कोणत्याही खेळाडूचे यश वा अपयश हे त्याचे एकटय़ाचे नसते. विजयरथाचे एक चाक त्याचे स्वतचे असते आणि दुसरे संघटनेचे. खेळ आणि खेळाडू यांहून संघटना मोठय़ा झाल्या की काय होते ते भारतीय क्रीडाक्षेत्र सातत्याने अनुभवत असून तीच चाके एकसुरात चालली तर काय होते हे मेरी कोम, हॉकी आणि कबड्डी संघाच्या यशातून दिसत आहे.
तब्बल सोळा वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने आशियायी क्रीडा स्पर्धा गाजवली. सुवर्णपदक जिंकले. तेही पाकिस्तानला हरवून. त्यामुळे तर अनेकांची विजयादशमी खंडेनवमीलाच उजाडली. कबड्डी हा तर अस्सल भारतीय मातीतला खेळ. त्यातही आपल्या महिला आणि पुरुषांच्या संघाने पराक्रम गाजवला. एकाच दिवशी या दोन्ही संघांनी सुवर्णपदकांची कमाई केली. ही कमाई म्हणजे दुधात साखरच. तशी आतापर्यंत भारताने बऱ्यापैकी पदकांची कमाई केली आहे. त्यात हुरळून जावे असे काही नसले, तरी तोंड पाडून बसावे असेही काही नाही. एम. सी. मेरी कोम हिने मुष्टियुद्धात मिळविलेले सुवर्णपदक ही तर तमाम भारतीयांसाठी अभिमानाने मिरवावी अशीच गोष्ट आहे. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये खरे तर तुलना करता कामा नये. कबड्डी, हॉकी यांसारख्या सांघिक खेळातील विजय आणि मुष्टियुद्धासारख्या वैयक्तिक खेळातील यश यांची तुलनाही होऊ शकत नाही. तरीही मेरी कोमच्या यशाचा आनंद कांकणभर अधिकच आहे. याचे कारण तिची जिद्द. इतर क्षेत्रांत वाढते वय आणि बऱ्यापैकी अनुभव असला की माणसाला प्रगल्भ वगैरे म्हटले जाते. खेळाच्या मैदानात तसे नसते. तेथे अनुभव कामी येतो पण वय मार देते. वाढत्या वयाबरोबरच हालचाली मंदावतात. फॉर्म ढळतो आणि दिग्गज म्हटल्या जाणाऱ्या खेळाडूंची कारकीर्दही घसरणीला लागते. या नियमाला मेरी अपवाद ठरली. मणिपूरसारख्या तुलनेने मागास, दुर्गम अशा राज्यातून आलेली मेरी मुळात मुष्टियुद्धात देशाचे प्रतिनिधित्व करते ही बाबच अप्रूपाची होती. या खेळात दोन दशकांपूर्वी भारत कुठेही नव्हता. तेव्हा तिने देशाला पदकांची चटक लावली. तीन वेळा ती विश्वविजेती ठरली. त्यानंतर २००७मध्ये ती आई झाली. जुळ्या मुलांना तिने जन्म दिला. यामुळे तिची कारकीर्द संपुष्टात येईल, असे सर्वानाच वाटले होते. पण या माता मेरीने ते आडाखेही चुकवले. त्यानंतर दोन वेळा विश्वविजेतेपदाचा मुकुट पटकावून मातृत्वाने बाई अपंग बनत नसते हेच तिने सिद्ध केले. २०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले. ती घटनाही ऐतिहासिकच. एक तर त्या स्पर्धेत प्रथमच महिला मुष्टियुद्धाचा समावेश झाला होता आणि त्यात पहिल्यांदाच एका भारतीय महिलेचे नाव पदकावर कोरले गेले होते. असा इतिहास रचणाऱ्या मेरीने गेल्या वर्षी तिसऱ्या अपत्याला जन्म दिला. ही तिच्या कारकिर्दीची अखेर ठरली असती. किंबहुना ती घसरणीला लागल्यासारखेच झाले होते. राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणी स्पर्धेत ती पराभूत झाली होती. पण त्यानंतर दोनच महिन्यांत हे ३१ वर्षीय बावनकशी सोने आशियायी स्पर्धेत झळाळले. एका भारतीय गृहिणीचे हे यश आहे ही यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट. प्रेरणादायी वगैरे शब्द घासून गुळगुळीत झाले असले, तरी मेरीच्या या कहाणीला ते चपखल बसतात. तेव्हा तिच्या यशाचे कौतुक हे झालेच पाहिजे. ते होतही आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी तर हे यश आपलेच असे समजून नाचत आहेत आणि त्या मेरीसंकीर्तनात सर्वानाच सरिता देवीचा मात्र विसर पडला.
