अतुल सुलाखे jayjagat24@gmail.com
जिथे मराठी आहे तिथे ब्रह्मविद्या पोहोचवायची असा निर्धार करत माउलींनी पसायदान मागितले. तर विनोबांनी साऱ्या विश्वासाठी ब्रह्मविद्येचा सुकाळ होईल असे पाहिले आणि ‘जय जगत्’ असा मंत्र दिला. दोन शब्दांतील पसायदान असे या मंत्राचे स्थान आहे.
साम्ययोगाच्या अध्ययनातील कळीचे स्थान असणारा ग्रंथ म्हणजे ‘गीता प्रवचने.’ विनोबा या प्रवचनांना, ‘ज्ञानेश्वरी सिम्प्लिफाइड’ म्हणत. आचार्य अत्रे यांनी नेमका असाच अभिप्राय दिला आहे. ‘गीता प्रवचनांना तुळायचे तर ज्ञानेश्वरीच हवी. गीताई म्हणजे अमृताची पुष्करिणी आणि गीता प्रवचने म्हणजे तिच्यामधील हजार धारांचे सोन्याचे कारंजे आहे,’ अशी त्यांची प्रतिक्रिया होती. कवी, तत्त्वज्ञ, आचार्य या तिहींचे दर्शन या प्रवचनांमधून सतत होते. वक्ता असा तर श्रोता, विनोबांच्या भाषेत सांगायचे तर ‘संत, महंत आणि सेवक!’
या ग्रंथाला प्रस्तावना लिहिताना, ‘आता हे पुस्तक भारतीय जनतेचे झाले,’ असे विनोबांनी नोंदवले आहे. ‘यात जीवनाशी संबंध नसलेले कोणतेही वैचारिक वाद नाहीत. ही प्रवचनेही गीतेप्रमाणेच प्रत्यक्ष कर्मक्षेत्रात प्रकट झाली’, असे ते म्हणतात. या प्रवचनांमुळे, विशेषाने सामान्य श्रमिकांना त्यामुळे सांत्वना आणि श्रमपरिहार लाभेल, असा विनोबांना विश्वास होता. भूदान यज्ञाची वातावरणनिर्मिती करताना या प्रवचनांचा मोठा उपयोग झाला. ती जिथे पोचतात तिथे हृदयशुद्धीची आणि क्रिया पालटण्याची प्रेरणा पोचते असे विनोबा मानत.
विनोबांचे गीता चिंतन ‘साम्ययोग दीपिका’ म्हणून ख्यात आहे. गीताईची म्हणून एक ‘प्रस्थानत्रयी’ आहे. गीता प्रवचने, स्थितप्रज्ञ दर्शन आणि गीताई चिंतनिका. त्या त्रयीत गीता प्रवचनांना आद्य स्थान आहे. गीता प्रवचनांची सेवा घडली कशी हे सांगताना विनोबा तुकोबांच्या वाणीचा आधार घेऊन लिहितात –
शिकवूनि बोल। केले कौतुक नवल
आपणियां रंजविलें। बापें माझिया विठ्ठलें।
या प्रवचनांशी जोडलेली एक गमतीदार गोष्टही आहे. धुळे तुरुंगात आल्यानंतर विनोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रसोडय़ाचा ताबा मिळवला. त्यामुळे हवी तशी रसोई करता येऊ लागली. या रसोईमध्ये डाळ दोन प्रकारे शिजवली जाऊ लागली. राजकीय कैद्यांसाठी ‘फिकी’ आणि साध्या कैद्यांसाठी ‘तिखी’. डाळ जेवढा वेळ शिजवायची तेवढा वेळ हलवायची असे विनोबांचे सूत्र होते. त्यामुळे ती डाळ अत्यंत रुचकर होई.
नुसत्या डाळीची चव इतकी सुंदर आहे म्हणताना तिखेवाले, फिक्यांच्या गटात आले. सगळेच सात्त्विक आहार घेऊ लागले. यामुळे तुरुंगाधिकाऱ्यांची पंचाईत झाली. अखेरीस त्याने विनोबांना म्हटले, ‘प्रत्येक कैद्याला किती तिखट खायला द्यायचे याचे प्रमाण आम्हाला ठरवून देण्यात आले आहे. तो नियम आम्हाला मोडता येणार नाही. तेव्हा तुम्ही कैद्यांना तिखट डाळच देत जा.’ विनोबांनी ती सूचना मान्य केली. पुन्हा रुचकर पण तिखट डाळ बनू लागली. रुचकर वाणीप्रमाणेच रुचकर आहाराची आठवणही या प्रवचनांशी जोडली गेली. पुढे भूदान यात्रेत विनोबांनी आवर्जून धुळे तुरुंगाला भेट दिली. तिथल्या कैद्यांसमोर भाषण देऊन गीता प्रवचनांशी निगडित आठवणी जागवल्या. सगळय़ा संतांनी काबाडकष्ट करत धर्म जागरण केले. त्यांनी अगदी देवालाही सोडले नाही. विनोबांनी हाच मार्ग अनुसरला. शरीर परिश्रमातून ब्रह्मविद्या जागवली.