|| संहिता जोशी
‘टक्कल’ म्हटलं की पोक्त पुरुषाला ते असणार, अशी अटकळ बांधली जाते.. ती ८० टक्के वेळा बरोबरही निघते, पण विदाविज्ञानात हे ‘८० टक्के बरोबर’ देणारं प्रारूप चालत नाही. सरसकटीकरण केल्यास निष्कर्ष चुकणारच, वैविध्य लक्षात घ्यावंच लागणार, इथं उघड असतं..
काही शब्दांच्या अर्थाचे तपशील अगदी विरुद्धार्थी असतात. दुष्काळ अतिवृष्टीमुळेही येऊ शकतो; पण त्यासाठी ‘ओला दुष्काळ’ अशी शब्दरचना करावी लागते. त्याशिवाय दुष्काळ म्हणलं तर कमी पावसामुळे येणारी परिस्थिती असा अर्थ आपण लावतो. तसं कुणाला टक्कल आहे असं म्हणल्यावर ठरावीक वय उलटलेला पुरुष असेल असं आपण समजतो. तरुण पुरुषांना टक्कल असू शकतं; विविध रोगांमुळे, बालाजीला जाऊन आल्यामुळे कोणत्याही वयाच्या, लिंगाच्या व्यक्तींना टक्कल असू शकतं. सगळ्या वयस्क पुरुषांना टक्कल पडतंच असंही नाही.
विदाविज्ञानातली प्रारूपं (मॉडेल) अशासारख्या शक्यतांचा वापर करतात. त्यासाठी वरच्यासारखंच लुटुपुटुचं उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीला टक्कल आहे तर समजा ती वयस्क पुरुष असण्याची शक्यता ८० टक्के आहे. उरलेले (२० टक्के) टक्कल असणारे लोक तरुण आणि स्त्रिया असू शकतात. समजा प्रारूपानं सगळ्या टकल्या व्यक्तींचं वर्गीकरण वयस्क पुरुष असं केलं तर ते प्रारूप ८० टक्के अचूक असेल- हा आकडा बारका नाही- पण त्या प्रारूपाची सारासार विचारशक्ती, किंवा उपयुक्तता शून्य असेल. समजा त्यात भर घालत गेलो; मिशा असतील तर पुरुष; कानातले घातले असतील तर स्त्री; चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर वयस्क; त्यानुसार टक्कल असणाऱ्या व्यक्तीचं वर्गीकरण बदलत जाईल.
ही सगळी सरसकटीकरणं आहेत. सगळ्या स्त्रिया कानातले घालत नाहीत; कानातले घालणाऱ्यांत काही पुरुषही असतात. सरसकटीकरणं सांख्यिकी पातळीवर अतिशय उपयुक्त असतात. यात सांख्यिकी हा शब्द महत्त्वाचा. मोठय़ा प्रमाणावर वानोळा (सॅम्पल) गोळा केला तर सरसकटीकरणं वापरून त्यांच्याबद्दल काही तरी शिकता येतं. मात्र ते एका व्यक्तीला लागू असेल असं नाही. टकलाचंच उदाहरण घेतलं तर पर्ससि खंबाटा तेव्हा आरोग्यवंत, तरुण, स्त्री असूनही तिला काही काळ टक्कल होतं- चित्रपटातल्या भूमिकेची गरज म्हणून तिनं टक्कल केलं होतं. टकलाबद्दल वर जी सरसकटीकरणं मांडली त्यांतलं एकही तिला लागू पडलं नसतं. पिंडी ते ब्रह्मांडी असतं, पण ब्रह्मांडी ते पिंडी असेलच असं नाही.
समाजातल्या मोठय़ा लोकसंख्येसाठी एखादी गोष्ट, एखादं (अव)गुणवर्णन लागू असेल म्हणून ते त्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला लागू पडेलच असं नाही. तसंच, कोणतीही एक व्यक्ती सगळ्यात बाबतीत अपवाद असत नाही. त्याचं एक उदाहरण पाहा, समाजात बहुतेकसे लोक पीएचडी नसतात, पण मी आहे. मात्र माझी उंची, वजन वगरे गोष्टी अगदी सरासरीच्या आसपास आहेत. एखाद्या जातीच्या, विद्यापीठातल्या, देशातल्या लोकांचं सरसकट वर्णन एकेकटय़ा व्यक्तीला लागू पडतंच असं नाही.
हेच उदाहरण पुढे वाढवता येईल. पर्ससि खंबाटाला तेव्हा टक्कल होतं म्हणून तिला नेहमीच टक्कल होतं असं नाही. नैसर्गिक टक्कल कृत्रिमरीत्या घालवता येईल. विदाविज्ञान किंवा सांख्यिकी वापरून ज्या गुणधर्माचा अभ्यास होतो किंवा भाकितांसाठी वापरले जातात, ते गुणधर्म टिकाऊ असतात असंही नाही. उदाहरणार्थ, लोक गूगलवर काय शोधतात, त्यांत कोणकोणते शोध सर्वात लोकप्रिय आहेत हे दर तासागणिक बदलत असेल. फेसबुक, ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवर आपण कोणाशी सर्वाधिक जोडलेले आहोत, आपल्यावर कोणाचा सगळ्यात जास्त प्रभाव पडतो हेही दर तासाला नाही तरी काही कालावधीनंतर बदलत जात असेल.
