राजीव साने
ऐहिक जीवनात धर्मसंस्थेने निवाडे देऊ नयेत. तिचा हस्तक्षेप हटवला पाहिजे; पण याचा अर्थ असा नव्हे की कोणीच ‘भाविक’ असता कामा नये!
हिंदू या नावाने भारतात जो संप्रदाय-समुच्चय नांदत आहे, तो इहवादाला कमी घातक का ठरतो, हे प्रथम पाहू. राजकीय हिंदुत्ववादामुळे जे धोके संभवतात ते हिंदुत्ववाद्यांतील व हिंदुत्वविरोधकांतील बदलत्या वैशिष्टय़ांमुळे सौम्य कसे ठरत गेले, ते उत्तरार्धात पाहू.
इहवाद कधी ‘बाटत’ नसतो! पण इहवाद म्हणजे जडवादच असे नकळत गृहीत धरले जाते. जडवाद मानला की धर्मउच्छेद हे उद्दिष्ट बनते, पण जडवादात जी अंगभूत मूल्य-उदासीनता आहे, ती लवकर लक्षात येत नाही. विशेषत: समता हे तत्त्व जडवादानुसार अजिबातच टिकत नाही. सोशल-डार्वििनझममध्ये काय चूक आहे? या प्रश्नाला जडवादात उत्तर नसते. आपण समतावादीही आहोत आणि जडवादीही आहोत, यात काही तरी विसंगती आहे, असे कित्येकांच्या ध्यानातच आलेले नसते; किंबहुना समतावादी असण्यासाठी जडवादी असणे आवश्यकच आहे, असेही अनेकांना वाटत असते. याला एक तार्किक कारणही आहे. कर्मविपाक (भाग्य हे शिक्षा/ बक्षीसच असते) आणि स्वर्ग/नरक याद्वारे मिळणारी ‘भरपाई’ या गोष्टी मानल्या की मानवनिर्मित न्यायाला महत्त्व उरत नाही, हा जडवाद्यांना वाटणारा धोका खराच आहे. जडवाद न मानण्यामुळे मानवनिर्मित न्याय दुर्लक्षित होतो, हे जरी खरे असले तरी जडवाद मानण्याने आपोआपच मानवनिर्मित न्यायकल्पना सापडेल, हा व्यत्यास चुकीचा आहे. पारलौकिक मानल्याने न्याय ‘आपोआप’ झाल्यासारखा वाटतो हेही खरेच! परंतु जडजगताच्या गतिनियमात न्याय हा प्रश्नच उद्भवत नाही याचे काय? नैतिक भूमिका तर घ्यावीच लागते. मग मात्र समतावादी अचानक, आपण जाणीववान आणि जडापासून स्वतंत्र असल्याचे (जे खरेच आहे) लक्षात घेऊन (आणि समता तर मानायचीच हे गृहीत धरून) नैतिक भूमिका घेतात.
जोपर्यंत इहलोक म्हणजे मानवी-भावविश्व (त्याचा द्रव्यमय आधार भले ‘जड’ का असेना!) हे मान्य होत नाही आणि इहवाद म्हणजे याच जन्माचा सत्कृत्य/दुष्कृत्य हिशेब, हे स्पष्ट होत नाही; तोवर हा जड-घोटाळा सुटणार नाही. भावविश्व मानण्याचा दुसरा फायदा असा की बिगर-भाविकांना, भाविकांकडे बघताना, त्यांच्या उपासनेला ‘त्यांचा मान्यताधारित मानसोपचार’ म्हणून समजून तरी घेता येते. बिगर-भाविक आणि भाविक यांच्यात संघर्ष उभा न राहता, मांडणी भाविकांच्या संज्ञांमध्ये पण मूल्ये प्रागतिक, अशी जुळणी शक्य होते. धर्मसंस्थेला निवाडय़ांतून बाहेर ठेवणे, पण त्याच वेळी भाविकांना ‘अभ्युदया’साठी उद्युक्त करणे शक्य होते. धर्मसंस्थेला विरोध म्हणजे भाविकांचा द्वेष नव्हे हे तत्त्व सर्वच धर्माना लागू असले, तरी इस्लामबाबत ते विशेष अगत्याचे आहे. कारण धर्मसंस्थेने भाविकांना गुलाम करणे हे इस्लाममध्ये तीव्र आहे.
