प्राथमिक शाळेतील शिक्षिका, हा काही कुणी जीव ओवाळून टाकावा असा पेशा मानला जात नाही. परिस्थितीनुसार स्वीकारलेली एक नोकरी, असेच याही नोकरीचे स्वरूप अनेकांसाठी असते.. मग या शिक्षिका भारतीय असोत की अमेरिकन.. अर्थात, अपवाद सर्वत्रच असतात. व्हिक्टोरिया सोटो ही मात्र त्या अपवादांपैकी सर्वाधिक अपवादात्मक मानली जाईल. तिने ही नोकरी  आवडीने स्वीकारली आणि जिवाची बाजी लावून आपल्या वर्गातल्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत ती जिथे शिकवत होती, त्याच कनेक्टिकट राज्यात,  न्यूटाउन गावातील ‘सँडी हूक एलिमेंटरी स्कूल’ या शाळेत शुक्रवारी अ‍ॅडम लान्झा या माथेफिरूने ते भयावह हत्याकांड घडवले.. कुणीच याच्यापासून वाचू शकत नाही, हे लक्षात येत असताना व्हिक्टोरियाने तिच्या ‘वर्गखोली क्रमांक दहा’मधल्या मुलांना एकत्र केले आणि गोळीबारापासून दूर, भिंतीतल्या सांदीकडे नेले. बेछूट गोळीबारापासून मुले वाचू शकली नाहीत, पण त्या मुलांच्या आधी व्हिक्टोरियाच्या पाठीची चाळण झाली होती. मुले आणि त्यांना वाचवण्यासाठी हात पसरलेली, अनेक गोळय़ांनी छिन्न झालेली व्हिक्टोरिया, असे दृश्य या शाळेत नंतर शिरलेल्या पोलिसांनी पाहिले. याच शाळेच्या मुख्याध्यापिकांनीही मुलांचा वाचवण्याचा असाच प्रयत्न केला होता. पण त्या मुख्याध्यापिका, आणि व्हिक्टोरिया कोण? एक साधी २७ वर्षांची अविवाहित तरुणी.. याच शाळेत केवळ एक मदतनीस म्हणून ती पाच वर्षांपूर्वी काम करू लागली आणि इतिहास व  प्राथमिक शिक्षण यांचे अभ्यासक्रम पूर्ण करून ती इथेच शिक्षिका म्हणून रुजू झाली. आता याच पेशात राहायचे, असे तिने ठरवून टाकले आणि शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशही मिळवला. हे सारे, फक्त स्वत:च्याच आवडीसाठी करावे, अशी तिच्या घरची परिस्थिती नाही. आई अमेरिकी आणि वडील पोतरे रिकोहून येथे आलेले. बैठे (एकही मजला नसलेले) पत्र्याच्या छपराचे घर. इथे ती आईवडिलांसोबत.. आणि कुत्र्यासोबत राहायची. लॅब्राडोर आहे तो.. रॉक्सी नावाचा. फावल्या वेळातही डेटिंग वगैरे न करता चर्चमध्ये जायची. रॉक्सीला फिरायला न्यायची. हत्याकांड वगैरे टीव्हीवरही ती फार पाहात नसेल.. पण आता जग तिला चित्रवाणीवर पाहात आहे आणि वृत्तपत्रे तिच्या धैर्याचे कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा