निर्माते सुधीर भट यांना जाऊन पंधरवडा लोटत नाही तोच ‘गणरंग’ नाटय़संस्थेचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते विनय आपटे यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमीवरील तालेवार निर्मात्यांची एक फळीच्या फळीच अचानक अस्तंगत झाली आहे. प्रभाकर पणशीकर, मोहन तोंडवळकर, मोहन वाघ, सुधीर भट, विनय आपटे या निर्मात्यांनी प्रदीर्घ काळ व्यावसायिक रंगभूमीचे नेतृत्व केले. चांगल्या नाटकांचा ध्यास हा या सर्वातील समान दुवा होता.  विनय आपटे केवळ निर्मातेच नव्हते, तर एक उत्तम दिग्दर्शक आणि कसलेले अभिनेतेही होते. ‘अँटिगनी’, ‘मित्राची गोष्ट’, ‘रानभूल’, ‘अभिनेत्री’, ‘डॅडी, आय लव्ह यू’, ‘घनदाट’, ‘कुसुम मनोहर लेले’, ‘अफलातून’, ‘शुभ बोले तो नारायण’, या नाटकांतून त्यांच्या अभिनयाचे किंवा दिग्दर्शनाचे वैविध्य (नावांतूनही) कळून येते. भारदस्त आवाज, मस्तवाल व्यक्तिमत्त्व आणि कलेशी अव्यभिचारी बांधीलकी यामुळे त्यांनी दूरचित्रवाणी, रंगभूमी, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्र अशी चतुरस्र मुशाफिरी लीलया केली. रोखठोक मतप्रदर्शन हा त्यांचा आणखी एक गुणविशेष. त्यांनी केवळ स्वत:चेच करिअर घडवले असे नाही, तर आजच्या आघाडीच्या अनेक कलावंतांना घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘आपटे स्कूल’चे हे विद्यार्थी आपण विनय आपटेंचे विद्यार्थी आहोत असे अभिमानाने सांगतात ते त्यामुळेच! जाज्ज्वल्य देशभक्ती आणि हिंदुत्ववादी विचारांवरील निष्ठा ही त्यांची आणखी एक ओळख! याच विचारांतून त्यांनी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी जंगजंग  पछाडले. त्याकरता अथक लढाही  दिला. याच भावनेतून त्यांनी शिवाजी महाराजांचे देशकार्य राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावे म्हणून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर महाराजांवरील भव्यदिव्य मालिका हिंदीत काढण्याचा घाट घातला. तेव्हा दिल्लीत सत्तेत असलेल्या भाजप सरकारकडून त्यासाठी अर्थसाह्य मिळवून देण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी आपटेंच्या तोंडाला पाने पुसली. तशात या मालिकेच्या प्रक्षेपणात खंड पडला. तिच्या पुनप्रक्षेपणासाठीही त्यांना मग खूप झगडावे लागले. परिणामी कर्जाच्या ओझ्याखाली विनय आपटे आकंठ बुडाले. त्यांची नाटय़संस्थाही बंद पडली. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना आपली सगळी ऊर्जा खर्च करावी लागली. अखेर ते त्यातून बाहेर पडले, पण तोवर मानसिक क्लेश, आर्थिक चणचण, त्यावर मात करण्यासाठी मिळेल ती कामे करत, आपली सर्जनशीलता दडपत त्यांना बराच काळ संघर्ष करावा लागला. याचे परिणाम त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यावर न होते तरच नवल.  दुसरीकडे अ.भा. मराठी नाटय़ परिषदेची धुराही त्यांनी दोन वर्षे सांभाळली. व्यावसायिकांची मक्तेदारी असलेल्या या संस्थेत प्रायोगिक आणि समांतर तसेच हौशी रंगभूमीला सामावून घेण्याचे; त्यांना केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. त्यामुळे काही  व्यावसायिक रंगकर्मीच्या रोषाचेही ते धनी झाले. नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत हिरीरीने उतरून आपल्या या कार्याचा कौल त्यांनी मागितला होता. परंतु त्यांच्या विरोधकांनी येनकेनप्रकारे त्यांना चितपट केले. ही हार त्यांच्या वर्मी बसली. उमेद खचावी, अशा वातावरणातही त्यांचा संघर्ष जारी होता. पण थकलेले मन आणि व्याधीग्रस्त शरीर त्यांच्या या संघर्षांत त्यांना साथ द्यायला कमी पडले. आणि एक उमदा कलावंत, सच्चा रंगकर्मी आणि एक बेडर नेतृत्त्व समस्त रसिकांना अकाली चटका लावून अंतर्धान पावले.

Story img Loader