प्रसाद माधव कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जातजाणिवा बळकट होत जाण्याच्या आजच्या आव्हानात्मक काळात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पथदर्शक आहेत..
महात्मा जोतिबा फुले यांचा जन्मदिन ११ एप्रिल तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल. त्यांच्यात किमान अर्धशतकाचे अंतर होते. बाबासाहेब हे महात्मा फुले यांना आपले गुरू मानत. या महामानवांचा जन्मदिन साजरा करताना जातिअंताबाबतची त्यांनी मांडलेली भूमिका ध्यानात घेणे आणि तिचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. कारण आज समाजामध्ये जातजाणिवा पातळ होण्याऐवजी बळकट होताना दिसत आहेत. जाती व धर्माच्या प्रश्नांना जगण्याच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे ठरवत त्यावर आधारित राजकारण केले जात आहे.
इंग्रजी सत्ता, दारिद्रय़, रोगराई, दुष्काळ, सावकारी फास, गुलामगिरी, शेतकऱ्यांची होरपळ आदी कारणांनी पिचत चाललेल्या समाजाला महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा कृतिशील प्रयत्न केला. शिक्षणापासून ते लेखनापर्यंत आणि स्त्रीमुक्तीपासून ते सत्यशोधक समाजापर्यंत अनेक क्षेत्रात त्यांनी उत्तुंग कामगिरी केली. त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीतीविरोधात आवाज उठवला. जातिव्यवस्थेवर प्रहार केला. त्यांनी पुनर्विवाहाला दिलेल्या प्रोत्साहनापासून विधवांच्या संततीच्या बालकाश्रमापर्यंतचे केलेले उपक्रम ही जातिअंतासाठीची महत्त्वाची पावले मानावी लागतील. तुकाराम तात्या पडवळ यांच्या ‘जातिभेद विवेकसार’ या पुस्तकाची महात्मा फुले यांनी स्वत: दुसरी आवृत्ती काढली होती. ‘मी कोणत्याही व्यक्तीच्या हातचे अन्न ग्रहण करेन’ असे म्हणणाऱ्या व तसे वागणाऱ्या महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांसाठी स्वत:चा पाण्याचा हौद खुला केला होता. विधवांच्या केशवपनविरोधी यांनी आवाज उठवला होता. तसेच वैचारिक दास्यातून समाजाची सोडवणूक व्हावी म्हणून ‘गुलामगिरी’सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. तसेच समतेचा विचार देणाऱ्या सत्यशोधक समाजाची भूमिका त्यांनी मांडली. कोणताही धर्म व धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केला नाही. इथला जातिभेद, वर्णव्यवस्था ही माणसाने स्वार्थी हेतूने निर्माण केली आहे. हे जग निर्माण करणारा कोणी तरी निर्मिक आहे असेही त्यांनी सांगितले.
महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांचे ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यात त्यांची मूलगामी तत्त्वधारा दिसते. ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांनी या पुस्तकाला ‘भावी स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ आणि ‘विश्व कुटुंबवादाची गाथा’ अशी सार्थ विशेषणे दिली आहेत. सर्व प्रकारची विषमता ही मानवनिर्मित आहे. म्हणून ती नष्ट केली पाहिजे व समता प्रस्थापित करण्यात पुढाकार घेतला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. जातिव्यवस्थेचा दाहकपणा समाजाचे स्वास्थ्य घालवत असल्यानेच जातिअंताची भूमिका महात्मा फुले अग्रक्रमाने मांडत राहिले. हीच भूमिका त्यांचे शिष्य व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी अधिक अभ्यासपूर्ण आणि तपशीलवार पद्धतीने मांडलेली आहे.
डॉ. आंबेडकर हे प्रखर बुद्धिवादी विचारवंत होते. अर्थशास्त्रापासून समाजशास्त्रापर्यंत आणि धर्मशास्त्रापासून राज्यशास्त्रापर्यंत विविध ज्ञानशाखांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. त्यांच्या विचारांना भारतीय समाजजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी स्वत:चे आयुष्य त्यांनी खर्ची घातले. या महामानवाने देशातील कोटय़वधी जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. सामाजिक समतेचे आंदोलन प्राणपणाने लढणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे राजकीय व शैक्षणिक कार्य अतिशय व्यापक स्वरूपाचे आहे. स्वतंत्र भारताला आदर्श राज्यघटना देण्यामध्ये त्यांचे योगदान फार मोठे आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना समाजाची वाटचाल जातिअंताऐवजी जातीच्या सक्षमीकरणाकडे होताना दिसत आहे. आपली राजकीय दुकानदारी चालू ठेवण्यासाठी काही पक्ष, संघटना जातजाणिवा बळकट करण्याची नियोजनबद्ध कारस्थाने रचत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांचे जातिसंस्थेचे विश्लेषण आणि जातिसंस्था नष्ट करण्याचे मार्ग आपण समजून घेतले पाहिजेत.
