‘भानामती..’
गाव अवघे सात-आठशे उंबऱ्याचं. डोंगराळ शिवारच जास्त. दसरा-दिवाळीपर्यंत अख्खं शिवार दिसणारं शिवार थंडी वाढू लागली की पिवळं पडून कुसळाच व्हायचं. तरीपण डाग-डवंगा असलं तिथंच हिरव दिसायचं. गेल्या दहा पंधरा सालात मात्र, म्हैसाळ योजनेचे पाणी आले आणि खडकाळ भुंडय़ा माळाला कंठ फुटू लागले.उसाचे फड आणि द्राक्षाच्या बागा वाढू लागल्या. सालाला दहा-वीस लाखांची उलाढाल कोटीच्या घरात गेली. आर्थिक ताकद असलेल्या सोसायटीची सत्ता आपल्याला पाहिजे ही ईर्षां तर आहेच. आता तोंडावर आलेली निवडणूक जिंकण्यासाठी सभासद आपल्या गटाकडे घेण्यासाठी चुरस आहे. मात्र, सत्ता मिळेल याची खात्री नसल्याने काहींनी अंधश्रद्धेचा आधार घेतला. अमावस्येला सोसायटीच्या दारात लिंबू, नारळ, हळद, कुंकू वाहून पूजा करण्यात आली. सकाळी हा प्रकार गावकऱ्यांना दिसला. हा प्रकार कुणी केला याचा शोध काही मंडळी घेत आहेत.
सोयीचे एकमत!
पक्ष जरी भिन्न असले तरी निवडून येण्यासाठी कसे सर्वपक्षीय सोयीचे राजकारण केले जाते, याचे उदाहरण म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग रचनेकडे पाहावे लागेल. ही रचना प्रस्थापितांसाठी अनुकूल असणे हा निश्चितच योगायोग नसावा. अर्थात महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागांची मोडतोड झाल्याची तक्रार केली आहे. दुसरीकडे विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नव्या प्रभागरचनेचे स्वागत केले. काही अपवाद वगळता हक्काचे भाग कायम राहिल्याचे नगरसेवकांना समाधान आहे. यात भाजपच्या मंडळींचाही समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचनेविषयी मतमतांतरे असली तरी सोयीच्या प्रभाग रचनेवर सर्वपक्षीय एकमत आहे.
संघर्ष तिसऱ्या पिढीतही
शरद पवार आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत. १९९१च्या लोकसभा निवडणुकीत विखे-पाटील यांना उमेदवारी नाकारणे, त्यानंतर प्रचारात पवारांनी केलेल्या वक्तव्यांवरून हा संघर्ष वाढत गेला. सर्वोच्च न्यायालयात विखे-पाटील यांनी गुदरलेल्या खटल्यात पवारांवर ताशेरे ओढण्यात आले. पवारांचे पुतणे अजित पवार आणि विखे-पाटील यांचे पुत्र राधाकृष्ण विखे-पाटील या दुसऱ्या पिढीत हा वाद कायम राहिला. मुळा-प्रवरा वीज कंपनी असो वा निळवंडे धरण, संघर्ष कायमच राहिला. तिसऱ्या पिढीतही तो आता झिरपू लागला. गेल्याच आठवडय़ात लोकसभेत राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय यांनी केलेल्या भाषणात पवारांना टोमणे मारले. पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी लगेचच त्याला प्रत्युत्तर देत परतफेड केली. पवार – विखे-पाटील घराण्यातील वादाची ही परंपरा तिसऱ्या पिढीतही कायम आहे.
मंत्र्यानुसार पोलीस ठाण्याची हद्द?
नगर जिल्ह्याचे राजकारण बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे या दोन नेत्यांभोवतीच फिरते. विखे मंत्री असताना त्यांच्या वर्चस्वाखालील शिर्डी मतदारसंघातील आश्वी पोलीस ठाण्याला थोरातांच्या वर्चस्वाखाली संगमनेर तालुक्यातील नऊ गावे जोडण्यात आली. आता पुन्हा थोरात मंत्री होताच त्यांनी ही नऊ गावे ‘आश्वी’तून वगळून पुन्हा संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला जोडण्यात आली. थोरात आणि विखे-पाटील यांचा आदलाबदलीची मोहिम यशस्वी झाल्याने श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे पुढे सरसावले आहेत. विखे यांच्या मतदारसंघातील लोणी पोलीस ठाण्याला जोडलेली सहा गावे पुन्हा श्रीरामपूर पोलीस ठाण्याला जोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.
(सहभाग – दिगंबर शिंदे, अनिकेत साठे, मोहनीराज लहाडे, सुहास सरदेशमुख )
राज्यपालांचा दौरा अन् भाजपचा गोतावळा
राज्यपालांचा दौरा म्हणजे राजशिष्टाचार आलाच आला. अलीकडेच राज्यपाल बुलढाण्याला जाण्यासाठी औरंगाबादेत मुक्कामी आलेले. राज्यपाल आले म्हटल्यावर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसांडून वाहतोच. म्हणजे राज्यपाल हे पद निरपेक्ष वगैरे असेल पूर्वी कधी तरी कागदी दप्तरात. बंदोबस्त व राज्यशिष्टाचार तसेच करोनाच्या नियमांमुळे कोणाला भेटायला सोडायचे असा पेच पोलीस अधिकाऱ्यांसमोर होता. तो त्यांनी सोडविला. दोन नेते आत गेले. त्यांनी सांगितले, ‘बाहेर खूप कार्यकर्ते वाट बघतात आपल्या भेटीसाठी., राज्यपाल खूश झाले म्हणे. त्यांनी बाकींच्यांना बोलवण्यास सांगितले. मग बाहेर उभारलेले कार्यकर्ते आत गेले. गेलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले महिला आघाडी बाहेर ताटकळली आहे. मग त्याही आत गेल्या. भाजपचा गोतवळा जमला सुभेदारी विश्रामगृहावर. तशा दोन सरकारी बैठकाही झाल्या. पण गोतावळा भाजपचाच. त्यानंतर राज्य सरकारच्या कारभाराची वाभाडे काढणारी निवदने राज्यपालांना दिली गेली. या एकदा राजभवनातही चहा प्यायला असेही राज्यपाल म्हणाले अन् कार्यकर्ते भारावून गेले.