|| आनंद करंदीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्तेसाठी भाऊबंदकी ही काही केवळ भारतीय संस्कृतीची मक्तेदारी नाही; परंतु अलीकडे ही भाऊबंदकीची संस्कृती लयाला जाईल की काय,अशी भीती वाटू लागली होती. या पार्श भूमीवर, गेला महिनाभर राज्यात सुरू असलेल्या सत्तानाटय़ात महाराष्ट्रातील भाऊबंदकीची संस्कृती पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याने संस्कृती संवर्धनाला हातभारच लागलेला आहे.. अशी ग्वाही देणारा व्यंग्यलेख..

२२ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या चेतना महाविद्यालयातील विंदा करंदीकरांच्या राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रसिद्ध हिंदी लेखक उदय प्रकाश यांचे भाषण झाले. त्या भाषणात त्यांनी आग्रहाने असे सांगितले की, ‘‘‘त्यांचा’ राग करू नका. ‘त्यांच्या’वर विनोद करा, ‘त्यांचा’ उपहास करा. त्यांच्या कर्तृत्वाचे विनोद आणि उपहासानेच वर्णन होऊ शकते.’’ महाराष्ट्रातील सत्तानाटय़ पाहून त्यातील मर्मावर उपहासाने विनोद करण्याची इच्छा मला उदय प्रकाश यांच्या भाषणामुळे निर्माण झाली. तेव्हा हा लेख लिहिताना मी उदय प्रकाश यांचे आभार मानून सुरुवात करतो.

भाऊबंदकी, विशेषत: राज्याच्या सत्तेसाठीची भाऊबंदकी, या क्षेत्रात आपली संस्कृती अधिक प्रगत आहे. विमानविद्या आपल्याला प्राचीन काळी अवगत होती, आपल्याकडे प्राचीन काळात अवयव आरोपणाची शस्त्रक्रियाही होती, आपण आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात जगात नेहमीच पुढे होतो, हे आपल्याला माहीत आहेच; तरीही आपले नेते आपल्याला त्याची आठवण करून देतात. तसेच आपल्याला हेही माहीतच आहे, की सत्तासंपादनासाठी भाऊबंदकी करणे या शास्त्रातही प्राचीन काळापासून आपण जगाच्या पुढे होतो. पण याबाबत परत परत आठवण करून देण्याचे आपल्या नेत्यांचे श्रम वाचावे म्हणून, आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या या थोर परंपरेचे विस्मरण झालेल्या काहींना वानगीदाखल काही महत्त्वाच्या पौराणिक किंवा ऐतिहासिक गोष्टींचे स्मरण करून देणे हे एक देशनिष्ठ म्हणून माझे सांस्कृतिक कर्तव्यच आहे.

रामायणात सुग्रीव आणि वाली हे एकमेकांविरुद्ध लढले. या भाऊबंदकीच्या लढाईत रामाने सुग्रीवाचा पक्ष घेऊन वालीची हत्या केली. महाभारतात कौरव-पांडव एकमेकांविरुद्ध लढले; लढायला सुरुवातीला अर्जुनाने नकार दिला, तेव्हा कृष्णदेवांनी त्याला ही लढाई करायला प्रोत्साहन दिले. मगधाच्या साम्राज्यात तर या भाऊबंदकीने कमालच केली. भाऊबंदकीचे अत्युच्च रूप म्हणजे पितृहत्या करून सत्ता संपादन करणे. बिंबिसाराने त्याच्या पित्याची हत्या करून सत्ता ताब्यात घेतली. त्याचा मुलगा अजातशत्रू, त्यानेही पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून बिंबिसारची हत्या करून सत्ता ताब्यात घेतली. ही भारतीय संस्कृती फक्त हिंदू राजांपुरतीच मर्यादित नव्हती, पुढे औरंगजेब या भारतातील मोठय़ा बादशहाने सत्ता मिळवण्यासाठी आपल्या भावांशी लढाई केली आणि आपल्या पित्याला तुरुंगात टाकले. मग पेशवाईतही भाऊबंदकी चालूच राहिली.

