क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाचा आपल्या फायद्यासाठी वापर करणाऱ्यांचे कुणी काही वाकडे करू शकत नाही. जोवर अशा अपप्रवृत्तींना गुन्हा ठरवले जात नाही आणि त्यासाठी कठोर शिक्षा दिली जात नाही, तोवर त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहणार. आयपीएलचे नवे प्रकरण हे बोटचेप्या आणि सारवासारवीच्या धोरणाचा परिपाक आहे.

गेले चार दिवस फिक्सर खेळाडूंच्या बाजूने बोलणाऱ्या बीसीसीआयने कोलांटउडी मारून ‘जे झाले, ते भयावह आहे आणि दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे’, असे मत व्यक्त केल्याने, कोण किती पाण्यात आहे, हे स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये पैसे घेऊन आपल्या संघाच्या पराभवास कारणीभूत झालेल्या तीन खेळाडूंना अटक केल्यानंतर, त्यांनी रडत रडत आपला गुन्हा कबूल केल्याचे सांगतानाच आणखी काही खेळाडूही पैशाच्या लालसेने असे उद्योग करत असल्याची माहितीही पुढे येऊ लागली आहे. सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना हवा असतो आनंद आणि खेळाडूंना हवे असतात पैसे. कसोटी सामन्यांमध्ये दिवसच्या दिवस खेळपट्टीवर खेळणाऱ्या खेळाडूंना जो आनंद मिळत असे, त्याची प्रत वेगळी होती. एक दिवसाच्या सामन्यात पन्नास षटकांमध्ये आपल्या अंगची सारी कौशल्ये पणाला लावण्याचे कसब उपयोगाला येऊ लागले. काळाबरोबर दिवसभरही खेळ पाहणे शक्य नसलेल्या प्रेक्षकांना तीन तासांच्या या चित्रपटसदृश करमणुकीची गोळी मात्र चांगलीच मानवली. कारण त्यांना खेळापेक्षाही त्यातल्या उन्मादी वातावरणाचा आनंद हवाहवासा वाटू लागला. तीन तासांच्या या करमणुकीत कोणजिंकतो आणि कोण हरतो, यापेक्षा स्टेडियमवरच्या अतिउत्साही वातावरणाचाच वाटा या आनंदात अधिक असतो. घरात बसून तीन तासांचा हा झटपट आनंद खेळ पाहिल्याचा असतो, की त्यातील प्रेक्षणीयतेचा असतो, याचा विचार करण्याएवढाही वेळ आज कुणाकडे नाही. कसोटी सामन्यातल्या खेळातील अभिजातता म्हणजे शास्त्रीय संगीतातील बडा ख्यालच. प्रत्येक कृती कशी मजा घेत केलेली. खेळाडू आणि प्रेक्षक अशा दोघांनाही भव्यतेची अनुभूती देणारा हा बडा ख्याल काळाच्या पडद्याआड जाताना कुणाला हळहळही वाटली नाही.

खेळ आणि पैसा हे समीकरण रूढ होईपर्यंत त्यातला आनंद काही और होता. सारे जग बाजारीकरणाच्या जाळ्यात ओढले जाऊ लागले, तेव्हा जगण्याचे नीतीनियमही बदलले. पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टींनी गेल्या दोन दशकांमध्ये जो धुमाकूळ घातला, तोच क्रिकेटमध्येही उरतला. आयपीएल हे त्याचे अगदी ढळढळीत उदाहरण. आयपीएलमुळे खेळाचा धंदा झाला. त्याचे रीतिरिवाज बदलले. त्याचा परिणाम खेळातले खेळपण हरवण्यात झाला. या नव्या खेळव्यवस्थेमुळे खेळाचीही विस्तारित बाजारपेठ तयार झाली. त्यातून रोजगार निर्मितीचे गाजर दिसू लागले. स्टेडियममध्ये शेंगदाणे किंवा थंड पेये विकणारे सामान्यजन या रोजगाराच्या यादीत पुसटसेही दिसणार नाहीत, इतका आयपीएलच्या आर्थिक उलाढालीचा पसारा मोठा झाला. नाही म्हणायला रोजगार मिळतच असेल, तर तो बुकींना आणि त्यांच्या माध्यमातून खेळाडूंना. खरेतर या खेळाचा नियम असा की, लिलावात विकत घेतलेल्या खेळाडूंनी आपल्या मालकांसाठी खेळायचे. जिंकलो, तर नफा मालकांचा आणि हरलो, तरी आपल्याला मिळणाऱ्या पैशात कपात होण्याची सुतराम शक्यता नाही! याच भावनेने क्रिकेटपटू व्हायची स्वप्ने पुरी करण्याची धडपड करणारी ही सारी युवक मंडळी आयपीएलच्या करमणुकीच्या मैदानात उतरली. गद्दारी केल्याबद्दल एखाद्या मालकाने आपल्या कामगाराला काढून टाकावे, तसे आयपीएलमधील संघाच्या मालकांना करता आले असते. पण गेल्या काही वर्षांत आयपीएलच्या निमित्ताने क्रिकेट जगतात निर्माण झालेला अतिप्रचंड उन्माद पाहता, हे खेळाडू केवळ त्या मालकांचे नोकर राहात नाहीत. त्यांना त्याहीपलीकडचे स्थान मिळू लागते. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या बलात्कारांच्या घटना रोखण्यासाठी आपली सारी शक्ती पणाला लावण्याऐवजी कोण खेळाडू कुणाच्या संपर्कात आहे, कोणाला कशासाठी किती पैसे मिळत आहेत, याचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांना आपली सगळी यंत्रणा कामाला लावावीशी वाटली. खेळाडूंच्या मोबाइलवरील प्रत्येक कृती तपासता तपासता भारतात हरतऱ्हेने अस्थिरता पसरवण्यासाठी माहीर असलेल्या दाऊदचाही माग पोलिसांना काढता आला. आयपीएलमध्ये होणारी ढवळाढवळ थांबवणे सहजशक्य नाही, हे गेल्या चार वर्षांत स्पष्ट झालेच होते. खेळावर पैसे लावण्याचा ‘खेळ’ क्रिकेटमुळे फोफावला. इतका की त्याची एक समांतर व्यवस्था निर्माण झाली. किमान पाच ते पंचवीस हजार कोटी रुपयांच्या या समांतर व्यवस्थेवर लक्ष ठेवणे सामने आयोजित करणाऱ्यांच्या हाताबाहेरचे काम झाले. दिवसाढवळ्या ‘टेलिफोन एक्स्चेंज’ उघडून आपला हा खेळबाह्य़ व्यवसाय तेजीत आणणाऱ्या बुकींचे एक  जाळेच तयार झाले. सट्टाबाजाराला अकल्पिताचे वावडे नसते. तोच त्या व्यवसायाचा पाया असतो. म्हणून कल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रलोभनांचे जाळे पसरले जाते. ललनांपासून ते पैशांपर्यंतच्या साऱ्या गोष्टींची सोय केली जाते. स्खलनशील मानवी स्वभाव अशा नाजूक गोष्टींना शरण न जाता तरच नवल.

