|| डॉ. चतन्य कुंटे

चित्रपटगीतांमध्ये अभिनेत्रीला उसना आवाज देताना लता मंगेशकर ‘पाश्र्वगायिका’ असतात. पण त्यांच्या गायनाची जादू इतकी प्रभावी, की अनेकदा आपण ती नायिका, तिचा अभिनय विसरून जातो आणि केवळ लताजींचे गीतच ऐकत राहतो. कारण त्या गायनात भावाभिनय तितकाच उत्तम झालेला असतो! पाश्र्वगायन बाजूला ठेवून चित्रपटांखेरीज लताजींनी जी गीते स्वतंत्रपणे गायली त्यांचा विचार वेगळ्या प्रकारे करावा लागेल.

अशी गरफिल्मी गीतांमध्ये कवीचे शब्द, रचनाकाराची धुन, संयोजकाचा वाद्यमेळ आणि लताजींचा आवाज केवळ एवढे चारच घटक असतात.. त्याला दृश्यमिती नसते. मात्र, ‘अदृश्य’ गीताला ‘दृश्य’मिती देण्याचे सामथ्र्यही लताजींच्या प्रभावी गायनात जाणवते! कवीच्या कल्पनेला लताजी आपल्या आवाजातून श्रोत्याच्या मनात दृश्य स्वरूप देतात, ‘साकार’ करतात. लताजींचे गीत ऐकताना प्रत्येक श्रोता आपापल्या मनात त्या गीतातील प्रसंगाचे, भावनेचे चित्रण करत जातो आणि मग हे गीत कोणत्याही सर्वसामान्य माणसाचाच भावोद्गार बनतो. हे सामथ्र्य जेवढे शब्दाचे, धुनेचे, तेवढेच गायनाचेही. आणि म्हणून गीतकार, स्वररचनाकार यांच्याइतकेच, नव्हे थोडेसे जास्तच श्रेय लताजींना दिले गेले आहे.

दत्ता डावजेकरांनी स्वरबद्ध केलेली भावगीते (‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ आणि ‘गेला कुठे बाई कान्हा’) गाऊन लताजींच्या भावगीत कारकीर्दीचा आरंभ झाला. १९४८ साली ‘भगवान बुद्ध’ या नृत्यनाटय़ासाठी आचार्य सीताराम चतुर्वेदी यांची हरेन्द्रनाथ नंदी यांनी स्वरबद्ध केलेली गीते लताजींनी गायली होती. ती चार गीते कदाचित लताजींची रेकॉर्डवर आलेली पहिली गरफिल्मी हिंदी गीते असावीत.

हिंदी आणि मराठीखेरीज चित्रपटगीतांच्या निमित्ताने लताजींनी उर्दू, पंजाबी, मारवाडी, गुजराती, भोजपुरी, नेपाली, असमी, मेईती, बंगाली, उडिया, कोंकणी, तुळू, कानडी, तेलगु, तामिळ, मल्याळी, सिंहली, इ. भाषांतील गाणी गायली. ‘अराउंड इंडिया विथ लता’ या एलपी रेकॉर्डमध्ये लताजींच्या विविध भाषांतील गीतांचे संकलन प्रकाशित झाले होते. विशेष म्हणजे लताजी प्रत्येक भाषेतील शब्दोच्चारांचे बारकावे, लहजा इतका उत्तम आत्मसात करायच्या, की वाटावे जणू त्यांची मातृभाषाच ती आहे! त्या, त्या भाषकांनीही लताजींना यथायोग्य आणि यथार्थ शब्दोच्चारांसाठी वाखाणले आहे. हे उच्चारण केवळ शुद्धच नव्हे, तर त्यातला अर्थ, आशय आणि भाव पोहोचवण्याचेही सामथ्र्य आहे. म्हणून तर प्रत्येक बोलीच्या भाषकांना लताजींचे गीत ‘आपलेसे’ वाटते. अशी ‘बहुभाषिक’ कामगिरी फारच थोडय़ा गायकांना साधली आहे. त्यात आशाजी आणि मन्ना डे यांचा उल्लेख लताजींच्या जोडीने करावा लागेल.

‘दिल धरवे सो एक न्यारा है’(१९५४, कबीर, वसंत प्रभू), ‘निसदिन बरसत नन’, ‘मं नहीं माखन खायो’, ‘बरसे बुंदिया सावन की’, ‘मत जा जोगी’ (१९५७, हृदयनाथ), ‘भोला भोला रटते रटते’, ‘बता दे कोई मेरे श्याम की डगरीया’ (१९६४, ललिता लालबहादूर शास्त्री यांची गीते, संगीत- चित्रगुप्त) अशा गरफिल्मी हिंदी भक्तिगीतांतून उत्तरप्रांतीय भारतीयांना लताजींनी रिझवले. तर १९६३ सालच्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’(प्रदीप, सी. रामचंद्र), १९७१ च्या ‘जो समर में हो गये अमर’ (नरेंद्र शर्मा, जयदेव), ‘सत्यमेव जयते’(उद्धवकुमार, जयदेव), १९६८ च्या ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ (स्वातंत्र्यवीर सावरकर, मधुकर गोळवलकर) अशा गीतांतून, ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिमुद्रिकेतल्या गीतांतून लताजींनी राष्ट्रभाव व्यक्त केला.