आपलं व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरचं वागणं-बोलणं, आवडीनिवडी सतत बदलत असतात. गूगलवर सगळ्यात लोकप्रिय काय आहे, ही आपली सामाजिक आवडनिवड म्हणू आणि समाजमाध्यमांवर आपल्यावर कोणाचा प्रभाव पडतो, ही व्यक्तिगत आवडनिवड. या सगळ्यांत (अ)नियमितपणे बदल होत असतात. दोन्ही प्रकारच्या बदलांमुळे विदावैज्ञानिकांनी आज तयार केलेली प्रारूपं उद्या लागू पडतीलच असं नाही. एखाद्या समाजगटात प्रामुख्यानं दिसणारी लक्षणं उद्या दिसतीलच असं नाही.
युरोपमध्ये आता जीडीपीआर किंवा सामाजिक विदासंरक्षण कायदा लागू आहे. त्यानुसार व्यक्तींना आपल्या विदेवर काही अंशी ताबा देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीवर काही दिवाणी वा फौजदारी खटला सुरू होता. काही वर्षांनी त्या खटल्याचा निकाल लागला. त्यानंतर न्यायालयानं त्या व्यक्तीला निर्दोष जाहीर केलं किंवा ठरावीक शिक्षा भोगल्यावर त्या नोंदी नष्ट करण्याची अनुमती दिली. या सगळ्या बातम्या वेळोवेळी वर्तमानपत्रांत, पर्यायानं आंतरजालावरही येत होत्या. हे सगळं घडून गेल्यानंतर आणखी काही वर्षांनीही या व्यक्तीबद्दल गूगलल्यावर जुन्या बातम्या सापडतात. त्यामुळे समजा या व्यक्तीला नोकरी मिळण्यात, किंवा घर विकत/भाडय़ानं घेण्यात अडचणी येत आहेत; तर ती व्यक्ती गूगल आणि इतर कोणत्याही शोधइंजिनाला विनंती करून अशा प्रकारचे निकाल कुणालाही दाखवण्यावर बंधन आणू शकते.
मूळ बातम्या तशाच राहतील. वर्तमानपत्राच्या संस्थळांनी त्या बातम्या काढून टाकण्याची गरज नाही; तसं केल्यास ते पूर्वलक्ष्यी प्रभावानं अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन ठरेल. म्हणजे ही विदा तशीच राहील. मात्र या विदेचा उपयोग करण्याची परवानगी कुणालाही असणार नाही.
(एक समांतर, गमतीशीर, अमेरिकी उदाहरण. ‘थेरानोस’ नावाची कंपनी एलिझाबेथ होम्स चालवत होती. सुरुवातीला कंपनीला मोठं यश मिळालं; पण पुढे होम्सनं काही घपला करून कंपनीची मुख्य सेवा चालवली होती, असं लक्षात आलं. ‘थेरानोस’ बुडली वगरे.. पण एलिझाबेथ होम्स असं नाव असणाऱ्या दुसऱ्याच व्यक्तीला नोकरी किंवा भाडय़ाचं घर मिळवताना त्रास होतो.)
भारतात आता व्यक्तिगत विदा संरक्षण कायदा (२०१९) येतो आहे. युरोपातल्या जीडीपीआरमध्ये जसा व्यक्तींना आपल्या विदेवर ताबा दिला आहे, तसाच भारतातही असेल, असं सध्या तरी दिसत आहे. (कायदा केला जातो आणि मग तो वापरून खटले येतात, तेव्हा तो कायदा किती शक्तिशाली आहे हे दिसायला लागतं.) मात्र या कायद्यात सरकारला भारतीयांच्या विदेवर अमर्याद अधिकार आहेत. कोणतीही आंतरजाल-शोधइंजिनं एखाद्या व्यक्तीच्या खासगीपणाचा वापर करू शकणार नाहीत; मात्र सरकार करू शकेल. यात मुळातच समानता नाही. आपली विदा वापरून काय-काय करता येऊ शकतं, हे आपल्याला समजणार नाही; कारण आपण वापरणार गूगल, बिंग, याहू इत्यादी शोधइंजिनं. पण सरकार आपल्या विदेचा वापर करू शकतं.
भूतकाळात आपण काही मतं व्यक्त केली असतील; काही सरसकटीकरणं आपल्यालाही लागू असतील. ती सगळी विदा, माहिती, लेखन किमान येती काही र्वष तशीच टिकून राहणार आहे. एवढंच नाही, त्यावरून आपल्याबद्दल जे निष्कर्ष काढलेले असतील, तेही तसेच टिकून राहणार आहेत. समजा, गूगल, फेसबुकनं अनुमान काढलं असेल की मला मांजरं आवडतात, तर ते बदलण्याची शक्यता कमीच. हेच राजकीय विचारसरणीबद्दलही करता येईल. कदाचित मला मांजरांची अॅलर्जी निर्माण होईल आणि माझी राजकीय मतंही बदलू शकतील. अॅलर्जी झाल्यामुळे एरवी कुणाचंही व्यक्तिगत नुकसान होण्याची शक्यता नाही; पण राजकीय मतांमुळे नुकसान होऊ शकतं. त्या मतांमुळे आपलं नुकसान होतंय असं वाटलं तर ती विदा आंतरजालावर कुणालाही सहज सापडणार नाही, याची सोयही आपल्याला मिळेलसं दिसतंय.
कुतूहलापोटी कन्हैया कुमारबद्दल बातम्या शोधल्या. त्याचे बनावट व्हिडीओ फिरवले गेल्याची बातमीही जुनी झाली आणि त्यानं लोकसभा निवडणूक लढवल्याचीही जुनीच झाली; पण अजूनही त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला चालवल्याच्या बातम्या सापडल्या.
लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
ईमेल : 314aditi@gmail.com