राजा देसाई rajadesai13@yahoo.com

धर्म म्हणजे नेमकं काय याबाबतचा या भूमीमधला विचार सगळ्या जगाला कवेत घेणारा असताना आपण कुठल्या संकुचित धर्मविचाराच्या मागे जातो आहोत याचा आज, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी (१२ जानेवारी) विचार होणे आवश्यक आहे.

prithvik pratap and prajakta lovestory
प्रसाद खांडेकरच्या नाटकामुळे झालेली पहिली भेट अन्…; ‘अशी’ जमली पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताची जोडी! खूपच हटके आहे लव्हस्टोरी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!
article about loksatta durga award 2024 event celebration
लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
bhendoli festival celebrated in tuljabhavani temple
चित्तथरारक भेंडोळी उत्सवाने तुळजाभवानी मंदिर उजळले; काळभैरवनाथाने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

तिशीच्या एका भगव्या वस्त्रधारी  तरुण संन्याशाच्या ‘बंधूंनो आणि भगिनींनो’ या तीन सामान्य शब्दांनी अमेरिकन ख्रिश्चन श्रोतृवर्गानं टाळ्यांच्या गजरानं सभागृह डोक्यावर का घेतलं असावं, असा प्रश्न आम्हा भारतीयांना कधी पडला का? या दुर्लक्षातच खऱ्या भारतीय धर्माचाच नव्हे तर निधर्मीवाल्यांचाही आज दिसणारा घोर पराभव दडलेला आहे. प्रश्न केवळ बौद्धिक काथ्याकुटाचा नाही; त्याचा वर्तमानाशीही अत्यंत दृढ संबंध आहे आणि म्हणून नाइलाजानं त्याच त्याच विचारांचीच नव्हे तर शब्दांचीही इथे उजळणी.

शिकागो परिषदेच्या अनेक शतकं अगोदरच सर्वच धर्माचे सांगाडे बनून गेले होते. सेमिटिक धर्माच्या (ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम) कट्टरपणाच्या शेकडो वर्षांच्या रक्तरंजित पार्श्वभूमीवर एक परधर्मीय माणूस आपल्याला हृदयपूर्वक ‘बंधू-भगिनींनो’ म्हणून संबोधित आहे हे पश्चिमेसाठी धक्कादायक होतं. त्यातूनच झालेला टाळ्यांचा गजर हा सर्व मानवांत वसणाऱ्या ईश्वर तत्वाचा वा मानवतेचा हुंकार होता.

सेमिटिक धर्म अवनत झाले ते धार्मिक कर्मठपणा व असहिष्णुता इत्यादीमुळे तर भारतातील धर्माच्या, विशेषत: हिंदूू, अवनत अवस्थेचं प्रमुख कारण ठरलं ते अस्पृश्यता आणि जातीजातींत भयाण सामाजिक विषमता व त्यासंबंधीची कट्टरता. आज २१ व्या शतकातही जातींच्या अंगाने असलेला श्रेष्ठ-कनिष्ठतेचा भाव पाहिला की इस्लामने १५०० वर्षांपूर्वी असामान्य निष्ठेनं राबवलेल्या सामाजिक समतेचं महत्त्व हे स्वामीजींच्या पुढील वाक्यात दडलेलं आहे. ते म्हणतात,  ‘आम्ही दलित व शूद्रांना असं वागवलं की ते बिचारे आपण माणूस आहोत हेही विसरून गेले.. ब्रिटिशांकडून आम्ही मागत असलेले अधिकार त्यांना द्यायची आमची तयारी आहे का?’ स्वधर्माची ही केवढी कठोर निर्भर्त्सना. आम्हा हिंदूंची आज १२५ वर्षांनी तरी आहे असं कठोर तटस्थ आत्मपरीक्षण करण्याची तयारी? 

आणखी वाचा – खरे विवेकानंद आपणाला समजलेत का?

