आमदारकी जुन्या की नव्यांना?
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आदी नेत्यांचीच भाजपमध्ये चलती दिसते. मुंबईतील भाजप कार्यक्रमांमध्ये हेच चेहरे मुख्यत्वे दिसतात. कृपाशंकर सिंह यांचे अधेमधे दर्शन होते. महाविकास आघाडी किंवा शिवसेनेच्या विरोधात अधिक आक्रमक कोण हे दाखविण्याची भाजपमध्ये जणू काही स्पर्धाच लागलेली असते. याचे कारणही तसे महत्त्वाचे. विधान परिषदेच्या १० जागा जुलैमध्ये रिक्त होत आहेत. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे. दोघेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय. निवृत्त होणाऱ्या दहापैकी सहा आमदार हे भाजपचे. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येऊ शकतात. चित्रा वाघ यांचाही आमदारकीसाठी प्रयत्न. दरेकर, लाड, विनायक मेटे वा सदाभाऊ खोत हे निवृत्त होणारे चौघे मूळचे भाजपचे नाहीत. बाहेरच्या पक्षातून आलेल्यांनाच मिळणारे महत्त्व किंवा पदाच्या वाटपात त्यांना दिल्या जाणाऱ्या झुकत्या मापामुळे जुनेजाणते भाजप नेते अस्वस्थ होणे स्वाभाविकच. आमदारकीची उमेदवारी देताना दरेकर, लाड, खोत, मेटे किंवा वाघ यांच्याच नावांचा विचार होणार असल्यास आम्ही काय करायचे, हा मूळ भाजपमधील मंडळींचा प्रश्न महत्त्वाचाच.
लक्ष्मण कोण आहे?
भगव्या शालीभोवती लपटलेली राज ठाकरे यांची तसवीर औरंगाबाद शहरात (सॉरी, सॉरी संभाजीनगरभर) लागलेली. शेजारी एका भगव्या ध्वजावर मेरू पर्वत उचणाऱ्या हनुमानाचे उड्डाण चित्र. लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा संजीवनी आणायला गेलेले हनुमान संजीवनी सापडेना म्हणून डोंगरच उचलून घेऊन आले. तेच चित्र पोस्टरवर. या चित्रातील संजीवनी बुटी कदाचित मनसेला मिळेलही पण कोणत्या लक्ष्मणाला शक्ती लागली आहे, अशी विचारणा होतच राहिली. जय श्रीरामच्या घोषणा देत लक्ष्मण शोधणारे काही मनसेचे भाजपच्या गोतवळय़ात फिरून आल्याची चर्चा आहे.
मंत्र्यांच्या संवादाची कळी खुलेचिना
कोल्हापूर जिल्ह्यात तीन मंत्री असले तरी त्रयीमध्ये सख्य किती, असा प्रश्न पडावा अशीच स्थिती पाहायला मिळते. विशेषत: काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे कोणत्याही कार्यक्रमात आले की त्यांच्यात दिलखुलास गप्पा सुरू असतात. पण त्याच व्यासपीठावर शिवसेनेचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आल्यावर त्यांच्याशी तितकाच मनमोकळा संवाद होतोच असे नाही. अलीकडेच एका मोठय़ा कार्यक्रमाच्या निमित्ताने तिघे एकत्र आले. तेव्हा पाटील-मुश्रीफ यांचा गप्पांचा फड रंगला. मात्र या गप्पापासून यड्रावकर अलिप्त राहिले. एकाकी राहिलेले यड्रावकर एका सत्काराचे निमित्त साधून उठले. मध्ये एक खुर्ची ठेवून मध्ये माजी खासदार काल्लाप्पांना आवाडे यांच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. आणि तेथे त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवत एकटेपणा दूर केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही पाटील-मुश्रीफ यांच्या आघाडीत यड्रावकर यांना स्थान दिले नव्हते. ते स्वबळावर निवडून आले होते. राज्यात ‘मविआ’कडून महाराष्ट्रधर्म वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला जात असताना आघाडीधर्माचा संवाद कधी खुलणार?
(सहभाग : प्रबोध देशपांडे, दयानंद लिपारे, सुहास सरदेशमुख)
महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या विरोधात भाजपने आघाडी उघडली असतानाच एका मंत्र्याच्या बाजूने भाजपची मंडळी उभी राहतात हे चित्र जरा विरळच. पण अकोला जिल्ह्यात भाजपने राज्यमंत्री बच्चू कडू यांना साथ दिली आहे. त्याचे कारणही तसेच. कारण अकोला जिल्ह्यात भाजपला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आव्हान असते. मग ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ यातून भाजपने प्रहार संघटनेचे नेते व शिवसेनेच्या कोटय़ातून राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपात मदत केली आहे. भाजपला कडू आडनाव असले तरी अधिक गोड वाटतात यातच सारे आले. तसे मागे जिल्हा परिषदेतील सत्तावाटपात भाजपने प्रहारबरोबरच जमवून घेतले होते.