहेत, पण हे समर्थक एका निश्चित सूत्रांशी बांधले गेले आहेत हे वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे. शहरी भागासाठी नक्षलवाद्यांनी ही रणनीती का अवलंबली या प्रश्नाचे उत्तरसुद्धा स्पष्ट आहे. जंगलात सक्रिय असणाऱ्या नक्षलवाद्यांकडून सतत होणारा हिंसाचार, त्यातून त्यांची वाईट होत चाललेली प्रतिमा यावर पांघरूण घालण्यासाठी व जनतेच्या भल्यासाठीच ही चळवळ आहे हे दर्शवण्यासाठी नक्षलवादी अशी खेळी सतत खेळत असतात. याशिवाय प्रभावक्षेत्र विस्ताराचा उद्देशसुद्धा यातून साध्य होतो हे त्यामागील वास्तव आहे. ‘नक्षलवाद्यांच्या विचाराचे समर्थन करतो पण हिंसेचे नाही’, अशी भूमिका घेणारा मोठा वर्ग समाजात आहे. सैद्धांतिक पातळीवर ही भूमिका अनेकांना पटते. प्रत्यक्षात नक्षलवाद्यांनी गेल्या ३० वर्षांत त्यांच्या प्रभाव क्षेत्रात त्यांनी आजवर मांडलेला विचार प्रत्यक्षात कृतीत किती आणला हा खरा प्रश्न आहे. दुर्दैवाने त्याचे उत्तर नाही असेच आहे. आम्ही आदिवासींच्या भल्यासाठी लढतो असे सांगणाऱ्या या चळवळीने आजवर किती आदिवासींचे भले केले या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. आदिवासींनी सरकारवर अवलंबून न राहता ‘जनताना सरकार’ या संकल्पनेचा स्वीकार करावा, असे सांगत नक्षलवाद्यांनी दोन वर्षांपूर्वी आदिवासींना एकत्र करून ४०० गावात शेततळी बांधली. या तळय़ांमुळे सिंचन क्षेत्र वाढले व आदिवासींना दुप्पट पीक झाले. आदिवासींकडे असलेले हे अतिरिक्त पीक नक्षलवाद्यांनी चळवळीसाठी म्हणून मागून घेतले. परिणामी आदिवासी होता तिथेच राहिला. हे वास्तव शहरी भागात राहून या चळवळीच्या नावाने गळे काढणाऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. या चळवळीच्या मागे फरफटत गेलेल्या आदिवासींच्या नशिबी आजवर मृत्यूशिवाय काहीच आले नाही ही वस्तुस्थिती आहे. ही पाश्र्वभूमी शहरी भागात राहणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी आज समजून घेण्याची गरज आहे. क्रांतीच्या मोहात पडून या चळवळीचा मागे जाणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची पोलिसांची भूमिकासुद्धा योग्य नाही. आज साठे व माळीच्या बाबतीत हे घडले म्हणून चर्चा सुरू झाली. सात वर्षांपूर्वी चंद्रपुरात शस्त्रांचे कुरीयर म्हणून काम करणाऱ्या १२-१३ तरुणांवर अशीच कारवाई झाली. काही वष्रे तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर सुटताच हे तरुण थेट जंगलात गेले व त्यांनी शस्त्रे हाती घेतली. त्यामुळे थेट कारवाई करण्याच्या आधी या तरुणांची मानसिक अवस्था समजून घेणे व त्यांना सुधारण्याची संधी देणे असे प्रकार पोलिसांकडून अपेक्षित आहेत. शेजारच्या आंध्रप्रदेशात हे प्रयोग यशस्वी ठरले आहेत. अशा तरुणांवर लगबगीने कारवाई करणाऱ्या पोलिसांकडे फारसे पुरावेसुद्धा नसतात, मग न्यायालयातून हे तरुण निर्दोष सुटतात. यामुळे चळवळ कमी न होता उलट वाढते हा आजवरचा अनुभव आहे. व्यवस्थेवर राग असणारा सुशिक्षित तरुण हिंसेच्या मार्गाने जाऊ नये यासाठी केवळ कायद्याचा नाही तर प्रबोधनाचा वापर करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने त्याचीच वानवा आपल्या राज्यात आहे. नेमका त्याचाच फायदा उचलत नक्षलवादी वेगाने शहराकडे वाटचाल करू लागले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा