मराठी साहित्यसृष्टी एरव्ही भरभरून मोहरत असली, तरी ऐन वसंतातील संमेलनस्वप्नाच्या चाहुलीने तिला येणारा बहर मात्र, एखाद्या परप्रकाशी ताऱ्यासारखा मिणमिणता का असावा हे एक कोडेच आहे. जागतिक स्तरावर, थेट सातासमुद्रापारही, संमेलनांच्या निमित्ताने मराठी सारस्वताच्या ध्वजा फडकावतानाही अनुदानाच्या कुबडय़ा खांद्याखाली नसतील, तर ही बहरती साहित्यसृष्टी कशी विकलांगासारखी भासू लागते, हे याआधीही दिसून आले आहे. जंगलात ऊनवाऱ्याचा मारा सोसत बेफामपणे फोफावणारे एखादे रोपटे, शहरी घराच्या कुंडीत आल्यावर मात्र, कणभर पाण्याअभावी मलूल होऊन पडते. मराठी साहित्यसृष्टीची अवस्था कदाचित, कुंडीत वाढणाऱ्या अशा रोपटय़ासारखी झाली असावी. कुणी पाणी घातले, तरच मूळ धरावे आणि खत घातले तरच फुलावे हा कुंडीत वाढणाऱ्या परावलंबी सृष्टीचा गुणधर्म! संमेलनाच्या चाहुलीने मोहरू पाहणारी मराठी साहित्यसृष्टी आता मदतीच्या तहानेने व्याकूळ झाली आहे. राज्य सरकारचे पंचवीस लाख, पंजाब सरकारचा पाहुणचार आणि निमित्तमात्रे हाती पडणाऱ्या अनुदाने, देणग्यांच्या खतपाण्यावर का होईना, पंजाबाच्या घुमानमध्ये मराठी साहित्यसृष्टीचा बहर घमघमणार अशी चिन्हे दिसू लागलेली असतानाच, एकाएकी ‘फुकटेपणा’च्या नावाने सुरू झालेल्या गजराने ही सृष्टी पुन्हा कोमेजल्यागत झाली आहे. आधीच, जेमतेम बहरण्यापुरत्या खतपाण्याच्या शिदोरीवर भरभरून मोहरू पाहणाऱ्या या साहित्यसृष्टीला संमेलनाच्या सोहळ्याचे सरकारी चित्रवाणीवरून थेट प्रसारण करण्यासाठी पैसे मोजावे लागणार हे समजताच, उमलू उमलू पाहणारे उत्साहाचे धुमारे कोमेजू लागले आणि त्यातच, सरकारनेही फटकारले. ज्यांनी आधार द्यायचा, त्यांनीच खांद्याखालच्या कुबडय़ा काढण्याचे इशारे देण्यास सुरुवात केली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मराठी सारस्वताच्या परावलंबीपणावर ताशेरे ओढत त्यांच्या फुकटेगिरीवर बोट ठेवताच कोमेजू पाहणाऱ्या या सृष्टीवर काँग्रेसी सारस्वतप्रेमींनी राजकीय आपुलकीच्या सांत्वनाचा शिडकावा केला आणि चमत्कार झाला. कोणतेही कार्य स्वबळावर सिद्धीस न्यावयाचे असेल, तर त्यासाठी स्वत:ची तशी जोपासना करावी लागते. नाही तर, आधारासाठी हात पसरावेच लागतात, हे राजकारणातही घडते. साहित्यसृष्टीच्या काँग्रेसी सांत्वनापाठोपाठ लगेचच हीच जाणीव जागी झाल्याने तावडे यांनी पुन्हा सरकारी वाहिनीवरील प्रक्षेपणाकरिता साहित्यसृष्टीला मदतीचा हात देऊ केला आहे. मराठी साहित्यसृष्टी तर अजूनही आधारानेच उभी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. फुकटेगिरी म्हणून ज्याला हिणविले जाते, ती प्रत्यक्षात या साहित्यसृष्टीची आधाराची अपेक्षा आहे. मूळ प्रश्न असा आहे की, अशा अपेक्षेपलीकडे जाऊन स्वबळावर बहरण्याची उभारी या साहित्यसृष्टीला कधी येणार?.. फुकटेगिरीच्या मुद्दय़ावरून विनोद तावडे यांनी मारलेल्या फटकाऱ्याचे वण उठण्याआधीच तावडे यांनीच त्यावर मलमपट्टी करून हळुवार फुंकरही घातली आहे. कोमेजू पाहणारी मराठी साहित्यसृष्टी आता कदाचित केवळ या आधाराच्या जाणिवेनेच पुन्हा उभारी धरेल आणि घुमानमध्ये बहरून, मोहरून जाईल. तरीही, आता कुंडीपुरते जगणे आणि मिळेल त्या पाण्यात तहान भागविणे थांबवून मोहरण्याची वेळ आली आहे, याचा धडा ऐन वसंतात साहित्यसृष्टीला मिळाला हे बरेच झाले. साहित्य संमेलने आखणे आणि पार पाडणे हा काही विनोद नाही. त्याकडे गांभीर्यानेच पाहिले पाहिजे.

Story img Loader