अर्थात, सत्तेसाठी भाऊबंदकी ही काही भारतीय संस्कृतीची मक्तेदारी नाही, हे मी खेदाने मान्य करतो. सर्वच सुसंस्कृत देशांत सत्तेसाठीची भाऊबंदकी होती. बायबलमध्येसुद्धा केन आणि एबल या अ‍ॅडमच्या मुलांत स्पर्धा झाली आणि केनने एबलचा खून केला अशी कथा आहे. पेपिनने आपला बाप, रोमचा सम्राट चाल्रेमाग्ने याचा खून करण्याचा कट केला होता अशी गोष्ट आहे. इ.स.पूर्व ४६० मध्ये आपला भाऊ आणि पर्शियाचा राजा होरमीड्ज याची हत्या करून पेरोज राजा बनला. गझनीच्या महमुदाने आपला भाऊ इस्माइल याला जन्मभर कैदेत ठेवले. आपला भाऊ रॉबर्ट लढाईवर गेला असताना इंग्लंडमध्ये पहिल्या हेन्रीने राज्य ताब्यात घेतले; लढाईवरून परत आलेल्या आपल्या भावाला तुरुंगात धाडले. चीनचा सम्राट झू यौगी याने आपल्या पित्याची हत्या केली (इ.स. ९१२), इत्यादी, इत्यादी.

पण अभिमानाची गोष्ट ही की, इतर संस्कृतींच्या मानाने भारत या भाऊबंदकीच्या संस्कृतीतही आघाडीवर होता हे नक्की. जर विकिपीडियावर जाऊन सत्तेसाठी झालेल्या पितृहत्यांच्या गोष्टी शोधल्या, तर ज्या १४ पितृहत्या ठळकपणे आणि सहजपणे आढळतात, त्यांपैकी पाच पितृहत्या या एकटय़ा भारतातील आहेत!

अलीकडे ही भाऊबंदकीची संस्कृती लयाला जाईल अशी भीती वाटू लागली होती. मध्यंतरीच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये यादव पिता-पुत्रांमधील नाटक रंगणार असे वाटत होते, पण त्यांनी आपल्या संस्कृतीचा अनादर करून मिटवामिटवी केली; याबद्दल त्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. भाऊबंदकीची संस्कृती लयाला जाईल असे राजकारण करण्यामध्ये नेहरू-गांधी कुटुंबीयांचा दोष मोठा आहे! मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या सर्वाना आपल्या संस्कृतीचा विसर पडला हेही काही चांगले झाले नाही.

या पाश्र्वभूमीवर भाजपने आणि भाजपच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील भाऊबंदकीच्या संस्कृतीला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणून संस्कृती संवर्धनाला लावलेला हातभार हा इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाईल.

ताजा कलम : आता मला असे कळते की, ही भाऊबंदकीची संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी म्हणून शीर्षस्थ नेतृत्वाने नवी योजना आखली आहे. ती फारच कल्पक आहे. मध्यंतरी मुंबईच्या दोघा उद्योजक बंधूंनी चांगली भाऊबंदकी सुरू केली होती; पण मोठय़ा भावाने धाकटय़ाच्या कर्जफेडीला मदत करून हा संस्कृती संवर्धनाचा कार्यक्रम आवरता घेतला होता. शीर्षस्थ नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील सत्ता चालवण्याचे काम खासगी क्षेत्राला द्यायचे ठरवले आहे, असे ऐकतो..  एकूण खासगीकरणाच्या धोरणाशी आणि भांडवली नफा जास्तीत जास्त वाढता करण्याच्या धोरणाशी ते सुसंगतच आहे. त्यासाठी गोपनीय निविदा मागविण्यात आल्या आहेत. यासाठी दोन्ही भावांनी वेगवेगळ्या निविदा भरणे आवश्यक आहे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यातून त्यांची भाऊबंदकी परत सुरू होईल. महाराष्ट्र शासन आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी मोठय़ात मोठी निविदा भरली जाईल अशीही खात्री आहे; त्यामुळे केंद्र सरकारचा आणि भाजपचा खजिना भरण्यासही मदत होईल. किंबहुना तो बुलेट ट्रेनच्या वेगाने भरला जाईल.

भारतीय संस्कृती वर्धमान करण्याच्या या धाडसी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच धडा घेण्याची आणि नेहरू-गांधी घराण्याचा वारसा सोडून भाऊबंदकीची संस्कृती वर्धमान करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची गरज आहे. सगळ्यांना शुभेच्छा!!

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congratulations to culture breeders thank you akp