मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेनेसाठी हिंदुत्व हा श्वास असल्याने उठता-बसता त्याचा डंका वाजवण्याची आम्हाला गरज नाही. हिंदुत्वाच्या आधारे देशात पहिली निवडणूक शिवसेनेने लढवली आणि जिंकली ती म्हणजे विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक. विशेष म्हणजे शिवसेना हिंदुत्वाच्या आधारे ही निवडणूक लढवत असताना भाजपने त्यास विरोध करत उमेदवार उभा केला होता. पण शिवसेनेने ही निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदुत्वाच्या आधारे युती करण्यासाठी आले. नंतर युतीच्या काळात हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपचे नेते बाळासाहेबांची फसवणूक करत होते हे मी पाहिले आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी भाजपच्या खेळीकडे काणाडोळा केला. बाळासाहेब भोळे होते. पण मी भोळा नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपच्या कृत्यांकडे काणाडोळा करणार नाही. महाराष्ट्रातील हिंदु आता या लोकांच्या हिंदुत्वाला फसण्याएवढे नादान नाहीत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हिंदुत्वाचे नाव घेत नवे खेळाडू आले असले तरी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कधी मराठीचा तर कधी हिंदुत्वाचा मुद्दा घेत त्यांचा खेळ सुरू असतो. डोंबाऱ्यांचा अपमान करणार नाही. गेली दोन वर्षे नाटक-करमणूक बंद होते. आता फुकट करमणूक होत असेल तर का नाही पाहायची! यांचे झेंडेही बदलले. हिंदुत्व उपयोगाला आले तर आले नाही तर सोडून देऊ अशी ही मंडळी आहेत. असे भोंगेधारी-पुंगीधारी खूप बघितले आहेत.

संघराज्य भूमिकेत केंद्र सरकार हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. पण त्याचबरोबर राज्यांची अस्मिताही महत्त्वाची आहे. ती सत्तेच्या बळावर चिरडता येणार नाही व त्यांच्यावर राज्यही करता येणार नाही. सत्तेचा दुरुपयोग कोणी करत असेल तर नाइलाजाने दंड थोपटून उभे राहावे लागेल. महाराष्ट्र औरंगजेबाशी लढला आहे. महाराष्ट्र मरणारा नाही. वेळ आली तर लढय़ाला महाराष्ट्र सज्ज आहे. तसेच राज्यांमधील विरोधकांच्या सरकारांना छळण्याचा आटापिटा सुरूच राहिला तर नाइलाजाने भाजपपीडित राज्ये एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत. गेल्या काही काळात भाजपने महाराष्ट्रात विकृत आणि खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले.

मुंबईत आरेचे जंगल महाविकास आघाडी सरकारने वाचवले. ते राखीव वनक्षेत्र म्हणून जाहीर केले. मेट्रोच्या कारशेडसाठी तीच जागा योग्य असल्याचे मत पूर्ण चुकीचे आहे. आणखी काही वर्षांत कारशेडची जागा कमी पडली असती व पुन्हा झाडे कापावी लागली असती. त्याऐवजी कांजूरमार्गची ओसाड जागा कारशेडसाठी उपयुक्त आहे. राज्य सरकारला जनतेच्या हिताच्या प्रकल्पासाठी ती हवी आहे. त्यामुळे ती जागा देण्यास केंद्र सरकारला काय अडचण आहे. बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारला मुंबईतील जागा हवी, पण महाराष्ट्रातील प्रकल्पासाठी महाराष्ट्रातच असलेली जागा देत नाहीत. मुळात आरेची जागा कारशेडसाठी निवडण्यात चूक झाली होती.

नाणार प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर कोकण दौऱ्यात स्थानिक रहिवाशांनी प्रकल्पास पर्यावरणाच्या मुद्दय़ावर विरोध असल्याचे निवेदन दिले. त्यानंतर विरोध वाढत गेला आणि शिवसेनेने स्थानिक रहिवाशांना पाठिंबा दिला. प्रकल्पाची घोषणा होण्याआधीच परप्रांतीय दलालांनी नाणार परिसरात मोठी जमीनखरेदीही केली होती. आमचा रिफायनरीला विरोध नाही, पण पर्यावरणाचा विनाश नको. रिफायनरीमुळे आर्थिक गुंतवणूक, राज्याचे सकल ढोबळ उत्पन्न किती वाढेल, स्थानिक रोजगार वाढेल, आदी बाबींचा विचार करून आणि स्थानिक रहिवाशांचा विरोध नसेल अशी जागा शोधण्यात येत आहे. उद्योग आणि पर्यावरण दोन्हींमध्ये सुवर्णमध्य काढण्याची आमची भूमिका आहे. पर्यावरणपूरक शाश्वत विकास हाच दीर्घकालीन हिताचा मार्ग आहे.

  • मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
  • सहप्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

Story img Loader