|| डॉ. हमीद दाभोलकर

वैज्ञानिक पद्धतीचा आधार घेणे आयुर्वेदालाही अ‍ॅलोपॅथीप्रमाणेच शक्य असताना, मुळात ‘अ‍ॅलोपॅथी विरुद्ध आयुर्वेद’ असा प्रचार चुकीचा ठरतो, हे आयुर्वेदाविषयी आत्मीयता असणाऱ्यांनीही आता ओळखायला हवे…

योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले बाबा रामदेव करोनासाथीच्या कालखंडात सातत्याने विवादास्पद दावे करून चर्चेचा विषय झाले आहेत. योगाच्या प्रसारासाठी त्यांनी अनेक वर्षांमध्ये केलेले कार्य हे स्पृहणीय असले, तरी आयुर्वेदाच्या अनुषंगाने त्यांनी केलेले दावे आणि त्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिकांची चिकित्सा करणे आवश्यक आहे. आता तर आपल्या देशाचे आरोग्यमंत्री असलेल्या डॉ. हर्षवर्धन यांनीदेखील बाबा रामदेव यांना कठोर शब्दांत समज दिली आहे. बाबा रामदेव यांचे हे दावे करोनाच्या जीवघेण्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर घडत असल्याने याविषयीचे अज्ञान किंवा दिशाभूल जीवघेणे ठरू शकते, म्हणूनदेखील आयुर्वेद किंवा पारंपरिक चिकित्सापद्धती, रामदेव आणि अ‍ॅलोपॅथी यांविषयीची चर्चा गांभीर्याने करणे आवश्यक आहे. यातील पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लढाई आयुर्वेद विरुद्ध अ‍ॅलोपॅथी अशी करण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी याला आपण बळी पडणे योग्य होणार नाही! बाबा रामदेव हे मोठे योगगुरू असले आणि त्यांनी आयुर्वेदाचा प्रचार करण्याचे महत्त्वाचे काम केले असले, तरी त्यांच्या दाव्यांची चिकित्सा म्हणजे आयुर्वेदावर हल्ला असे समजण्याची गरज अजिबात नाही. ते भगवी वस्त्रे धारण करतात म्हणजे त्यांच्यावरील टीका ही हिंदू संस्कृतीवर हल्ला असेही अजिबात समजण्याची गरज नाही.

मानवी जीवनाशी आणि आजाराशी संबंधित कोणतेही दावे करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला, आधुनिक विज्ञानाच्या पद्धती वापरून आपल्या दाव्यांच्या मागे पुरावे उभे करणे आवश्यक असते. अन्यथा अशा स्वरूपाचे दावे हे अंतिमत: आपल्या जिवावर बेतू शकतात; मग ते दावे आयुर्वेदाचे असोत अथवा आधुनिक वैद्यक (अ‍ॅलोपॅथी) शास्त्राचे! ज्या वेळी करोनासारखी जीवघेणी साथ जगभरात येते आणि त्या आजाराविषयी आधीचे फारसे उपलब्ध ज्ञान आपल्याकडे नसते, तेव्हा स्वाभाविकपणे लोक अनेक अंगांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. प्रयोगशाळेमध्ये केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या चाचण्या, त्याहीपुढे प्राणी आणि मानवी स्वयंसेवक यांच्यावर केलेल्या चाचण्या, अशा सर्व चाळण्यांमधून या शोधाला जावे लागते. यामधील काही प्रयोग चुकतात, तर काही यशस्वी ठरतात. प्रयोग करताना, प्रस्तावित पद्धत खरोखरच प्रभावी आहे का? त्याचे फायदे आणि तोटे कोणते? गंभीर/ जीवघेणे तोटे काही आहेत का? जे उपलब्ध प्रयोगसिद्ध ज्ञान आहे त्याच्याशी आपले दावे सुसंगत आहेत का?  – अशा सर्व प्रकारे त्याची चिकित्सा केली जाते. केवळ एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीने मांडले होते किंवा ‘डब्ल्यूएचओ’सारख्या जागतिक संघटनेने सांगितले म्हणून ते अंतिम ज्ञान होत नाही!

