आपले स्वप्न, बलश्रेणी (पॉवर-हायरार्की)  कडून गुणश्रेणी (मेरिट-हायरार्की)कडे, हे आहे. शस्त्रबल , वित्तबल, संख्याबल , शास्त्रबल अशी विविध बले  मानली तरी सक्ती-बलाचे मूळ युद्धहेच !

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूलनिवासी नावाची तकलादू कल्पना, जणू काही अगोदर एखाद्या ठिकाणी जन्मणे हे श्रेयच आहे, असे मानून न्याय-अन्याय ठरवू पाहाते आहे. आफ्रिकेच्या सॅव्हाना भागात जर चुकून कोणी ‘सेपियन’ म्हणजे सध्याच्या मनुष्यजातीचा, तिथेच राहिला असेल (किंवा हिंडून परत गेला असेल) तर तो मूलनिवासी असेल. बाकी सर्व भूभागात असणारे सारेजण हे बाहेरूनच आलेले असणार आहेत. पुरुषांनी शिकार करणे आणि स्त्रियांनी फळे मुळे इ. गोळा करणे याला हंटर-गॅदरर काळ म्हणतात. हा काळ प्रचंड होता. इतर टोळ्यांशी युद्धे आणि विनिमय असे दोन्ही चालत होते. हिमयुगाचा फायदा घेऊन आफ्रिकेतून स्पेनमध्ये चालत जाणे, सबेरियातून अलास्कात जाणे, असे विक्रम याच अवस्थेत केले गेले. पूर्वजांची भुते, कुलदैवते, नैसर्गिक- ‘देवता’ वगैरे मानून आणि कथा रचून , कथांच्या सहाय्याने एकमेकांना प्रेरित करता येण्यामुळे, सेपियन्सना, निकटसंबंध नसतानाही मोठय़ा संख्येने एकजूट करणे (उदा. सर्व उंदीरपूजकांनो एक व्हा!)  शक्य झाले. यामुळे संभवत इतर मनुष्यसदृश प्राण्यांचा खातमा करून ‘आपण’ जगज्जेते झालो.  (युवाल नोआह हरारी : सेपियन्स)  हंटर-गॅदरर काळात कधीकधी नरभक्षक होण्याची वेळ येण्याइतके दुर्भिक्ष्य असले तरी माणसाने माणसाला दीर्घकाळच नव्हे तर पिढय़ानपिढय़ा गुलाम करणे, हे मात्र शेतीच्या शोधानंतरच घडले.

शेती-जमीनदारी आणि मध्ययुगीन संकृती हा मानवाच्या जीवनातील सर्वात दुष्ट काळ होता. रोज खायला मिळेल या एका अटीवर माणसे गुलाम किंवा भूदास म्हणून अत्यंत दुरवस्थेत व ‘जेत्यां’चे  क्रौर्य सोसणारे ‘जित’ म्हणून जगली. दास्य ही जीवनरीत बनली. सर्व प्रकारची भूसंपदा आणि मनुष्यबळ जिंकून घेणे व स्वतच्या अधिपत्याखाली टिकवणे ही जेत्यांची (नोबल्स किंवा क्षत्रिय) जीवनरीत बनली. जेते आश्रयदाते बनायचे आणि जित हे त्यांचे आश्रित बनायचे. आश्रिताने आश्रयदात्याशी निष्ठावान राहिले पाहिजे हा नीतीनियम होता. किती गुलामांना गुलाम ठेवण्यासाठी किती सनिकांना पोसावे लागेल? याचे अर्थशास्त्र, राजेलोकांना परवडण्यासारखे बनण्यासाठी स्वामिनिष्ठा (लॉयल्टी)  हे भिनवलेले नीतीतत्त्व होते. राजा म्हणजे एका भूप्रदेशाचा हुकूमशहा. त्याची ‘वैधता’ जरी  ‘दिव्य’असली, म्हणजेच उदाहरणार्थ ‘अभिषेक’छाप गोष्टी कराव्या लागत असल्या, तरी वास्तवात युद्धात जिंकणे हा एकमेव मार्ग, कोणत्याही राजकुलाच्या प्रथम पुरुषाला उपलब्ध होता. जगात व भारतातही राजाचे बल त्याच्याशी निष्ठावान अशा उपसत्तांकडे, सुभेदारी असो वा नोकरशाही, वाटले गेले. पिरॅमिड ही स्वाभाविक स्थिर रचना असते. युद्ध नसतानाच्या काळात बलश्रेणीची (पॉवर हायरार्की) उतरंड विविध रूपात बनून राहिली.