संस्कृती माणसाला काय योग्य आणि काय चूक याचे भान देते. ते आयुष्यभर जागृत ठेवून जगण्याची शिकवण देते. त्याविरुद्ध जगणाऱ्या प्रवृत्तीही याच संस्कृतीत कार्यरत असतात. आयपीएलमधील फिक्सिंगमुळे या प्रवृत्ती किती बलवान ठरत आहेत, हेच समजून आले. क्रिकेट नियामक मंडळाने खेळातील दुष्प्रवृत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या यंत्रणा किती तोकडय़ा आहेत, हेही स्पष्ट झाले. पाशवी आर्थिक ताकद असलेल्या या संघटनेला बुकींवर लक्ष ठेवणे शक्य नाही, कारण त्यासाठी आवश्यक असणारे पोलिसांचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. ज्या पोलिसांनी बुकींचे हे जाळे शोधून काढले, त्यांना त्यांचा ठावठिकाणा माहीतच नव्हता, असे म्हणणेही धाष्टर्य़ाचे आहे. याचा अर्थ सरळ आहे. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाचा आपल्या फायद्यासाठी वापर करणाऱ्यांचे कुणी काही वाकडे करू शकत नाही. तेव्हा बीसीसीआयच्या कार्यकारिणीला आणि  अध्यक्ष श्रीनिवासन यांना पत्रकार परिषदेत बुडती पत सावरण्याशिवाय काहीच करता येण्याजोगे नव्हते. झालेही तसेच. अटक झालेल्या खेळाडूंना गुन्हेगार म्हणायचे नाही आणि त्यांची स्वतंत्र, झटपट चौकशी मात्र बीसीसीआयच्याच रवी सवानी यांच्यामार्फत करायची अशी तारेवरची कसरत रविवारी झाली. जोवर अशा अपप्रवृत्तींना गुन्हा ठरवले जात नाही आणि त्यासाठी कठोर शिक्षा दिली जात नाही, तोवर त्या पुन्हा पुन्हा डोके वर काढत राहणार. यापूर्वीच्या काळात जे जे खेळाडू फिक्सिंगमध्ये दोषी ठरले, ते आज उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना झालेल्या शिक्षा इतक्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या, की असला गुन्हा करण्याचे धाडस करण्यास काहीच हरकत नाही, अशी भावना व्हावी. तेव्हाच जर जबर शिक्षा झाल्या असत्या, तर ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या म्हणीचा प्रत्यय आला असता. गुन्हेगारांना शिक्षेची भीती दाखवून परावृत्त करण्याशिवाय पर्याय नसतो. क्रिकेटसारख्या खेळातील अल्पायुषी जीवनात जेवढे म्हणून ओरबाडून घेता येईल, तेवढे घेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची भीती नाहीशी होते, कारण त्यासाठी असलेली शिक्षा भोगण्याने फारसे काही बिघडणारे नसते. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांव्यतिरिक्त आणखी अनेक खेळाडू फिक्सिंगच्या जाळ्यात सापडतील, असे पोलिसांना वाटते आहे. फक्त भारतीयच नव्हे, तर परदेशी खेळाडूंवरही पोलिसांचा संशय आहे. ‘पोलिसिंग’ करून खेळाडूंच्या प्रत्येक चेंडूवर नजर ठेवण्याची यंत्रणा उभी करणे हे जसे व्यवहार्य नाही, तसेच आयपीएलचे खेळच रद्द करणे हाही पर्याय नाही. सदसद्विवेकबुद्धी जागी ठेवून खेळणारे खेळाडू आजही कमी नाहीत. पण अशा चारदोघांमुळे या खेळाकडेच संशयाने पाहिले जाणार असेल, तर क्षणिक लाभासाठी आपली सारी कारकीर्द पणाला लावण्यापूर्वी हजारदा विचार करावा, अशी शिक्षा गुन्ह्य़ात सापडलेल्या खेळाडूंना मिळायला हवी. तरच या तेजीतल्या धंद्याचे स्वरूप पालटू शकेल.

Story img Loader