सरळ पंचेस लगावून प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व गाजवणारा विजयी ठरतो, हा बॉक्सिंगमधील सर्वसाधारण नियम. पण तो बदलला गेला. एखादा बॉक्सर प्रतिस्पध्र्याला किती पंच लगावतो आणि संपूर्ण लढतीत प्रतिस्पध्र्याकडून किती मार खातो, यावरून विजेता ठरवण्याचे सर्वाधिकार पंचांना देण्यात आले. त्याचा फटका सरिता देवीला बसला. उपांत्य फेरीतील संपूर्ण लढतीत तिने कोरियाच्या जीना पार्कवर वर्चस्व गाजवले. पण विजयी ठरली जीना पार्कच. हा निर्णय धक्कादायकच होता. त्याविरुद्ध भारतीय ऑलिम्पिक संघटनेने गदारोळच करायला हवा होता. पण अपयशाला कोणी वाली नसतो. सरिता देवी आपल्यावरील अन्यायामुळे आक्रंदन करीत असताना संघटनेचा एक पदाधिकारीही तिच्याकडे फिरकला नाही. या निर्णयाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाकडे तक्रार नोंदवायची, तर त्यासाठी आधी ५०० डॉलर शुल्क भरावे लागते. तेही सरिता देवीला सहकारी आणि क्रीडा पत्रकार यांच्याकडून हातउसने घ्यावे लागले. पण पंचांविरुद्ध दाद मागण्याची तरतूदच नियमांत नसल्याचे सांगून महासंघानेही तिची तक्रार फेटाळून लावली. सरिता देवीने अखेर भर पदक वितरण सोहळ्यात पदक नाकारले. त्यामुळे आपल्यावर बंदी येऊ शकते हे माहीत असूनही तिने ते केले. तो खरे तर आपल्या ऑलिम्पिक संघटनेला तिने लगावलेला गुद्दा होता. पण कातडी गेंडय़ाची असल्यावर अशा फटक्यांचा मार लागतच नसतो. वस्तुत: कोणत्याही खेळाडूचे- मग तो वैयक्तिक क्रीडा प्रकारातील असला तरी- यश वा अपयश हे त्याचे एकटय़ाचे नसते. विजयरथाचे एक चाक त्याचे स्वत:चे असते आणि दुसरे संघटनेचे. खेळ आणि खेळाडू यांहून संघटना मोठय़ा झाल्या की काय होते ते भारतीय क्रीडा क्षेत्र सातत्याने अनुभवते आहे आणि तीच चाके एकसुरात चालत असतील तर काय होते हे मेरी कोमच्या, हॉकी संघाच्या आणि कबड्डी संघाच्या यशातून दिसत आहे.
भारतीय मुष्टियुद्ध संघटनेत गेली दोन वर्षे सुरू असलेला वाद आता निवळला आहे. तो मेरी कोमच्या संघर्षांला प्रेरणादायीच ठरला आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर भारतीय हौशी मुष्टियुद्ध संघटनेवर निवडणुकांमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय संघटनेने बंदी आणली. त्यामुळे दोन वर्षे भारतीय मुष्टियोद्धय़ांना तिरंग्याऐवजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ध्वजाखाली उतरावे लागले. या बंदीमुळे प्रशिक्षकांना खेळाडूंबरोबर स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे मुष्टियोद्धय़ांची कामगिरी खालावली. आशियाई स्पर्धेआधी बॉक्सिंग इंडियाच्या छताखाली एकत्र येऊन नवी संघटना स्थापन झाल्यामुळे भारतीय मुष्टियोद्धय़ांना पहिल्यांदाच तिरंग्याखाली उतरण्याची संधी मिळाली आणि मेरी कोमच्या सुवर्णपदकानंतर दोन वर्षांत पहिल्यांदाच राष्ट्रगीत दुमदुमले. हॉकीचेही असेच. के. पी. एस. गिल यांचा एककल्ली कारभार आणि त्यानंतर दोन संघटनांच्या वादात भारतीय हॉकी भरडली गेली होती. भारतीय हॉकी महासंघ आणि हॉकी इंडिया यांच्यातील मान्यतेसाठीच्या वादामुळे खेळाडूंची कामगिरीही घसरत चालली होती. हॉकीमध्ये १९३० ते १९६०च्या दशकात सुवर्णकाळ अनुभवल्यानंतर १९८०नंतर भारतीय हॉकीची पीछेहाट होत गेली. गेल्या दीड दशकात भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरण्यासाठीही झगडावे लागत होते. आशियामध्ये हॉकीत महासत्ता असलेल्या भारताला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी १६ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. पण ‘देर आए, दुरुस्त आए’ असे म्हणत भारतीय हॉकी संघाने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. एरवी भारताला शेवटच्या क्षणापर्यंत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची वाट पाहावी लागत होती. पण आता दोन वर्षांआधीच रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवल्यामुळे भारताला या स्पर्धेची तयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.
इन्चॉनमधील स्पर्धेने हा मोठाच धडा भारतीय क्रीडा क्षेत्राला दिला आहे. विजयरथाची चाकं भक्कम असतील तर खेळाडूंना शिखर गाठता येते, हे मेरी कोम आणि हॉकी संघाच्या सोनेरी कामगिरीने दाखवून दिले. खेळाडूंच्या यशात त्यांच्या वैयक्तिक मेहनतीबरोबरच संघटनेचे पाठबळही महत्त्वाचे असते. खेळमैदानातही राजकारणाचा चिखल झाला, तर पदक मिळविणारे पाय गाळातच जाणार, हे लक्षात ठेवलेले बरे.
विजयरथाची चाकं!
कोणत्याही खेळाडूचे यश वा अपयश हे त्याचे एकटय़ाचे नसते. विजयरथाचे एक चाक त्याचे स्वतचे असते आणि दुसरे संघटनेचे.
First published on: 04-10-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Victory of boxer mary kom indian hockey and kabaddi team in asian games