‘हिंदू-लिबरल’पणाचे फायदे
‘साधना करण्याचे बहुविध प्रकार आणि उपास्य कोणते याला नियम नाही’ अशी हिंदू धर्माची व्याख्या लोकमान्य टिळकांनीही केलेली आहे. श्रमण/ वैदिक/ भक्ती या तीनही परंपरांचा मिलाफ प्रत्यक्षात आणि दर्शनांतही करणे हे हिंदू-वैशिष्टय़ राहिलेले आहे. टोळी-देवता, ग्राम-देवता यांना सामावून कसे घेता येईल असेच हिंदूंचे धोरण नेहमी राहिलेले आहे. तुर्यावस्थावाद (युडेमोनिझम) व स्वीकारवाद (स्टोइक) ही खास वैशिष्टय़! आन्हिकांना महत्त्व (रिच्युअलिझम)! पण देशकालमानाने मॉडिफिकेशन्स करण्याची मोठी परंपरा आहे. काहीही प्रमाद घडला तरी त्यावर ‘उपाय आहे’ असाच निर्वाळा पुरोहित देत आलेले आहेत. सौम्य स्वरूपाची प्रायश्चित्ते ही गोष्ट एका बाजूने दंभाला वाव देणारी असली तरी ‘धसका’ कमी करणारी आहेत. आधुनिक अर्थाने स्वातंत्र्य जरी मानलेले नसले तरी लवचीक मुभा (लॅटिटय़ूड) राखण्याची काळजी घेतली गेलेली आहे.
ज्यांना एकच जन्म असतो आणि ज्यांचा एक तर उद्धार (स्वर्ग) तरी होईल किंवा नष्टचर्य (नरक) तरी येईल, असे असते, त्यांना ‘मरणोत्तर चिंता’ फारच तीव्र असते. कर्मविपाक आणि प्रचंड संख्येने जन्म मिळणे याचा एक फायदा असा असतो की, नेहमी थोडा थोडा वाव राहतो. एटीकेटी मिळत असल्याने हिंदू अटीतटीवर येत नाही.
मुख्य सिद्धांत असाच आहे की, प्रत्येक जीवाची बहुजन्म-कहाणी खास करून त्याचीच असते. हे लायबनित्झच्या मोनॅड्ससारखे व्यक्तिकेंद्री आहे. इतरांना उद्धाराकडे खेचून नेणे हे माणसालाच काय, पण खुद्द ईश्वरालाही शक्य नसते. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु:। नादत्ते कस्यचित्पापं न चव सुकृतं विभु:। (गीता ५.१४-१५). यामुळे निष्ठिहिनांना निष्ठावान बनवणे किंवा नष्ट करणे, हे ग्रांथिक-धर्म-कर्तव्य (विशेषत: इस्लामिक) हिंदू माणसाला नसतेच. स्वत:साठी मोक्षसाधना महत्त्वाची असते. मोक्षकेंद्रीपणामुळे इतर पुरुषार्थाकडे दुर्लक्ष होते हा दोषच! पण मोक्षवादामुळेच पारमार्थिक सत्-ता वेगळी आणि व्यावहारिक सत्-ता वेगळी ठरते. यात आत्मिक साधनेचे इहलौकिक बाबींपासून डी-कपिलग (जोड तुटणे) होते. इहलोकात काय घडते आहे याविषयी उदासीनता वाईटच; पण संबंध न उरणे हे चांगलेही आहे. कारण त्यामुळे कायदे पुरवणे हे कार्य करण्यात हिंदू परंपरा अभिनिवेशी राहत नाही.
त्या त्या काळातील समाजव्यवस्थांचे समर्थन करणे हे धर्मसंस्थांचे कार्य असतेच. भारतीय ग्राम-जातिव्यवस्थेला ‘वर्ण’ कल्पनेतून समर्थन मिळते, जे की त्याज्यच आहे. आधुनिकतेला कलियुग म्हणणे वाईटच! पण निदान त्रेता/द्वापार नाही आणि त्यामुळे तत्कालीन पुराणे आता लागू नाहीत, हे म्हणायला अडचण राहात नाही. यज्ञ ही गोष्ट आता अप्रस्तुत ठरली आहे. वेदातील कर्म-कांड म्हणजे यज्ञ कसे करावेत व निसर्ग-दैवतांना कसे वश करावे, याच्या मेथड्स वेदांतच राहून गेल्या आहेत. उपनिषदे आणि त्यातील काव्यात्म तत्त्वज्ञान यांचा प्रभाव नक्कीच आहे; पण त्यात अनेक अर्थ लावले जाऊन कोणतेच मत (डॉक्ट्रिन) निर्णायक राहिलेले नाही. संतवाङ्मयाद्वारे उपनिषदांचे लिबरलाइझ्ड सारच सर्वत्र पसरले आहे. यामुळेच ‘सनातनी’ (ऑर्थोडॉक्स) आणि भाविक (प्रॅक्टिसिंग) यांच्यातील संबंध विरलेला आहे. भाविक हिंदू हा सनातनी ‘उलेमांचा बंदा’ असत नाही.