कारण, खरे तर ‘अंतिम ज्ञान’ असे आधुनिक विज्ञानात काही नसतेच! नवीन शोध लागले, नवीन पुरावे समोर आले की पुरेसे पुरावे नसलेल्या जुन्या ज्ञानाला बाजूला जावे लागते. यामध्ये भावना दुखावून घेण्यासारखे काहीही नाही! यामुळेच अगदी करोना साथीच्या गेल्या दीड वर्षातही, आधुनिक वैद्यकीय विज्ञानात हायड्रोक्लोरोक्वीन, प्लाझ्मा थेरपी, रेमडेसिविर यांसारख्या वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि औषधे पुरेशी उपयोगी नाहीत किंवा हानीकारक ठरू शकतात याविषयी पुरेसे पुरावे समोर आल्यावर त्या बदलल्या गेल्या. अशा प्रकारची नम्रता ही आधुनिक विज्ञानाला अत्यंत आवश्यक असते.

अभ्यासातूनच निष्कर्षांपर्यंत…

‘मी म्हणतो तेच खरे! माझे म्हणणे तुम्ही मान्य केले नाही तर तुम्ही माझे शत्रू!’ – अशी मानसिकता विज्ञानाला अपेक्षित नाही. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, बाकीच्या कुठल्याही उपचार पद्धतीपेक्षा अ‍ॅलोपॅथीने या वैज्ञानिक पद्धतीचा सगळ्यात प्रभावी वापर केला आहे. याचा अर्थ, सत्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करणे आणि स्वत:च्या चुका स्वीकारणे तसेच त्यामधून शिकणे हा खरे तर कुठल्याही धर्मातील नीतिशास्त्राला अभिप्रेत असलेला भाग आधुनिक वैद्यक विज्ञानाने खूप अधिक प्रमाणात साध्य केला आहे.

‘‘अ‍ॅलोपॅथी म्हणजे औषधे आणि औषधे म्हणजेच नफेखोर औषध कंपन्या’’ असे गणित बाबा रामदेव मांडतात. ही मांडणी पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. आधुनिक वैद्यक या अर्थाने अ‍ॅलोपॅथीमध्ये शरीर रचना (अ‍ॅनाटॉमी) शरीराचे कार्य (फिजिऑलॉजी), शरीराचे आजार (पॅथॉलॉजी), शरीरात घडणाऱ्या जैवरासायनिक क्रिया (बायोकेमिस्ट्री), आजारी शरीरात घडणाऱ्या क्रिया-प्रक्रिया, आजाराचे निदान करण्याच्या पद्धती, त्याचा प्रतिबंध करण्याच्या पद्धती, सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायॉलॉजी), विविध विषाणूंचा अभ्यास (व्हायरॉलॉजी) ते अगदी लसनिर्मितीशास्त्र ही सर्व क्षेत्रे अ‍ॅलोपॅथी किंवा आधुनिक विज्ञानाचा भाग आहेत! एकदा हे आपण लक्षात घेतले तर, करोनाची साथ समजून घेणे आणि ती आटोक्यात आणणे हे केवळ आणि केवळ आधुनिक वैद्यकामुळे शक्य झाले आहे, हे आपण मान्य केले पाहिजे. संसर्गजन्य आजार आणि त्याचा लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिकार ही संकल्पनाच मुळी आधुनिक विज्ञानाची आहे. प्लेगची साथ, पोलिओची साथ, ‘देवी’ या रोगाची साथ हे मानवी समूहाला एकेकाळी अत्यंत तापदायक ठरणारे साथीचे आजार हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेदाला किंवा प्राचीन चिनी वैद्यक परंपरेला अजिबात जुमानले नव्हते. हे साथीचे आजार ताब्यात आणण्याचे काम आधुनिक वैद्यकशास्त्राने केले आहे. ज्या रोगाला ‘देवीचा रोग’ म्हणजे ‘देवीचा कोप झाल्याने होत असलेला रोग’ म्हटले जात होते, त्या रोगाचा पृथ्वीवरून पूर्ण नायनाट करण्याचेही आपल्याला आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे साध्य झाले आहे. साथीचे आजार टाळण्यासाठी मुखपट्टी, निर्जंतुकीकरण आणि शारीरिक अंतर हेदेखील आधुनिक वैद्यक विज्ञानाचे निष्कर्ष आहेत; कारण सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषाणूशास्त्र यांच्या अभ्यासाशिवाय या निष्कर्षांपर्यंत आपण पोहोचू शकलो नसतो.

