युनायटेड स्पिरीट्स या दारू उत्पादक कंपनीसारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी मरणासन्न किंगफिशर एअरलाइन्सच्या पुढय़ात टाकून जाता जाता ताव मारण्याचा डॉ. विजय मल्ल्या यांचा प्रयत्न पुरता फसला आहे. नाममात्र, ४ टक्क्यांपेक्षाही कमी हिस्सा असतानाही युनायटेड स्पिरीट्स विकल्यानंतरही बाजूला न होणाऱ्या मल्ल्या यांच्यावर थेट गैरव्यवहाराचा ठपका नव्या दिआज्जिओ व्यवस्थापनाने ठेवला आहे. मल्ल्या यांनी युनायटेड स्पिरीट्समधील पैसा केवळ अन्यत्रच वळविला नाही, तर दिआज्जिओबरोबरच्या हिस्सा खरेदी-विक्री प्रक्रियेतही गैरव्यवहार केला, असे दिआज्जिओचे म्हणणे आहे. हे दूषण दिआज्जिओने शनिवारी जाहीरपणे दिले. किंगफिशर एअरलाइन्स जेव्हापासून आर्थिक मंदीच्या ‘हँगर’मध्ये अडकले तेव्हापासूनच युनायटेड स्पिरीट्समधील भागभांडवली दिआज्जिओला देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. असे करत गेल्या अडीच वर्षांत दिआज्जिओची युनायटेड स्पिरीटवरील मालकी निम्म्यापेक्षाही अधिक, ५४ टक्क्यांची झाली. युनायटेड स्पिरीट्स ही दिआज्जिओकडे देताना मल्ल्या यांनी आपले विश्वासू व मुख्य वित्तीय अधिकारी पी. ए. मुरली यांची नव्या व्यवस्थापनावर नियुक्ती करण्याची शिफारस केली. ती या ब्रिटनस्थित कंपनीने मान्यही केली. मात्र गेल्याच आठवडय़ात मुरली यांनी राजीनाम्याचा सूर आळवल्यानंतर लगोलग युनायटेड स्पिरीट्समधील गैरव्यवहार दिआज्जिओने बाहेर काढावा, हाही योगायोगच म्हणायला हवा. युनायटेड स्पिरीट्स तशी दिआज्जिओच्या भारत प्रवेशापासूनच चर्चेत होती. बरे, युरोपातील आघाडीची दिआज्जिओ ही कंपनीही काही धुतल्या तांदळासारखी आहे, असे नाही. भारतासह अन्य दोन आशियाई देशांमधील व्यवहारासाठी लाच दिल्याच्या एका प्रकरणात दिआज्जिओने अमेरिकी भांडवली बाजार नियामकाबरोबर १.६ कोटी डॉलरमध्ये मांडवली केली आहे. हा किस्सा युनायटेड स्पिरीट्सद्वारे भारतात येण्यापूर्वीचा. २०१३ च्या मध्याला किंगफिशर जमिनीवर यावी आणि युनायटेड स्पिरीट्सकडे दिआज्जिओने कूच करावे, या दोन्ही घटना एकाच वेळी झाल्या. डबघाईला आले तरीही पारंपरिक ‘कॅलेंडर निर्मिती’ व्यवसायाबरोबरच आयपीएल, फॉम्र्युला वनसारख्या नव्या दमाच्या क्षेत्रातही अग्रणी राहण्याचा मल्ल्या यांचा हट्ट कायम होता. विलीनीकरण झालेल्या एअर डेक्कनचे ओझे सहन होत नसतानाही किंगफिशर एअरलाइन्सला धोक्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला. किंगफिशरने जमिनीवर हेलकावे घेताना देशातील १७ हून अधिक बँकांचे ७००० कोटी रुपयेही थकविले. जिथे सर्वसामान्यांचे हप्ते थकले तर वृत्तपत्रातून त्यांची सचित्र बदनामी होते; तिथे मल्ल्या यांना वाचविण्याचा राजकीय प्रयत्न कायम आहे. त्यामुळेच आता दिआज्जिओशी मल्ल्या यांचा झालेला वाद ‘सेबी’कडे जाणार, हे बरेच म्हणायला हवे. सहाराश्रींच्या प्रकरणात सेबीने दाखविलेल्या कठोरतेनंतर मल्ल्या यांच्याबाबत तेच व्हावे, अशी सुप्त इच्छा कोटय़वधी भागधारकांच्या मनी असल्यास नवल नाही. म्हैसूरच्या या सुलतानी व्यक्तिमत्त्वाची गुर्मी अजून संपलेली नाही. नव्या चौकशीच्या ससेमिऱ्यानंतरही ‘(नव्या) संचालकांना माझे भवितव्य ठरवण्याचा अधिकार नाही; कंपनीचे भागधारकच काय तो निर्णय घेतील’, ही भूमिका ते टिकवून आहेत. त्यामुळे सेबीकडे प्रकरण गेले, तर अन्य गोष्टींबरोबरच ‘पीडब्ल्यूसी’ (प्राइसवाटरहाऊसकूपर्स) या लेखापरीक्षण कंपनीचे मल्ल्या यांच्याशी गूळपीठ होते का, याचाही सोक्षमोक्ष लागेल. ९००० कोटी रुपयांच्या सत्यम घोटाळ्यातील राजू बंधूंना सक्तमजुरी जाहीर होण्याच्या महिन्यातच ‘पीडब्ल्यूसी’चे लेखापरीक्षण हा समान धागा असलेल्या युनायटेड स्पिरीटची वाटचाल त्याच दिशेने होते का, हे पाहावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा