डॉक्टर झाल्यावरही संघर्षच
युक्रेन- रशियाच्या युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमुळे भारतातील शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकिकडे शिक्षणात विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतातील जवळपास ११ लाख ३३ हजार ७४९ विद्यार्थी यंदा विविध देशांत उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भारतातील वैद्यकीय शिक्षण हा कळीचा मुद्दा झाला आहे. उच्च शिक्षणाच्या उतरंडीत सर्वात स्पर्धा असलेला, महागडा आणि यशाचा हमखास मार्ग किंवा किमान भविष्यातील चरितार्थाची हमी अशी या अभ्यासक्रमाची ओळख. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. युरोप, अमेरिका या देशांतले शिक्षण महागडेच, पण युक्रेनसारख्या देशांतील वैद्यकीय शिक्षणसंस्थांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या पायघडय़ांवरून चालत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे कल वाढला आहे.
परदेशी पदवी घेऊन भारतात आलेल्या डॉक्टरांना येथे येऊन पात्रता परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण साधारण १५ ते २० टक्के आहे. २०२० मध्ये ३५ हजार ७७४ डॉक्टरांनी ही परीक्षा दिली. त्यातील ५ हजार ८९७ विद्यार्थी पात्र ठरले. गेल्या सहा वर्षांत साधारण दीड लाख डॉक्टरांनी ही परीक्षा दिली आहे. दरवर्षी यात वाढ होत आहे.
युक्रेन, रशिया, जॉर्जिया यासारख्या देशांमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना रुग्णांना तपासण्याचा अनुभव फारसा नसल्यामुळे भारतात परतल्यावर पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासह हा अनुभव मिळविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागते.
चीनच्या विद्यापीठामध्ये जो अभ्यासक्रम शिकविला जातो, तोच भारतातही शिकविला जातो. त्यामुळे अभ्यासक्रमाचे ज्ञान अवगत आहे, परंतु प्रत्यक्ष रुग्णांसोबत काम करण्याची संधी मिळत नाही. ‘मी पहिल्या प्रयत्नात पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालो आणि आता अकोलाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशीप करत आहे. सुई कशी लावायची इथपासून माझे शिक्षण सुरू झाले आहे. इथे शिकवायला कुणीच नसते. सुरुवातीला बराच कठीण काळ होता. इतर इंटर्न विद्यार्थ्यांच्या मदतीने मी आता बऱ्याच गोष्टी शिकलो आहे,’ असे मूळचा अकोल्याचा असलेल्या अक्षयने सांगितले. रशियातून २०१७ साली वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेला प्रतीकही काही वर्षे अनुभव घेतल्यावर आता अकोल्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
परदेशातून वैद्यकीय क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मात्र भारतीय विद्यार्थ्यांसोबतच स्पर्धेत उतरावे लागते. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील वैद्यकीय शिक्षण चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे नोकरीमध्ये भारतात शिक्षित विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काम करण्याची संधी कमी वेळा मिळते, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. शहरांमध्ये नोकरीच्या ठिकाणी अनेकदा डावलले जाते असा अनुभव नेपाळहून
वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनीने व्यक्त केला आहे.
रशियातील काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळतो. परंतु रुग्णांशी संवाद साधण्याची भाषा येत नसल्यामुळे काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे भारतात आल्यावर इंटर्नशिपच्या काळात ही उणीव भरून काढली जाते, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली आहे.
ग्रामीण वा जिल्हा स्तरावर संधी
गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागांत डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे येथे या विद्यार्थ्यांना सहज संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी तेथे जात असल्याचे आढळत आहे.
जागांच्या दसपट प्रवेशोत्सुक
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) घेण्यात येते. दरवर्षी देशातील १५ ते १६ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात.
चालू शैक्षणिक वर्षांत (२०२१) एकंदर १४.४४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राखीव, अपंग, खुल्या प्रवर्गातील किमान ४० ते ५० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतात. यंदा असे ८ लाख ७० हजार विद्यार्थी पात्र ठरले. मात्र, उपलब्ध जागा होत्या ८८ हजार १२०, त्यातील जवळपास ३९ हजार जागा खासगी महाविद्यालयातील आहेत. देशात ५९६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक मागणी आणि वैद्यकीय क्षेत्रात मनुष्यबळाची गरज असूनही गेल्या सात वर्षांत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या साधारण ३० हजार जागा वाढल्या आहेत. महाविद्यालयांतील ८५ टक्के जागांवरील प्रवेश हे राज्यांच्या स्तरावर होतात. त्यामुळे राज्यात उपलब्ध जागा आणि प्रवेश क्षमता यांनुसार परिस्थितीत थोडा फार फरक पडतो. मात्र प्रवेशाची अटीतटी कोणत्याही राज्यासाठी चुकलेली नाही. त्यामुळे प्रवेशासाठी अर्ध्या किंवा एका गुणाची स्पर्धा असते. त्यातच परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षा नसतात. त्यामुळेही परदेशी जाण्याकडे कल वाढत असल्याचे दिसते.
राज्यात चारपट वाढ
पाच वर्षांपूर्वी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीसाठी येणाऱ्या परदेशातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ६० ते ७० अशी होती. परंतु मागील पाच वर्षांत हे प्रमाण वेगाने वाढले आहे. आता वर्षभरात सुमारे साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी नोंदणीसाठी अर्ज करत आहेत. यात युक्रेनच्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असून जवळपास २५ ते ३० विद्यार्थी नोंदणी करत आहेत, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले.
(संकलन – शैलजा तिवले, रसिका मुळये)