‘आयुर्वेदाला विरोध’ नाही!

आयुर्वेदाच्या बाजूने विचार करताना आपण हे समजून घेतले पाहिजे की, आयुर्वेद किंवा कोणत्याही पारंपरिक वैद्यकाची ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया ही अनुभवाधारित आहे. ज्या वेळी सूक्ष्मजीवशास्त्र, विषाणूशास्त्र, लसीकरण यांमधील कशाचाही शोध लागला नव्हता, त्या वेळी शतकानुशतके केलेल्या निरीक्षणातून त्याच्या पद्धती विकसित झाल्या आहेत. प्राचीन कालखंडाच्या संदर्भात त्या भविष्यवेधी म्हणाव्या अशाच ठरल्या होत्या. त्यांना सर्वस्वी टाकाऊ ठरवणे हेदेखील विज्ञानाच्या विचारधारेला अनुसरून नाही. आज आयुर्वेद आणि पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचा अभ्यास करणारे अनेक संशोधक हे विज्ञानाची चिकित्सा पद्धती वापरून आपले दावे तपासून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाबा रामदेव यांच्यासारखे लोक जे दावे आयुर्वेदाच्या नावाखाली करीत आहेत, ते आयुर्वेदाच्या अनेक विद्यमान संशोधकांना मान्य नाहीत, तसे ते खासगीत आणि काही ठिकाणी जाहीरदेखील बोलतात; पण ‘बाबा रामदेव यांना विरोध म्हणजे आयुर्वेदाला विरोध आणि आयुर्वेदाला विरोध म्हणजे हिंदू संकृतीला विरोध’ असे काहीसे समीकरण आपल्याकडे प्रचलित झाल्याने ते मोठ्या प्रमाणात होत नसावे, असे माझे निरीक्षण आहे.

हे सगळे समजून घेताना अ‍ॅलोपॅथीने अनेक वेळा पारंपरिक वैद्यकशास्त्राला कमीपणाची वागणूक देण्याची चूक केली आहे, हे मान्य करायला हवे. त्यामधून आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांमध्ये जी दुही निर्माण झाली आहे त्याचा फायदा बाबा रामदेव यांच्यासारखे लोक घेतात आणि अंतिमत: त्याला सामान्य जनता भरडली जाते. उदाहरण द्यायचे झाले तर बाबा रामदेव यांनी लसीकरणाविषयी केलेले वक्तव्य आपण पाहावे. लसीकरण होऊनदेखील डॉक्टर करोनाने मृत्युमुखी पडत आहेत, अशा स्वरूपाची त्यांची विधाने लोकांच्या मनात आधीच लसीकरणाविषयी असलेली भीती आणि गोंधळ वाढवणारी आहेत. प्रत्यक्षात लसीकरण ही साथीच्या रोगांचा प्रतिकार करण्याची आजवर अनेक वेळा सिद्ध झालेली आणि आजपर्यंत सर्वात जास्त वैज्ञानिक आधार असलेली पद्धत आहे. ती १०० टक्के प्रभावी आहे, असे तिच्या समर्थकांचेदेखील म्हणणे नाही. पण आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आणि झालाच तर होणाऱ्या आजाराची तीव्रता ही लसीकरणामुळे मोठ्या प्रमाणात कमी होते, हे सिद्ध करणारा भरपूर पुरावा आहे.

त्यामुळे ‘बाबा रामदेव म्हणजेच आयुर्वेद’ असे जर व्हायचे नसेल तर जसे ‘आयएमए’ने बाबा रामदेव यांच्याविरोधी ठोस भूमिका घेतली, तशीच आयुर्वेदाच्या संघटनांनीदेखील घेणे आवश्यक आहे. त्याहीपलीकडे जाऊन ‘आयुर्वेद विरुद्ध अ‍ॅलोपॅथी’ अशी लढाई लढण्यापेक्षा सद्य:परिस्थितीत करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी अधिक वैज्ञानिक काय आहे, याचा विचार आणि आचार करणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.

लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.

hamid.dabholkar@gmail.com