असो. वास्तविक फाळणीनंतरच्या १९५२  च्या निवडणुकांत धर्मराष्ट्रवादी विचारांच्या सर्व पक्षांना मिळून चार टक्के मते मिळाली आणि आज या शक्तींना तोंड देण्यासाठी ‘आपणही हिंदूू धार्मिक आहोत’ हे दाखवण्याच्या विविध केविलवाण्या धडपडी करण्याची वेळ निधर्मी (!) राजकारणी मंडळींवर का बरं आली? हिंदूुत्वाच्या नाऱ्यानंतर शिवसेनेचं महाराष्ट्रभर वेगानं पसरणं वा १९९२ च्या रथयात्रेला विशेषत: उत्तरेत मिळालेला प्रतिसाद व त्यानंतर देशाचं बदललेलं राजकारण याच्याशी असलेल्या मुळांचं तत्त्वज्ञानी झापडं काढून तटस्थपणे आत्मपरीक्षण कितीसं झालं? 

लोकशाही व्यवस्थेत अगदी ‘व्होट’कारणाच्या व्यापारातही समाजाच्या योग्य-अयोग्य भावभावनांची दखल घ्यावी लागते. भारतीय उपमहाद्वीपात धर्म हा अजूनही जणू एक अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी नेहमीच त्या त्या समूहाची जडणघडण लक्षात घेऊन त्या त्या समूहमानसाचं प्रबोधन करावं लागतं. विवेकानंद म्हणत, की भारताला कोणतीही गोष्ट धर्माद्वारे (रूढ अर्थानं नव्हे) समजावून द्यावी लागते. गांधीजी स्वत:ला सनातनी हिंदूू म्हणत व ‘माझे राजकारण हे मोक्षासाठी आहे’ असंही. ‘धर्म घरात ठेवावा’ असं म्हणताना त्यांच्या शब्दांवर आपण विचार केला?

मात्र पुढील काळात हे भान वेगानं सुटत गेलं. निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्याक मतांचं ‘व्होट’कारण तर होत गेलंच पण ती गाडी ‘अल्पसंख्याक जमातवाद राष्ट्राला हानीकारक नसतो’ या तत्त्वज्ञानापर्यंत जाऊन पोहोचली. आपल्याला जाणवत नव्हतं की समाजमानसावर त्याचे वाईट परिणाम होत आहेत. ‘या मंडळींच्या लेखी हिंदूू शब्दाशी संबंधित प्रत्येक गोष्ट वाईट असते; मात्र परधर्मीयांविषयी हे कायम गप्प राहतात वा समर्थन तरी करतात’ अशी हिंदूू मानसिकता बनत गेली (आता परिस्थिती उलटय़ा दिशेने जाऊ मागत आहे) या परिस्थितीत समाजाशी धर्म या विषयावरचा संवाद पूर्णत: तुटत गेला आणि त्याला भयंकर पक्षपाती वाटणाऱ्या निधर्मी मंडळींपासून तो दूर गेला. अखेर प्रत्येक समूहाला आपापल्या धर्म, संस्कृती इत्यादी गोष्टींविषयी केवळ प्रेमच नव्हे तर स्वत्व, अभिमान (अनेकदा अगदी चुकीचाही) या भावना असतात हे प्रखर वास्तव आहे; जगभरच भली भली माणसंही धर्म (वा कोणा इझमच्या!)अभिमानातून सुटत का नाहीत असा कधी प्रश्न पडतो? स्वत:ला प्रतीत झालेल्या सत्यावर निष्ठा अवश्य असावी, पण त्यातून दुसऱ्या विचारांशी वैर व त्यांच्या श्रद्धांवर आघात होता नये. ‘मूर्तिपूजकत्व आणि अकबर बादशाह यांचा उदार ‘दिनेइलाही’ धर्म यांच्या विरुद्ध लढण्याचं औरंगजेब यांचं कर्तृत्व हे प्रेषित अब्राहम यांच्या तोडीचं आहे’ असं मुहम्मद इक्बाल यांचं मत होतं (इक्बाल हे केवळ असामान्य कवीच नव्हते तर धर्माचे गाढे अभ्यासकही होते.) तर हिंदूूंची सामाजिक अवस्था पाहून बाराव्या शतकात मध्य आशियातून आलेले व संस्कृत शिकून भारतीय धर्मविचारांचा अभ्यास केलेले मुस्लीम अल्बेरूनी भारताला म्हणाले, ‘तुमच्याजवळ अमृत असताना तुम्ही विष का पीत आहात?’