१९१६ साली डॉ. आंबेडकरांनी ‘भारतातील जातिसंस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास’ हा लेख लिहिला होता. त्याद्वारे त्यांनी जातिसंस्था ही मानवनिर्मित असून ती कृत्रिम आहे. जातीबद्ध विवाहसंस्था हा तिचा मुख्य आधार आहे हे स्पष्ट केले. ‘अनुकरणाचा संसर्ग दोष’ हा सिद्धांत डॉ. आंबेडकरांनी मांडला आहे. त्यांच्या मते, जगातील सर्व समाज हे वर्गीय समाज होते. त्या वर्गाचा आधार आर्थिक, बौद्धिक किंवा सामाजिक होता. समाजातील व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वर्गाची घटक असते. ही जागतिक वस्तुस्थिती असल्याने हिंदू समाजही त्याला अपवाद नव्हता. भारत सोडून अन्यत्र समाजातील वर्ग मुक्त राहिल्याने ते समाज परिवर्तनीय राहिले. परंतु भारतातील वर्ग बंदिस्त केले गेल्यामुळे भारतात जाती निर्माण झाल्या. जात म्हणजे बंदिस्त वर्ग होय. भारतीय समाजात वर्गाला बंदिस्त करण्याची प्रक्रिया तत्कालीन उच्चवर्णीयांनी सुरू केली. त्याचे अनुकरण इतर तळच्या वर्णानीही केले. डॉ. आंबेडकर म्हणतात, जातिसंस्था ही मनूने निर्माण केलेली नसून ती त्याच्यापूर्वी फार वर्षे अस्तित्वात होती. मनू हा केवळ जातिव्यवस्थेला तात्त्विक रूप देणारा तिचा प्रचारक होता. जातिव्यवस्था ही उपदेशातून निर्माण झालेली नाही. आणि उपदेशातून ती नष्टही होणार नाही. आंबेडकरांनी जातिसंस्थेच्या उत्पत्तीत केंद्रिबदू असलेल्या व्यवसाय, वर्गीय संस्था, नव्या श्रद्धा, देशांतर आदी मुद्दय़ांकडेही लक्ष वेधले आहे. त्यांनी ‘जातीचा उच्छेद’ हा लेख लिहून जातिसंस्थेचे आणखी विश्लेषण केले. त्यांच्या मते, कोणत्याही सुसंस्कृत समाजात श्रमविभागणी असते, परंतु ती श्रमिकांच्या जन्मभेदावर हवाबंद कप्पे तयार करणारी नसते. जातिसंस्था ही श्रमविभागणी नसून श्रमिकांचीसुद्धा विभागणी असल्याने ती कृत्रिम आहे. हिंदू समाज म्हणजे विविध जातींचा एक पुंजका होय. हिंदू समाजाचे हे स्वरूप व्यक्तीविकासाला आणि उत्पादन पद्धतीला मारक आहे. डॉ. आंबेडकरांचे हे विश्लेषण ध्यानात घेतले की आज विविध मार्गानी होणारी जातीय संमेलने व जातजाणिवा बळकट करण्याचे उपक्रम सामाजिक ऐक्याला तडा देणारे आहेत हे स्पष्ट होते.
जातिसंस्थेने बद्ध झालेल्या हिंदू समाजात एका नव्या प्रबोधन चळवळीची त्यांना गरज वाटत होती. या प्रबोधनाची व्याप्ती सखोल असली पाहिजे ही त्यांची धारणा होती. जातिसंस्था नष्ट करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून आंतरजातीय विवाहाकडे डॉ. आंबेडकर पाहताना दिसतात. जातिसंस्था नष्ट करायची असेल तर प्रथम धर्माचे आणि त्याच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यातूनच त्यांनी धर्माची समीक्षा केलेली दिसते. त्यांनी म्हटले आहे, ‘धर्म हा केवळ कायदा किंवा आज्ञा नसाव्यात. ज्या क्षणी धर्माचे रूपांतर तत्त्वाऐवजी कायद्यात होते, त्याच क्षणाला तो धर्म भ्रष्ट होतो. आणि असा भ्रष्ट खऱ्या धार्मिक संकल्पनेचा आवश्यक गुणच मारून टाकतो.’
१९३५ साली त्यांनी धर्मातराची घोषणा केली. जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि विचारात बदल करणे म्हणजे धर्मातर ही त्यांची भूमिका होती. डॉ. आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेचीही सखोल समीक्षा ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी धर्मातर केले. त्यापूर्वी त्यांनी अनेक धर्माचा व राजकीय विचारांचा अभ्यास केला होता. साम्यवाद आणि बौद्ध धर्म या दोन महत्त्वाच्या तत्त्वप्रणाली आहेत यावर ते ठाम होते. ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या लेखात आणि ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथात त्यांनी त्याची चर्चाही केलेली आहे.
आज समाजात जातिअंतापेक्षा जातीचे बळकटीकरण, धर्मनिरपेक्षतेपेक्षा धर्माधतेचे प्रकटीकरण आणि परधर्मद्वेष हा स्थायिभाव, लोकशाहीपेक्षा ठोकशाहीचे, हुकूमशाहीचे समर्थन, मिश्र अर्थव्यवस्थेपेक्षा देशविके खासगीकरण यांचे समर्थन वाढीस लागलेले असताना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समजून घेण्याची गरज आहे.
लेखक इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली ३३ वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक आहेत.
prasad.kulkarni65@gmail.com