‘जाहिरातजगत आणि मराठी’ या आधीच्या लेखविषयाला जोडून आजचा हा भाग आहे, हे शीर्षकावरून आपल्या लक्षात आलं असेलच. त्या लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी जाहिरातींमध्ये जास्तीतजास्त मराठी शब्द कसे वापरता येतील, यासाठी उदाहरणादाखल एका गृह प्रकल्पाच्या जाहिरातीत येऊ शकणारे काही शब्द पाहू.
‘सुखसुविधायुक्त प्रशस्त घरांसाठी आजच नोंदणी करा. सवलत योजना फक्त आठ दिवस. सर्वोत्तम जीवनशैली, निसर्गपूरक राहणी, शहरातील सर्वोत्कृष्ट ठिकाणी. प्रकल्पातील सुविधा – अखंड पाणीपुरवठा, पर्यायी वीजपुरवठा, मोठा वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था उपलब्ध. याशिवाय, व्यायामशाळा, मुलांसाठी खेळण्याची सुरक्षित जागा, वाळूत खेळण्याची सोय, बैठे खेळ, बंदिस्त जागेतले खेळ आणि मैदानी खेळांसाठी सुविधा. सांस्कृतिक केंद्र, विरंगुळा केंद्र मनोरंजन केंद्र अशा सर्व सोयी.’ याव्यतिरिक्तही स्थावर मालमत्ता, चटई क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, तारण, खरेदीकरार, गृहकर्ज, पुनर्विकास असे या क्षेत्रातले अनेक पर्यायी मराठी शब्द आहेत. शासकीय कामकाजात ते वापरलेही जातात, पण जर मराठीच्या स्वभावाप्रमाणे एका सामासिक शब्दाऐवजी सुटसुटीत शब्दसमूह जास्त सोपा वाटत असेल तर तसे शब्द वापरायला हवे. उदा. गृहकर्ज आणि घरासाठी कर्ज.
एकूणच वेगवेगळय़ा क्षेत्रांमधला मराठी शब्दसाठा वाढण्यासाठी आणि रुळण्यासाठी त्या त्या व्यवसायातल्या भाषाप्रेमी व्यक्तींनी जागरूक राहून अशा शब्दसाठय़ात सतत सोप्या पर्यायांची भर घालत राहायला हवी. यासाठी बोलींमधल्या पर्यायांचाही विचार करता येईल. शेवटी हे कोणा एकटय़ा-दुकटय़ाचं काम नसून भाषा बोलणाऱ्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. या कामाला चळवळीचं स्वरूप आलं, तर मोठय़ा प्रमाणावर नवीन शब्द निर्माण होतील, काही जुने शब्द पुढे येतील, काही स्वीकारले जातील, काही नाकारले जातील अशी घुसळण घडेल. नवीन किंवा उपलब्ध पर्यायी शब्दांची चर्चा आणि यानिमित्ताने चर्चिलं जाणारं भाषेचं स्वरूप यावर केवळ अभ्यासकच नव्हे, तर भाषा बोलणाऱ्या सर्वानीच विचारप्रवृत्त व्हायला हवं असं वाटतं.
मागील लेखातील ‘टीझर’ या शब्दासाठी अनेकांनी ‘झलक’, ‘कुतूहलक’ तर ‘यूएसपी’साठी ‘खासियत’ असे शब्द सुचवले. या आणि यापूर्वीही शब्द सुचवणाऱ्या सर्वाचे आभार.
– वैशाली पेंडसे- कार्लेकर
vaishali.karlekar1@gmail.com