आणखी वाचा – विश्वधर्म, विज्ञान आणि वंशाभिमान..

असो. मागे जाऊ. धर्माभिमान हा ‘जातीयवादी’ वगैरे विशेषणांनी दूर होत नाही, उलट घट्ट होतो. आणि समाजमानसात एखाद्या तीव्र भावनिक विषयासंबंधी आपली नैतिकता आपण आपल्या पक्षपाती आचरणानं गमावून बसतो तेव्हा तो आपले काही ऐकूनही घेत नाही. चुकीचे पण प्रामाणिक नि:पक्षपाती विचार नैतिकता तरी नष्ट करीत नाहीत. ‘इतिहासाकडे इतिहास म्हणून बघा, सूड वा अभिमान, जित-जेते इत्यादी भावनांतून नको, ‘लढके लेंगे’, ‘..वही बनाएंगे’ अशा घोषणांमागील भावातून व त्यासंबंधीच्या इतिहासातून आपण आपली सुटका करून घेतली पाहिजे तरच कोणत्याही धर्मातील खरा धर्मभाव टिकेल व वाढेल’ हे सारं विशेषत: हिंदूू समाजाला सांगण्याची नैतिकता आपण गमावून बसलो आहोत, हे वास्तव नाही का?  धर्म म्हणजे खरोखर काय व ते सर्व मूलत: एकच का आहेत इत्यादी स्वामीजींचे विचार त्याला सांगणं हे तर फारच दूरचं झालं.

प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणातील बऱ्या-वाईट भावभावना, आशा-आकांक्षा, लोभ-मोह-सूड इत्यादी अनेक वृत्तींचं रसायन हे वेगवेगळं असतं. त्यातून त्याच्या मनात आनंद व दु:ख, जय-पराजय, आशा-निराशा, शांती-अशांती इत्यादी मनोवेगांच्या लाटा सतत उसळत असतात. प्रत्येक माणसाला यातून सुटका होऊन अखंड शांती-समाधानाची तहान लागलेली असते; ज्याला ही तहान त्याला धर्माची गरज नाही.  प्रत्येकाच्या अंत:करणातील रसायनाच्या वेगळेपणामुळे प्रत्येकाला एक प्रकारे वेगळ्या धर्माची (रूढार्थानं नव्हे) गरज असते. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘ज्या दिवशी प्रत्येक मानवाचा धर्म स्वतंत्र असेल तो मानवाच्या इतिहासातील सुवर्ण दिवस असेल!’ असं म्हणण्याची हिंमत आज २१ व्या शतकातही किती धर्मवाल्यांच्याजवळ असेल? ते राहू द्या. स्वामीजी व त्यांच्यानंतर भारताचा जीवनविचार मांडणारे असंख्य लोक पश्चिमेत गेले. त्यांना लाखो शिष्य मिळाले, पण त्यांनी कोणालाही हिंदूू वगैरे केलं नाही यात भारताच्या धर्माचं वैशिष्टय़ं दडलेलं आहे.