१९५४ पासून लताजींनी बंगाली गीते गायली.  त्यांची संख्या सुमारे १८० एवढी आहे! सतीनाथ मुखोपाध्याय, सलील चौधरी, भूपेन हजारिका या संगीतकारांखेरीज किशोरकुमार यांचे संगीत असलेली दोन बंगाली गीते श्रवणीय आहेतच; शिवाय हृदयनाथ मंगेशकरांच्या काही मराठी भावगीतांच्या चालींवर बंगाली काव्ययोजना करून बंगालीतही त्या गायल्या गेल्या. बंगाली समाजाचा मानिबदू असलेल्या रवींद्रनाथ ठाकुरांच्या ‘रवींद्रसंगीत’ विधेतील गीतेही लताजींनी गायली. पंजाबी चित्रपटगीते तर लताजींनी गायलीच, पण त्यांच्या लोकसंगीतातील ‘हीर’ हा प्रकार त्या आपल्या कार्यक्रमांत आवर्जून गात असत. १९७९ साली ‘गुरुबाणी’ या रेकॉर्डमध्ये (संगीत- सिंग बंधू) शिखांच्या सबद कीर्तनाच्या आठ रचना त्यांनी गायल्यात. एवढंच काय, १९९२ साली प्रकाशित झालेल्या ‘खुसूस सोनेटा’ या संग्रहात इंडोनेशियाचा प्रख्यात गायक ऱ्होमा इरामा यांच्यासह लताजींनी इंडोनेशियन भाषेतील गीतेही गायली आहेत.

गझल हाही लताजींचा एक खास पलू. ‘लता सिंग्ज गालिब’ या ध्वनिमुद्रिकेशिवाय ‘दहर में नक्श-ए-वफा’ (गालिब, फैयाझ शौकत), के. महावीर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘आंख से आंख मिलाता है कोई’ (शकील बदायुनी), ‘अहद-ए-गम में भी मुस्करातें है’(खैलिश दहलवी) अशा गझला, जगजीत सिंग यांच्यासह केलेला ‘सजदा’ हा गझलांचा अल्बम यांत लताजींनी गझलची रूहदार पेशकश केली.

लताजींचा आरस्पानी, नितळ स्वर सात्त्विक भक्तिगीतांसाठी सर्वथव पूरक ठरला आहे. त्यांनी गायलेल्या भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अथर्वशीर्ष, नमोकार स्तोत्र, हनुमान चालीसा, इ. स्तोत्ररचना योग्य शब्दोच्चार आणि गायनातील भावदíशता यांचा समसमा संयोग आहेत. त्यांनी गायलेल्या ज्ञानेश्वर, तुकाराम, मीराबाई, कबीर, इ. संतांच्या रचना आणि ‘अटल छत्र सच्च दरबार’, ‘प्रेम भक्ति मुक्ती’, ‘राम रतन धन पायो’, ‘राम श्याम नाम गुणगान’, ‘जगराता’, ‘ओम साई राम’, इ. हिंदी भक्तिगीतांच्या ध्वनिमुद्रिका भारतभर श्रद्धेने ऐकल्या जातात.

फिल्मी गीतांखेरीज या गरफिल्मी गीतांतूनही लताजी भारतीय जनतेच्या हृदयात विराजमान झाल्या. या गीतांत कमालीचा सुरेलपणा हा सर्वोच्च गुण तर दिसतोच, शिवाय लोचदार स्वरलगाव, कमालीची रेखीव व दाणेदार तान, मुरकी, हरकत असे गुणही ठळकपणे दिसतात. लताजींचे श्वासाचे नियंत्रण आणि नियोजन तर कमालीचेच होते. शिवाय भावपूर्णता आणण्यासाठी गरिमा-बदल (व्हॉल्युम व्हेरिएशन) व स्वनाधिक्य-स्वनांत (फेड इन- फेड आउट), शब्द-स्वरांतील लयीला हलकासा दोला देणे अशा तंत्रांचा त्यांनी जो वापर केलाय तो केवळ लाजवाब आहे.

१९४० च्या दशकानंतर भारतातील नव्या सामाजिक-आर्थिक घडीतल्या शहरी समाजाच्या कानामनाला रुचावे असे, त्यांचे भावविश्व ज्यातून उभे राहावे असे जे नवे ‘भावगीत’ बनत होते, त्याला समर्थ अशा आवाजाची जोड ज्या गायकांनी दिली त्यांत लता मंगेशकर हे नाव अग्रगण्य ठरले. म्हणूनच मुख्यत्वे २० व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजमनाने आपल्या खासगी आणि राष्ट्रीय जीवनातील नाना प्रसंग साजरे केले ते लताजींच्या आवाजातील गाण्यांनीच!

keshavchaitanya@gmail.com

Story img Loader