युध्दाकडून व्यापाराकडे 

युद्ध ही सामाजिक संस्था बनलेली होती. द्वंद्वांची आव्हाने देणे व त्यात एकाने मरणे वैध होते. दूताला मारू नये असे दंडकही होते. थेट ईश्वराकडून ऐकू आलेल्या ‘उदात्त’ प्रार्थनांमध्ये, ‘शत्रूंचा निपात होवो त्यांची गुरे व स्त्रिया आम्हाला मिळोत’ अशी ऐहिक आक्रमकता रुळलेली होती. राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ म्हणजेच साम्राज्यविस्तार धम्र्य होता. मुलुखगिरी म्हणजेच जास्त जास्त भूप्रदेश आपल्या कबज्यात आणणे याला प्रतिष्ठा होती.

भारतातील मध्ययुगीन काळ काहीसा वेगळा राहिला. कर्मविपाक आणि जन्माचा फेरा या कल्पनांमुळे दास्यवृती किंवा आश्रितवृत्ती, मध्यवर्ती राजेशाहीच्या निरपेक्ष, ग्रामव्यवस्थेत व जातिव्यवस्थेत बांधली गेली. ग्राम / जाती-व्यवस्थेत सामान्यांचे आणि विशेषत्वाने स्त्रियांचे जीवन किती भयानक होते याचे चित्रण नेमाडे यांनी ‘िहदू’या कादंबरीत अत्यंत हृदयद्रावकपणे केलेले आहे. परंतु त्यांचा प्रवक्ता- नायक (प्रोटॅगोनिस्ट) निष्कर्ष काढताना मात्र जे नागर ते शोषक, जे आधुनिक ते शोषक, तर ग्रामीण म्हणजे ममताळू , असेच काढतो! हा चमत्कार नेमाडेच करू जाणेत. असो.

आधुनिक – पूर्व काळात नैसार्गिक संसाधनांवर मालकी कोणाची याचे उत्तर राजेशाहीनेच मिळत होते. त्यामुळे पुढे जरी राष्ट्रे बनली, तरी त्या-त्या राष्ट्राच्या वाटय़ाला कोणते भौगोलिक भाग्य यावे हा युध्दनिकाल व योगायोग होता. पेट्रोलियम हे अरबांना मिळावे यात त्यांचे श्रेय काही नाही. त्याचवेळी इतरांना तितकेसे मिळाले नाही, यात अरबांचा दोष आहे असेही म्हणता येत नाही.

जसजशा बिगरशेती उत्पादनक्रिया आणि व्यापार या गोष्टी वाढत गेल्या, तसतसे नैसर्गिक स्रोतांना फक्त ताब्यात ठेवणे पुरेसे राहिले नाही. त्यांना स्रोत म्हणून ओळखणे, त्यांच्यातून उपयुक्त भाग वेगळा काढणे, स्रोत जोपासणे (हान्रेसिंग) या सर्व गोष्टीत श्रम, भांडवल व उद्योजकता हेही घटक महत्त्वाचे ठरू लागले. अगोदर फक्त ‘ज्याचे हाती ससा तो पारधी’ एवढाच  ‘न्याय’ होता. आता ‘तळे राखील तो पाणी चाखील’ या न्यायाने तळे राखणेही आवश्यक बनू लागले.

अमेरिकेची घटना लिहिली गेली तेव्हा जेफरसन यांनी जॉन लॉक या तत्त्वज्ञाच्या अनुसार एक उत्तर काढले. जो कोणी पुढाकार घेऊन स्रोताला कुंपण घालेल त्याला मालकी देता येईल. पण जर त्याने स्रोत पडीक ठेवला, तर मात्र तो त्याच्या कडून  काढून घेतला जाईल. म्हणजे उत्पादन करण्याला महत्त्व दिले गेले. इतकेच नव्हे तर भौगोलिक भाग्य विपरीत असूनही जपान ‘जपान’ होऊ शकला याचे श्रेय जपानमधील श्रमसंस्कृतीला द्यायलाच हवे.

रोनाल्ड ड्वोर्किनचे अचाट स्वप्नरंजन

कित्येकवेळा वाटप कसे करावे याला काहीच तर्कशुद्ध उत्तर नसते तेव्हा एक सुटसुटीत उत्तर दिले जाते. ‘सर्वाना समान’! याचा अर्थ असा होतो की ज्यांनी फक्त लोकसंख्या वाढवण्याचेच कर्तृत्व (!) केले त्यांनाही समान. हे न्याय्यही नाही. दुसरे असे की नैसर्गिक संसाधनांबाबत सर्वाना समान म्हणजे नेमके ठरवायचे कसे ? रोनाल्ड ड्वोर्किन हे सध्याचे समता-शिरोमणी आहेत (पाहा : सॉव्हरीन व्हर्च्यू इक्वालिटी). त्यांनी सांगितलेला प्रयोग पाहा:

एका बेटावर एक जहाज फुटून लोक पोहोचतात. ते बेटावरील संसाधने समान वाटून देणारा परिपूर्ण निष्पक्ष असा नेता निवडतात. बेटावर प्रचंड संख्येने शिंपले उपलब्ध असतात. नेता शिंपल्याचे चलन बनवून सर्वाना समान शिंपले देतो. मग नेता बेटाचे त्याच्या मते समान मूल्यांचे तुकडे करतो. एखाद्या तुकडय़ात फक्त विहीर आहे, तर दुसऱ्यात बरीच झाडे आहेत, असे ‘सममूल्य’ तुकडे तो करतो. मग तो प्रत्येक तुकडय़ाचा लिलाव करतो. प्रत्येकाने आपापले किती िशपले कशासाठी पणाला लावायचे हे स्वतच्या मतानुसार ठरवायचे. लिलाव पूर्ण झाला की नेता सर्वाना विचारतो ‘‘कोणालाही कोणाचाही हेवा वाटतो आहे काय?’’ हेवा वाटतोय, असे आढळल्यास तो हेवा कमी करण्याच्या दृष्टीने पुन्हा तुकडे अ‍ॅडजस्ट करतो. पुन्हा िशपले समान वाटून लिलाव करतो. असे तुकडे आणि असे लिलाव, तो हेवा नष्ट होईपर्यंत करत राहातो. एकदाचे असे वाटप होते की कोणालाच कोणाचा हेवा वाटत नाही!

पण लोक आता आपापल्या तुकडय़ाच्या सहाय्याने उत्पादन सुरू करतात आणि एकमेकांशी व्यापारही करतात. परिणामी जी आर्थिक परिस्थिती उत्पन्न होते तिच्यात बरेच ‘हेवे’ उत्पन्न होतात. मग नेता पुन्हा सर्व संपत्तीचे एकत्रीकरण करून, पुन्हा शिंपले वाटून पुन्हा नव्याने नव्या संपत्तीचे तुकडे पाडून, पुन्हा लिलाव सुरू करतो आणि हेवारहितता येईपर्यंत फेरवाटप करतो. उत्पादन – हेवे – फेरवाटप असे चक्र चालू रहाते. ड्वोर्किनसाहेबांच्या मते अशी राज्यसंस्था हवी. बोंबला !

जसजसा जागतिक व्यापार वाढला, तसतशा जागतिक श्रम बाजारपेठा व जागतिक भांडवलबाजारपेठा अधिकाधिक जोडल्या गेल्या. पूर्वी नैसर्गिक स्रोताची मालकी युद्धांचे निकाल आणि भौगोलिक-भाग्य यावरच ठरत होती. ती आता अंशत उत्पादक-कर्तृवावरही ठरू लागली आहे. भौगोलिक भाग्ये जरी विषम असली तरी ती वैविध्यपूर्णही असतात. यामुळे व्यापार उभयलाभकारी बनतो. श्रम- मुबलक देश आणि भांडवल-मुबलक देश एकमेकांकडून नसलेला घटक मिळवू शकत आहेत. बडय़ा देशांची भांडवले अप्रगत देशांत गुंतून राहिल्याने आणि त्यांना ग्राहकही अप्रगत देशात शोधावा लागत असल्याने, त्यांना साम्राज्यकालीन आक्रमकता सोडून देऊन, अप्रगत देशांचाही सहानुभूतीपूर्वक विचार करणे भाग आहे.

नैसर्गिक स्रोतांच्या मालकीचा प्रश्न युद्धांकडून उत्पादन-व्यापार यांच्याकडे जात जाणे आणि राज्यसंस्थेचेही हळू हळू लोकशाहीकरण होत जाणे हे एकत्रितपणे घडते आहे. केन्सने कल्याणकारी राज्याचा शोध लावल्यानंतर, जरी भ्रष्ट असली, तरी राज्यसंस्था नुसती बलश्रेणी न रहाता, तिलाही आता विधायक योगदानांची श्रेणी मान्य करावी लागत आहे.

‘सर्व इतिहास हा वर्गसंघर्षांचा इतिहास आहे’ – मार्क्‍स ! दुरुस्ती —  मूलत वर्ग हे  ‘युद्धखोर  विरुद्ध उत्पादक’ असे असून इतिहास म्हणजे उत्पादकांची वाढती सरशी आहे.

लेखक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रांचे स्वातंत्र्यसमृद्धीसवरेदयवादीआंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत. ई-मेल   rajeevsane@gmail.com

मराठीतील सर्व विरोध-विकास-वाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trade war war organization