राजकीय हिंदुत्वाचे सौम्यीकरण
स्वातंत्र्यपूर्वकाळात जो इस्लामिक-अर्ध-राष्ट्रवाद (एकाच राष्ट्रात अध्रेराज्य) उभा राहिला त्याला विरोध करण्यासाठी, मुळात भारतात राजकीय हिंदुत्व हे प्रकरण निर्माण झाले. फाळणीची प्रक्रिया जरी हिंसात्मक व दु:खद झाली असली, तरी फाळणीमुळे इस्लामिक-अर्ध-राष्ट्रवादाचा कायमस्वरूपी पराभव झाला. भारताला इहवादी राज्यघटना मिळाली. पूर्वी झालेल्या आक्रमणांच्या इतिहासामुळे, हिंदूंमध्ये स्वत:च्या दौर्बल्याविषयी स्वत:चाच जळफळाट, हा एक दुर्गुण शिरून बसला. हा दुर्गुण काढून टाकून, आता जे सामर्थ्य हवे आहे ते हिंसेचे नसून विकासाचे आहे, याकडे हिंदूंना वळवणे ही महत्त्वाची गरज आहे.
आधुनिकता टाकून धर्मजीवनाकडे परत चला, ही दिशा हिंदुत्ववाद्यांत गोळवलकर गुरुजींच्या रूपांत व हिंदुत्व-विरोधकांत महात्मा गांधीजींच्या रूपात सामाईक होती. परंतु मुस्लीम प्रश्नाच्या संदर्भामुळे हे साम्य झाकले गेले. इहवादी आणि आधुनिकतावादी राष्ट्रनिर्मिती करायची आहे, ही दिशा सावरकर आणि आंबेडकर यांच्यात सामाईक होती; परंतु सावरकरांचे जातिनिर्मूलन दुर्लक्षित राहिल्याने व आंबेडकरांचे फक्त जातिनिर्मूलनच लक्षात राहिल्याने, हेही साम्य झाकले गेले. ख्रिश्चन मिशनऱ्यांशी स्पर्धा म्हणून का होईना, पण विवेकानंदांच्या प्रभावाने हिंदुत्ववाद्यांनी विधायक कार्यात भरीव कामगिरी केली आहे, ही गोष्टही राजकीय चच्रेत न आल्याने लक्षात राहिली नाही. काँग्रेस व पुरोगामी एनजीओजनी त्या कार्याकडे द्वेषभावनेनेच पाहिले. कारण हिंदुत्ववादात मनुवाद दडलेला असणारच आणि ब्राह्मण हा वर्गशत्रू आहे, या दोन गैरसमजुती काँग्रेस व पुरोगामी घट्ट धरून राहिले. शहा, कुरुंदकर, दलवाई, असे दोन्ही बाजूंना जोडणारे घटक उपेक्षित राहिले.
कोणाही इहवाद्याच्या मनात, धर्मसंस्थेमुळे सर्वाधिक ग्रस्त असलेल्या मुस्लिमांविषयी अपार सहानुभूती असणे स्वाभाविकच आहे; परंतु मुस्लिमांचे कल्याण आणि इस्लामिक सनातन्यांचे तुष्टीकरण यातला फरक काँग्रेसला व पुरोगाम्यांना नेमकेपणाने करता आला नाही. इस्लामविषयी सावधगिरी म्हणजे मुस्लिमद्वेषच, असा प्रसार ते करत राहिले.
‘इस्लाम हे जागतिक संकट’ या मूळ विषयापेक्षाही ‘काँग्रेस व पुरोगामी यांनी आम्हाला कधीच समजून घेतले नाही, अस्पृश्य ठरवले’, याचा संताप हा हिंदुत्ववाद्यांचा जास्त निर्णायक- ‘प्रेरक’ आहे! नेहरूप्रणीत समाजवादाशी कोणाचेही कशाहीमुळे भांडण होवो! असे लोक पर्यायी ध्रुव म्हणून हिंदुत्ववादाचे सहानुभूतीदार बनतात! उत्कृष्टतेचा दुस्वास आणि सत्प्रवृत्तीबाबत तुच्छता यांचा उबग आलेल्या कोणालाही आपलेसे वाटेल, असे प्रतीक, ‘हिंदुत्व’ हे बनले. याचा धार्मिक-विवादांशी खरे तर संबंधच नाही.
अर्थकारणामध्ये नरसिंह राव यांनी सुरू केलेल्या आर्थिक-सुधारणांपासून अटलजी वा मोदीजी यांच्या सरकारांनी कधीच फारकत घेतली नाही. मेक इन इंडिया, गव्हर्नन्स व विकास हे केंद्रिबदू बनल्यानंतर, भाजप म्हणजे सध्याची ‘कार्यक्षम प्रतिकाँग्रेस (मध्यममार्गी)’, असे तिच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. हिणकस वक्तव्ये करणाऱ्या आचरटांपेक्षा फडणवीस/गडकरीसदृश परफॉर्मर्स लक्षणीय ठरत आहेत.
लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल : rajeevsane@gmail.com