कलाग्राम, वॉटर बँक, माती बँकसारखे प्रकल्प, चारा छावणी, इकोग्राम, गुरुकुलच्या योजना आणि त्याआधारे साकारलेले कृ षी, ग्रामीण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, वन्य जीव आणि साहसी खेळाचे पर्यटन अशा विविध अंगांनी ग्रामीण भागाच्या पर्यायी विकासनीतीची हिरवळ फुलवली आहे सोलापूर जिल्ह्य़ातील ‘विज्ञानग्राम’ या संस्थेने!
सोलापूर जिल्हा उच्चारताच खरेतर डोळ्य़ांपुढे केवळ दुष्काळ उभा राहतो. या जिल्ह्य़ातील मोहोळ तालुक्यातील अंकोली हे गावही तसेच रूक्ष, दुष्काळाच्या छायेत करपलेले. दरवर्षी उन्हाळा जवळ येऊ लागला, की या गावातही पाण्याचे टँकर धावू लागायचे आणि निर्वासितांचे लोंढे बाहेर पडायचे. जेथे माणसांची ही अवस्था तेथे जनावरांची व्यथा तर न विचारलेलीच बरी. अशा या नकारात्मक अवस्थेत कधी १९८६ साली अरुण आणि सुमंगला देशपांडे या दाम्पत्याने या रखरखत्या प्रदेशी एका विलक्षण चिकाटीने, जिद्दीने पाय रोवले आणि निसर्ग-पर्यावरणपूरक विकासाचे स्वप्न सत्यात आणले – विज्ञानग्राम! कृषी पदवीधारक असलेले अरुण विज्ञानछांदिष्ट, तर त्यांची पत्नी सुमंगला सामाजिक कार्याची आवड असलेल्या. लग्न झाल्यानंतर एकत्रितरीत्या काहीतरी ठोस कार्य करायचे या हेतूने त्यांनी थेट मूळ गाव अंकोलीची वाट धरली. पंचवीस वर्षे उलटली. ‘विज्ञानग्राम’च्या या वृक्षाला इकोग्राम, कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, आरोग्य पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान पर्यटन, वन्य जीव आणि साहसी खेळाचे पर्यटन आदी फळे लागली आहेत. या वर्षीच्या पर्यावरणदिनाच्या कार्यक्रमात ५ जून २०१२ रोजी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने या संपूर्ण परिसराला एका पर्यटनस्थळाची मान्यता व प्रतिष्ठा दिली आहे.
लवकरच इथे कलाग्राम, गुरुकुल प्रकल्प उभे राहणार आहेत. आज संस्थेकडे २० एकरची गर्द वनशेती आहे. या आवारातील विविध स्रोतांमध्ये तब्बल आठ लाख लिटर पाणी साठवलेले आहे. इथला हा चारा आणि पाण्याच्या जीवावर दुष्काळात हमखास कत्तलखान्याकडे जाणारी हजारो जनावरे आज ‘विज्ञानग्राम’च्या या भूमीत सुखेनैव नांदत आहेत. इच्छुकांनी प्राणिमित्र विलास शिवलाल सवरेदय ट्रस्ट या नावाने धनादेश काढावेत.

Story img Loader