स्वामीजींच्या वरीलप्रमाणे अनेक विचार-मौक्तिकांची बीजे काही हजार वर्षांपासून भक्कमपणं भारतीय जीवनदृष्टीत रुजलेली आहेत. आम्हाला त्या जीवनदृष्टीशी आज फारसं देणंघेणं उरलं नसलं तरी जगाचं त्याचं भान पूर्णत: हरपलेलं नाही. १९६० साली दिल्ली येथील एका व्याख्यानांत जगप्रसिद्ध इतिहास-तत्त्वज्ञ व संस्कृती भाष्यकार अरनॉल्ड टॉयन्बी म्हणतात: ‘इतर धर्म जगातून नाहीसे करण्याची जिहादी वृत्ती भारताच्या पश्चिमेकडील भागात उदय पावलेल्या सर्वच धर्मानी प्रकट केली आहे. भारताच्या पश्चिमेकडील सहिष्णू धर्माचा नाश करण्याचे काम ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मानी केले. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि वृत्ती उदारमतवादी आहे. भारताच्या ज्या विशेष गुणाचा माझ्यावर खोल परिणाम झाला आहे तो म्हणजे अद्वेष. आज आम्ही चिंतनाला पारखे झालो आहोत. भारतात अजूनही जाग्या  असलेल्या आध्यात्मिक प्रेरणेशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट मानव जातीला आत्मनाशापासून वाचवू शकणार नाही.’ इथे आठवा स्वामीजींनी पश्चिमेला उद्देशून उच्चारलेले शब्द, ‘विज्ञानाचे धडे आम्ही आपल्या पायाशी बसून घेऊ, पण (जीवनात शांतीसमाधान देणाऱ्या) सनातन (अविनाशी) सत्यासाठी आपल्याला भारताकडेच यावं लागेल.’ हे शब्द त्यांच्या कोणा अभिमानातून आले आहेत का? विज्ञान आज अनेक धर्म-श्रद्धांच्या विषयांच्या चिंधडय़ा उडवीत असताना ‘श्रद्धा! श्रद्धा!’ म्हणत छाती पिटून आधुनिक जगात किती काळ चालेल याचा सर्वच धर्मवाल्यांनी विचार केला पाहिजे. स्वामीजी तर म्हणाले, ‘धर्माची विज्ञानाला सामोरं जायची नसेल तर तो जेवढय़ा लवकर नष्ट होईल तेवढं मानव जातीचं कल्याण लवकर होईल.’ अर्थात ज्या गोष्टी विज्ञानानं सिद्ध केलेल्या नाहीत व ज्या सिद्ध झालेल्या तत्त्वांच्या विरोधी वा तर्कदुष्ट नाहीत त्यांचा संबंध इथे नाही.

आणखी वाचा – विवेकानंदांचा ‘ईश्वरवाद’

असो. भारताच्या आजच्या परिस्थितींतून निदान एक तरी धडा शिकू या : इतिहास सुडासाठी उकरणं जेवढं अपायकारक तेवढाच त्यावर पक्षपाती व स्वार्थी भावनेनं पांघरूण घालण्याचा आटापिटाही हानीकारकच.  सर्वधर्मीय भारतीयांनी व विशेषत: हिंदूूंनी तीन प्रश्नांची उतरं शोधण्याचा प्रयत्न करावा.

१) ६०० वर्षांच्या मुस्लीम राजवटीमध्ये हिंदूू मानसावर विशेषत: धर्मासंबंधी तीव्र आघात करणाऱ्या घटना असूनही स्वामीजींच्या तोंडून इस्लाम व मुसलमान यांच्याविषयी एकही कटू शब्द का निघत नाही?

२) ‘भारताचा सृष्टीच्या एकत्वाचा धर्म सुटला तर भारताला कोणतीही शक्ती वाचवू शकणार नाही,’ असं स्वामीजी का म्हणत आहेत?

३) ‘माझ्या स्वप्नांतील भारताचं शिर असेल वेदान्त तर धड असेल इस्लाम’ या स्वामीजींच्या भारताच्या चित्रात ते इस्लामला एवढं मोलाचं स्थान त्यानं रुजवलेल्या सामाजिक समतेमुळेच देत नसावेत का?

असो. निसर्ग कोणताही अतिरेक सहन करीत नाही. ‘स्युडो-सेक्युलॅरिझम्’चा पाडाव करण्याचं निसर्गदत्त कार्य पार पाडल्यावर आता तो फार काळ ‘स्युडो-हिंदुइझम्’ही सहन करणार नाही! लेखक निवृत्त प्राध्यापक आणि विवेकानंद साहित्याचे अभ्यासक आहेत.